तुकाराम मुंडे जरूर व्हा, पण त्यांचे सगळे गुण आत्मसाद करा!

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा मुख्याधिकाऱ्यांना टोला, शहरात मुख्याधिकारी मुजोरी करत असल्याचा आरोप

मालवण, दि. २३ सप्टेंबर, २०२०: मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यावर उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी निष्क्रियतेचा आरोप केला आहे. शहरवासियांना कोणतीही सुविधा न देता मुख्याधिकाऱ्यांची फक्त स्टंटबाजी सुरू असून प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या स्टाइलमध्ये ते वावरत आहेत. मात्र तुकाराम मुंडे यांचा आदर्श घ्यायचाच असेल तर सगळ्याच बाबतीत घ्या, असा सल्ला देऊन मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा आम्हाला त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल, असा इशारा राजन वराडकर यांनी दिला आहे.

याबाबत वराडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मुख्याधिकारी स्वत:चे शहरात राज्य असल्यागत वागत आहेत. सध्या कोविडने थैमान घातले असताना व मालवण शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्याधिकारी हे सिंगम स्टाइलप्रमाणे फक्त दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानता आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगर नियंत्रण आणण्यासाठी अत्यावश्यक अशा तपासण्या अगर आरोग्य सुविधा नागारीकांना उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडे कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. शहरात मोकाट कुत्रे, गुरांचा त्रास सतत जनतेला होत आहे, त्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्याप मुख्याधिकारी यांनी केलेली नाही. शहरातील रूग्ण संख्या वाढत असताना पालिकेच्यावतीने कोविड केअर सेंटर उभारणी करण्याबाबत कधीही लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्य मुख्याधिकारी यांनी दाखविलेले नाही. किंबहुना त्यासंबंधीचे काही नियोजनही केलेले दिसत नाही. मुख्याधिकारी हे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याप्रमाणे शहरात काम करत असल्याचे दाखवत आहेत. तुकाराम मुंडेचा आदर्श जरूर घ्या पण सगळ्याच बाबतीत घ्या. यासाठी छोटय़ा छोटय़ा दंडात्मक कारवाई अगर दारूडय़ांना पकडण्यासाठी फ्रिस्टाइल पळापळ असे प्रकार करून मटकावाल्यांवर धाड घालण्यात मूळ मुद्द्याला बगल देऊन जनतेची दिशाभूल करू नका. शहरवासियांना सुविधा देण्यासाठी कोणताही अॅक्शन प्लॅन त्यांनी आखलेला नाही. यामुळे मुख्याधिकारी प्रामाणिकपणे काम करत नसून नुसती स्टंटबाजी करत आहेत. शहरवासियांना अभिप्रेत असलेले काम करण्यासाठी मुख्याधिकारी यांना संधी असतानाही ते फक्त आदेश बजावणीत गुंतलेले दिसून येत आहेत.


कंत्राटी कामगारांच्या जिवीताशी खेळण्याचा प्रकारही पालिकेत होत आहे. कंत्राटी कामगारांचे विमा उतरविण्यात आलेले नसतानाही त्यांना करोना बाधित रूग्ण सापडून आलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी पाठवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पीपीई कीट उपलब्ध करून न देता, आवश्यक ती काळजी न घेता त्यांना थेट बाधित क्षेत्रात पाठवण्यात येत आहे. भविष्यात या कामगारांच्या जीवीतास अगर कुटुंबियांना धोका पोहोचल्यास याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहणार आहेत.

करोनाची साथ सुरू होऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटला आणि पुढे किती कालावधी जाईल हे देखील सांगणं मुश्किल असताना शहरासाठी भविष्याचे नियोजन कुठे आहे? नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यात लुटुपुटुचा खेळ सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून मालवणच्या जनतेची केवळ दिशाभूल करण्यात येत आहे. शहरात सातत्याने जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे होते, शहरामध्ये पन्नास बेडचे नगरापालिकेचे स्वत:चे कोविड केअर सेंटर होणे गरजेचे होते, शहरातील नागारीकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी औषध वाटप होणे गरजेचे होते, याकडे मुख्याधिकारी यांना लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता आमच्या संयमाचा अंत होत आहे. वारंवार याकडे लक्ष वेधूनही आपला याविषयाशी काही संबंधच नाही अशा अविर्भावात मुख्याधिकारी वागत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी आमच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा आम्हाला त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल, असा इशारा राजन वराडकर यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.