मुंबईतील नॅशनल पार्कात खासगी वाहनांना आता पूर्णतः बंदी

मुंबई, दि. 08 ऑक्टोबर, 2020: करोनामुळे मानवाचा वावर व हस्तक्षेप कमी होऊन निसर्ग बहरू लागल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खासगी वाहनाला प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. उद्यान पुन्हा जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, तेव्हापासून ही उपाययोजना राबवण्यात येईल. तसेच जानेवारीपासून उद्यानामध्ये बॅटरी ऑपरेटेड वाहनेही धावणार आहेत.


वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने गाडीची धडक बसून किंवा चिरडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचा मृत्यू होतो. तसेच उद्यानामध्ये प्रदूषणाची समस्याही निर्माण होते. यासाठी उद्यानात खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी ही मागणी वारंवार होते. अखेर उद्यान नागरिकांसाठी नव्याने सुरू होताना ही उपापयोजना राबवण्यात येणार आहे. उद्यानातील बस, बेस्टची बस, उद्यानातील इतर वाहतूक सेवा याचा फायदा सध्या नागरिकांनी घ्यावा. जानेवारीपासून बॅटरीवरील वाहने उपलब्ध झाल्यानंतर सुमारे 15 बस उद्यानात धावतील. दर 15 मिनिटाला एक बस याप्रमाणे या बस नागरिकांना कान्हेरीपर्यंत उपलब्ध होतील. 20 ते 22 पर्यटकांसाठी ही बस असेल.

250 वाहनांसाठी वाहनतळ

नागरिकांनी त्यांची खासगी वाहने उद्यानाच्या खासगी वाहनतळावर ठेवावी. 250 वाहनांसाठी हा वाहनतळ उपलब्ध होईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुमणी पाड्यापर्यंत सकाळी 5.30 ते सकाळी 7.30 या वेळेमध्ये नागरिकांना फिरता येईल. प्रति दिवशी दोन हजार नागरिकांना उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी प्रवेश देण्यात येईल. दर सोमवारी उद्यान पूर्णपणे बंद ठेवण्याचेही प्रस्तावित आहे.

नवे उपक्रम

मिनीट्रेनचे आधुनिकीकरण

जानेवारीपासून बिबळ्यांना रेडिओ कॉलर. प्रारंभी दोन बिबळ्यांना बसवणार

उद्यानात मियावाकी पद्धतीने दोन किंवा तीन ठिकाणी ( 50 चौ. मीटरचे भाग) जंगल उभारणार

प्रामुख्याने मूळ भारतीय मात्र लवकर वाढणारी झाडे लावणार

उद्यानात वाघ आणि सिंहाची जोडी आणण्यासाठी इतर राष्ट्रीय उद्याने तसेच इतर राज्यांसोबतही चर्चा

शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे शहरातील जंगलाबद्दल जागृती

व्याघ्र परिचय केंद्राचेही काम पूर्ण होण्याच्या टप्प्यावर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.