मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या स्टंटबाजीवर ‘राज’ नाराज

मुंबई, दि. २३ सप्टेंबर, २०२०: करोना व लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी सध्या बंद असलेली लोकल सेवा तात्काळ सुरू करा, अशी मागणी करत राज्य सरकारविरोधात स्टंटबाजी करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाराज असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण मोठ्या गाजावाजात सोमवारी २१ सप्टेंबर रोजी मुंबईकरांसाठी रेल्वेचा नियम मोडून रेल्वे प्रवास केल्याचा संदीप देशपांडेचा दावा फोल असल्याचे समोर आले आहे. मूळात देशपांडे, संतोष धुरीसह मनसेच्या चार कार्यकर्त्यांनी सामान्यांसाठींच्या लोकलमधून नाही तर चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या लोकलमधून प्रवास केल्याचे आता उघड झाले आहे. रेल्वे सुरू करण्यासाठी सविनय आंदोलन दादरपासून नाही तर मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातून नेरळ स्थानकापर्यंत प्रवास केला होता अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. यामुळे देशपांडे टीम यांचा सविनय आंदोलनाचा बार फुसका निघाल्याची चर्चा आता मनसेच्या वर्तृळात रंगली आहे.

मनसेचे वरिष्ठ नेतेही देशपांडे यांच्या स्टंटबाजीने नाराज असून, गेल्या काही दिवसात करोनाच्या काळात मनसेने निर्माण केलेल्या राज्यसरकारच्या नाकर्तेपणावर पाणी पडल्याची प्रतिक्रिया दादर विभागातून ऐकायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे लोक फार आशेने येतात. मंदिरे उघडणे, जिम सुरू करणे आणि डॉक्टरांच्या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातून नागरिक फार आशेने येत असतात. मात्र मनसे रेल्वे युनियनच्या पदाधिकारी जितू पाटील यांच्या मदतीने देशपांडे आणि टीमने केलेला केविलवाणा रेल्वे प्रवास मनसेची पोलखोल करण्यास कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया एका नेत्याने दिली. मुळात देशपांडे यांचे कार्यक्षेत्र दादर परिसर असल्याने तिथेच आंदोलन करणे आवश्यक असताना ठाणे ग्रामिंणधील शेलू स्टेशन गाठणे म्हणजे प्रसिद्धीसाठी काहीही असाच हा प्रकार असल्याचे हा नेता म्हणाला.


करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग गरजेचे आहे. सामान्यांसाठी रेल्वे सेवा सुरू केल्यास करोनाचा विस्फोट होण्याचाच धोका आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने सावधानपूर्व पाऊल उचलत काही अटी व शर्थींवर लॉकडाऊन ४ मध्ये शिथिलता आणली. यात फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, पालिका कर्मचारी, खासगी बँक, न्यायालय, केंद्र सरकारचे कर्मचारी यांच्यासाठी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मात्र बस आणि एसटीमधून प्रवासाशिवाय पर्यांय नाही.

तसेच आता बऱ्याच खासगी कंपन्या व ऑफिसेसही सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कामावर जावे लागत आहे. प्रवासासाठी किमान ६ ते ८ तास लागतात. पण बसमध्ये गर्दी होत असल्याने करोनाचा संसर्गाचीही भिती नागरिकांमध्ये आहे. यामुळे सामान्य नागरिकांनाही लोकल प्रवासास परवानगी द्यावी अशा धोशा भाजप, मनसे व इतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारच्या मागे लावला आहे. श्रेय लाटण्याच्या या शर्यंतीत मनसेने पुढाकार घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी आंदोलन छेडले. त्यानंतर देशपांडे सोमवारी सकाळी कार्यकर्त्यांसह दादरहून लोकलमधून प्रवास करणाऱ असल्याचे मनसेच्या इतर कार्यकृत्यांना सांगण्यात आले. यामुळे मनसेचे सर्व कार्यकर्ते सकाळीच दादर स्थानकात पोहचले. जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी दादर स्थानक दणणून सोडले. सर्वजण संदीप देशपांडे टीम यांची वाट पाहात होते. प्रत्येकजण उत्साहाने मोबाइलवर या आंदोलनात सहभागी झाल्याचे सेल्फीही काढत होते. मात्र त्यांचा हिरेमोड झाला. कारण देशपांडे टीमने प्लान बदलला. फुकटची डोकेदुखी नको म्हणून संदीप देशपांडे यांनी चार कार्यकर्त्यांसह रोडने गाडीने थेट शेलू स्थानक गाठले. तिथून ते नेरळला पोहोचले आणि शेलू ते नेरळ असा प्रवास करत फोटो, विडिओ काढले. यामुळे रेल्वे पोलिसांची पुरती धावपळ झाली.

देशपांडे दादरहून प्रवास करणार असल्याने रेल्वे पोलिसही सज्ज होते. पण त्यांना व कार्यकत्यांना कलटी देत देशपांडे टीमने शेलूकडे कूच केले. हे कळताच दादर स्थानकात सकाळपासून हजेरी लावलेले कार्यकर्ते वैतागले व आल्यापावली घराकडे वळले. तर पोलिसांचीही भंबेरी उडाली.


तर दुसरीकडे विनापरवानगी प्रवास करण्याबरोबरच सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संदीप देशपांडे, संतोष धुरीसह चारजणांना कर्जत पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यानंतर कल्याण येथील रेल्वे कोर्टाने त्यांची ४ दिवसांच्या पोलीस कोठडीसाठी रवानगी केली. पण नंतर १५००० हजार रुपये जामिनावर त्यांना सोडण्यात आले.

मात्र यावेळी मध्य रेल्वेने कोर्टात सादर केलेल्या तक्रारीत देशपांडे व इतर चार कार्यकर्त्यांनी सामान्य लोकलमधून नाही तर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या लोकलमधून प्रवास केल्याचे सांगितले. यामुळे मनसेच्या संदीप देशपांडे टीमचा पुरता फियास्को झाला आणि केलेली स्टंटबाजी मनसे नेत्यांच्याही जिव्हारी लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.