वसई-विरारकरांसाठी ''वर्क फ्रॉम माय ऑफिस’' योजना
वसई, (प्रतिनिधी), दि. २३ सप्टेंबर, २०२०: करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सवलत दिली आहे. पण त्यामुळे घराचं घरपण मागे पडत चालल्याच्या तक्रारी आहेत. या महत्त्वाच्या विषयावर विचार करून बहुजन विकास आघाडीने ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ यासाठी वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यानुसार जुनं विवा महाविद्यालय, नवीन विवा महाविद्यालय आणि नालासोपारा येथील बहुजन विकास आघाडी भवन या तीन इमारतींमध्ये ऑफिससारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. लोक येथे काम करू शकतात. आ. क्षितीज ठाकूर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
गेल्या मार्च महिन्यात टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करण्याची मुभा दिली. सुरुवातीस खूप सोयीची वाटणारी या सुविधाचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत. घरातून काम करताना संबंधित व्यक्तीला आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे कौटुंबिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच घरातील इतर व्यक्तिंना मोकळेपणे वावरण्यावर काही अंशी बंधने येत असतात.
त्यामुळे कौटुंबिक कलह आणि ताणतणाव इ. समस्या वाढल्या आहेत. या बाबी लक्षात घेऊन आ. क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली बहुजन विकास आघाडीने ‘वर्क फ्रॉम माय ऑफिस’ ही संकल्पना राबवायचे ठरवले आहे. वसई-विरार पट्ट्यात राहणाऱ्या आणि घरून काम करणाऱ्यांना या तीनही ठिकाणी ऑफिससारखं सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. फर्निचरसह गरज लागल्यास कॉम्प्युटरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वायफाय सेवा पुरवली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सेवा मोफत उपलब्ध असेल. नेहमीच्या ऑफिसच्या वेळेत ही सेवा लोकांसाठी उपलब्ध असेल. लोक त्यांच्या वेळेत येऊन या ठिकाणी बसून काम करू शकतील.
एखाद्या पक्षाचं कार्यालय असलेली इमारत सर्वसामान्यांचं ऑफिस म्हणून वापरण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. सध्याची परिस्थिती पाहता लोकांना सर्व प्रकारे दिलासा देणं, हे लोकप्रतिनिधी म्हणून आपलं आणि लोकांचा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडीचं काम आहे, असं आ. क्षितीज ठाकूर यांनी सांगितलं. ऑफिसमध्ये बसून काम करणं ही वेगळी गोष्ट असते. काम वेळेत आणि व्यवस्थित पार पडतं. त्यामुळेच आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली.
या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना एका लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे. तसंच करोना काळात या अशा ठिकाणी काम करणं सुरक्षित वाटावं, यासाठी येथे येणाऱ्या प्रत्येकाचं तापमान आणि ऑक्सिजनची पातळी मोजण्यात येणार आहे. त्याशिवाय सॅनिटायझर, मास्क आदी गोष्टी अनिवार्य असतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत