नारळी पौर्णिमेची स्पर्धा रद्द झाली म्हणून काय… या दांपत्याचा असाही आदर्श!
मालवण, दि. ३ जुलै, २०२०: यंदा करोनाच्या संसर्गामुळे गर्दी होणारे सर्वच उपक्रम रद्द झाले आहेत. साहजिकच मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा देखील गर्दी टाळून ठराविक प्रतिनिधींच्या उपस्थितीत साजरी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. त्यामुळे मालवणच्या नारळी पौर्णिमेचं वैशिष्ट्य असणारी नगरसेवक यतीन खोत आणि शिल्पा खोत मित्रमंडळाच्यावतीने घेतली जाणारी महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे या मेगा इव्हेंटचा होणारा खर्च गोरगरीब आणि गरीब व गरजू मुलांच्या सेवेसाठी वापरण्याचा आगळा वेगळा उपक्रम खोत दाम्पत्याने राबवला आहे. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांना खोत दाम्पत्याने मास्क, सॅनिटायझर, धान्य व खाऊ वाटप करून या मुलांना खऱ्या अर्थाने मायेची ऊब दिली.
मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवातील गेल्या काही वर्षांतील विशेष आकर्षण म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत व नगरसेवक यतिन खोत मित्रमंडळ आयोजित महिलांसाठी राज्यस्तरीय नारळ लढवणे स्पर्धा कुठलाही सामाजिक उपक्रम सुरू केल्यावर तो अखंड सुरू रहावा, ही यतीन आणि शिल्पा खोत यांची भावना असते. मात्र करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी यंदा नारळ लढवणे स्पर्धा रद्द करण्यात आली. येथील नारळी पौर्णिमा उत्सवही गर्दी न करता प्रातिनिधीक स्वरूपात होणार आहे. मात्र स्पर्धा रद्द करण्यात आली असली तरी सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या खोत दाम्पत्याने आपल्या सामाजिक कार्यातून वेगळा आदर्श कायम ठेवला आहे. मालवण शहरातील फातिमा काॅन्व्हेंट येथील मुलांना मास्क, सॅनिटायझर, धान्य व खाऊ वाटप करत येथील मुलामुलींसोबत आपला वेळ व्यतित केला. यावेळी साक्षी मयेकर, दिया पवार, गणेश चिंदरकर, दीपेश पवार, अक्षय, दीपेश नार्वेकर यासह कॉन्व्हेंट येथील मुले व स्टाफ उपस्थित होते. खोत दाम्पत्याचे फातिमा काॅन्व्हेंटसोबत नेहमीच आपुलकीचे नाते राहिले असून याठिकाणी मदत व सहकार्य ते नेहमीच करत असतात असे उपस्थितांनी सांगत खोत दाम्पत्याचे कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत