शासकीय जमीनीवरील खासगी नोंद हटविण्याची आचरा ग्रामपंचायतची मागणी

निवेदनाद्वारे वेधले तहसीलदारांचे लक्ष 

आचरा ( मालवण ) दि. १४ ऑगस्ट, २०२०: शासकीय नोंदवहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३ एकर जमीन शासकीय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खासगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी त्या वापरात येऊ शकत नसल्याने गावविकासासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सदर जमीनीची पुर्नलेखनाखाली सुनावणी करुन सातबारा उतारा शासकीय जमीन म्हणून पुर्ववत करण्याची मागणी आचरा ग्रामपंचायतमार्फत निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार  यांच्याकडे करण्यात आली आहे. याबबतचे निवेदन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर आदी उपस्थित होते.


आचरा गावात शासकीय जमीनी असूनही खासगी मालमत्ता धारकांच्या ताब्यात असल्याने त्यांचा गावविकासासाठी वापर केला जाऊ शकत नसल्याने आचरा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या बाबत चर्चा करून त्या बाबतचा ठराव करत तहसीलदार मालवण यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते. या नुसार मंगळवारी मालवण येथे तहसीलदार यांना आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात पिरावाडीमधील सर्व्हे नंबर १२ ही जमीन समुद्र किनारपट्टी व पुळण क्षेत्र आहे. परंतू या जमीनीच्या क्षेत्रात खासगी व्यक्तींनी कुळवहीवाट दावा क्रमांक २८/२०१९ तहसिलदार मालवण यांच्या न्यायालयात दाखल करुन दिनांक ०३-०४-१९ रोजी कुळ सदरी नाव चढविणे बाबत आदेश केला आहे. परंतू सदर जमीन शासकीय नोंदीनुसार शासकीय दिसत आहे. काही जमीनी खाडी पात्राखाली येत असून या क्षेत्रात सुद्धा काही व्यक्तींच्या नावाच्या नोंदी आहेत. तर काही शासकीय जमीनीवर कुळ सदरी काही फेरफार करून नोंदी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या निवेदनाची तातडीने दखल घेत सातबारा उतारा जमीन पुर्ववत शासकीय करण्याची मागणी आचरा ग्रामपंचायततर्फे करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.