राज्यातील शेळी-मेंढी व जनावरांच्या सर्व बाजारपेठा सुरू करा, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश (आण्णा) शेंडगे यांची मागणी

मुंबई,  दि. २६ ऑगस्ट, २०२०: गेल्या ६ महिन्यांपासून करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेळी-मेंढी व जनावरांच्या महाराष्ट्रभरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवलेल्या आहेत. वास्तविक पाहता बिइंग महाराष्ट्रातील इतर सर्व बाजारपेठा या सरकारने सुरू केलेल्या आहेत व नुकतीच बससेवाही सरकारने सुरू केलेली आहे. परंतु सरकारने अजूनही शेळी-मेंढी व जनावरांच्या बाजारपेठा सुरू केलेल्या नाहीत.

सर्व बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकरी बांधव व शेळी-मेंढी पालन करणारा धनगर समाज हवालदिल झालेला आहे, यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. यामुळेच सांगोला येथील शेतकऱ्यांनी व धनगर समाजाने ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्याकडे तेथील बाजरपेठ सुरू करण्याविषयी विनंती केली होती.


या पार्श्वभूमीवर प्रकाश आण्णा शेंडगे यांनी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. शेतकरी आणि शेळी-मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजाच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या तसेच हा विषय गंभीर असून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे सांगितलं. या भेटीदरम्यान सुनील केदार यांनी महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा सुरू करण्याविषयी सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले व लवकरच विषयी निर्णय घेणार असल्याचे सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले.

प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्या या अथक प्रयत्नामुळे राज्यातील जनावरांच्या व शेळी-मेंढ्यांच्या सर्व बाजारपेठा लवकरच सुरू होणार आहेत. यामुळे हवालदिल झालेल्या मेंढपाळ बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रकाश (आण्णा) शेंडगे यांनी या भेटीदरम्यान आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की, सरकारने मेंढपाळांना ६ हजाराचे अनुदान जाहीर केले होते, परंतु ते त्यांना मिळत नाही. गेल्या ६ महिन्यांपासून शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी सर्व बाजारपेठा बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्येच सरकारने जाहीर केलेले अनुदान मेंढपाळांना मिळत नसेल तर त्यांनी उदरनिर्वाह कशावर करायचा?


यावर उत्तर देताना सुनील केदार यांनी सांगितले की, करोनाच्या परिस्थितीमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण आलेला आहे. येत्या महिनाभरात सर्व मेंढपाळांना अनुदान दिले जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.