आमदार, डॉ. भाई गणपतराव (आबासाहेब) देशमुख आज त्यांचा ९३ वा वाढदिवस, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
सांगोला विधानसभा मतदारसंघातून ५५ वर्षे आमदार म्हणून ज्यांनी कार्य केले ते आमचे बहुजन समाजाचे दैवत आदर्श सामाजिक व राजकीय नेतृत्व माजी मंत्री सन्मा. आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) (Doc. MLA Ganpatrao Deshmukh) आपणांस ९३ व्या जन्मदिनाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
'एक झेंडा-एकपक्ष-एक मतदारसंघ' अबाधित राखत निष्कलंकपणे निवडून येण्याचा विश्वविक्रम करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील डॉक्टर, विधिमंडळ कामकाजातील कामाचा आदर्श निर्माण करणारे दीपस्तंभ आणि मतदारसंघासह महाराष्ट्राच्या समस्यांची जाण अन् भान ठेवत सदैव जनतेसाठी उपलब्ध असलेले नेते भाई गणपतरावजी देशमुख तथा आबासाहेब यांना दीर्घायुष्य लाभो, (Wish You Many Many Happy Birthday) हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा...!!
१९७० साली नागज येथे वसंतराव दादा पाटील यांच्या उपस्थितीत पाणी परिषद घेतली, अश्या एक ना अनेक आंदोलनामध्ये ते अग्रक्रमाने कार्यरत राहिले. १९६२ मध्ये सांगोला विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आलेल्या गणपतराव देशमुख यांनी तालुक्यावर आपल्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने पकड मिळवली. १९७८ ते १९७९ या काळात ते पुलोद या शरद पवार यांच्या मंत्री मंडळात कृषी मंत्री पदावर कार्यरत होते. १९९९ ते २००१ या काळात ते पणन आणि रोजगार मंत्री म्हणून कार्यरत राहिले.
कापूस एकाधिकार योजना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडून जाहीर करून घेतली. शेतमजुराला किमान वेतन आणि रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ते आग्रही राहिले. दुष्काळी भागातील तालुक्यांना अग्रक्रमाने पाणी मिळावे आणि समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे म्हणून काम करत राहिले. स्व. क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, स्व. आर. आर. पाटील यांच्या साथीने दर वर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीला आटपाडी येथे पाणी परिषदा घेतल्या. टेंभू म्हैशाळ योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. युती शासन काळात या योजना मार्गी लागल्या. १९७८ साली मंत्रिमंडळात असताना नीरा उजवा कालवा फाटा क्रमांक ४/५ मंजूर करून घेतला. सांगोला तालुक्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाकांक्षी शिरभावी पाणी पुरवठा योजना तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मदतीने पूर्ण केला. १९८० साली शेतकरी सहकारी सूतगिरणी सुरू केली महिला सूतगिरणी ही सुरू केली. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य उभे केले.
सांगोला विधानसभा मतदार संघातुन ते १२ वेळा आमदार म्हणून निवडून आले, एकच पक्ष-एकच व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक जनहिताचे कायदे झाले, विरोधी पक्षात राहूनही आपल्या अभ्यासू मार्गदर्शनाने त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात भर घातली. विधानसभा अधिवेशनात त्यांनी सत्ताधारी पक्षाला नेहमी अनेक मुद्द्यावर सळो की पळो करून सोडले. केशवराव धोंडगे, दाजीबा देसाई, दत्ता पाटील, कृष्णराव धुळप, अण्णासाहेब गव्हाणे, प्रा. एन डी पाटील यांनी विधानसभा गाजवून सोडली होती.
विद्यापीठाची डी लीटसारखी पदवी असो अथवा महाराष्ट्र शासनाच्या जीवनगौरव पुरस्काराने ते तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित झाले आहेत. अनेक पुरस्कारांपेक्षा ते नेहमी जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय राहिले आहेत. आपल्या चारित्र्याच्या आणि आचरणाच्या जोरावर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील आदर्श ठरले आहेत. विधानसभेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहून अभ्यास पूर्ण योगदान देणारा आणि जास्त वेळा निवडून येणारा लोक मनातला नेता म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
आज त्यांचा ९३ वा वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
(लेखन आणि संपादन प्रा. लक्ष्मण हाकेसर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत