सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची प्रतिमा मलीन करण्याचा भाजपचा नवा दहशतवाद - काँग्रेस

मुंबई, दि. 08 ऑक्टोबर, 2020: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट असल्याचा अहवाल सायबर सेलने दिला आहे. याच संदर्भात काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांची प्रतिमा मलीन करण्याचा भाजपचा नवा दहशतवाद असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.


मुंबई पोलीस आणि राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी जे ट्वीट्स करण्यात आले. या ट्विटच्या असामान्य पॅटर्ननुसार फेसबुक, ट्विटरचा कोणताही सामान्य वापरकर्ता 3 महिन्यांत 40 हजार ट्वीट/पोस्ट करू शकत नाही. यातील बहुतांश ट्विटर हँडलने दर मिनिटाला 25 ट्विट्स केल्याचे दिसते. हे सर्व ट्विट साधारणपणे एकाच विषयाच्या संदर्भात करण्यात आलेत ते म्हणजे सुशांतसिंग राजपूत (SSR). त्यांचे हॅशटॅगही कॉमन आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही व्यावसायिक एजन्सींच्या मार्फत हे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री हे आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठीच मुंबई पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत असे चित्र रंगवण्याचा या मोहिमेचा एकमेव उद्देश होता. भाड्याने घेतलेल्या सोशल मीडियावर ट्रेंड सेट करण्याची ही पद्धत असून याच माहितीच्या आधारावर न्यूज चॅनेल्स जोरजोरात अपप्रचार करतात. सुशांतच्या आत्म्याशी बोललो असल्याचा दावा करणारा एक व्हीडीओ यूट्यूब चॅनेलवर व्हायरल झाला होता. गोबेल्स तंत्राची ही विकसित आवृत्ती असून त्यावर आरुढ होत भाजपचे नेते कृत्रीम जनमत बनवत आहेत, हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.