सांधेदुखी
पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात २००च्यापेक्षा जास्त हाडं आणि ह्या हाडांना जोडणारे त्याहीपेक्षा जास्त सांधे आहेत. हे सांधे, सांध्यांमध्ये असलेलं हाड, सांध्यांना धरून असलेले स्नायू, स्नायूतंतू किंवा कुर्चे ह्यांना सूज येणे आणि वेदना होणे, अशी सांधेदुखीची ढोबळ व्याख्या होऊ शकते.
सांधेदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही प्रकार फक्त स्त्रियांमध्ये तर काही पुरुषांमध्येच जास्त आढळून येतात. वयोमानाप्रमाणे बघितल्यास काही त्रास उतारवयात जाणवतात आणि काही त्रास तर चक्क लहान मुलांमध्येच आढळतात (Juvenile Chronic Arthritis). अर्थात, डॉक्टर अशा त्रासाची ईत्यंभूत माहिती घेऊन अचूक निदान आणि योग्य औषधोपचारापर्यंत पोहोचू शकतात.
१. सांध्यांची झीज होणे: Lumpur Spondylosis, Cervical Spondylosis, Osteoarthritis
२. संधीवात: Rheumatoid Arthritis, Ankylosis, Spondylitis
३. युरीक आम्लाच्या जास्त प्रमाणामुळे होणारा आजार: Gout
४. प्रादुर्भावामुळे होणारे आजार: Infective Arthritis
५. स्नायू, स्नायूतंतू किंवा कुर्चे यांना येणारी सूज: Fibromyalgia, Bursitis, Frozen Shoulder
- सांधेदुखीच्या विकारांमध्ये आढळून येणारी लक्षणे
१. मणक्यांची झीज होऊन नसेवर दाब पडल्यास तो भाग दुखणे, हातापायाला मुंग्या येणे, बधीरपणा जाणवणे
२. सांध्याला बाहेरून सूज येणे किंवा गरमपणा जाणवणे
३. कधीकधी दुखरा भाग लालसर दिसतो आणि त्रास जास्तच झाल्यास सांधा आखडण्याची शक्यता असते.
४. काही वेळा ताप येतो, अशक्तपणा जाणवतो, भूक मंदावते, वजन कमी होते.
सांधेदुखीची कारणे :
१. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता, हाडांमध्ये आढळून येणारे कॅल्शियम हे त्यांच्या बळकटपणासाठी कारणीभूत असते. ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचा ठिसूळपणा (Osteoporosis) वाढतो आणि परिणामी हाडांची झीज लवकर होते. हा त्रास स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. ह्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गरोदरपणात आणि बाळंतपणात शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होणे. याबरोबरच वयाच्या चाळीशीनंतर हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो.
२. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता. काही व्यक्तिंच्या गुणसूत्रांमध्येच (HLA B27 / HLA DR4) काही दोष दिसून येतो. त्यामूळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातच कधीकधी विषाणू किंवा जीवाणूंचा प्रादुर्भाव झाल्यास संधीवात होऊ शकतो. हे कारण आपल्याला रक्त तपासणीनंतर कळू शकते.
३. रक्तातील युरीक आम्लाचे (Uric Acid) प्रमाण वाढणे हे देखिल संधीवाताचे कारण होऊ शकते. खाण्यात प्रथिने इत्यादी विशिष्ट पदार्थांचा समावेश जास्त झाल्यास किंवा चयापचयाच्या (Metabolism) प्रक्रीयेत बदल झाल्याने देखिल संधीवात होऊ शकतो.
४. अतीनील किरणांमुळे (Ultraviolet rays) किंवा विशीष्ट प्रकारचे हार्मोन्स अगर काही औषधांचे अतिरिक्त सेवन केल्याने हा त्रास होऊ शकतो.
५. शेवटचे पण खूप महत्त्वाचे कारण म्हणजे मानसिक दडपण.
सांधेदुखीची लक्षणे :
या रोगाच्या प्रारंभी पायाच्या टाचा, गुडघे, हाताची बोटे यांत दुखणे, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे किंवा जळजळ होणे याचा अनुभव होतो. हि लक्षणे दिसल्याबरोबर सर्वप्रथम पोट साफ ठेवणे आणि अपचन होऊ न देणे याचा उपाय करावा.
सांधेदुखीचा त्रास हा सार्वत्रिख आढळणारा आजार आहे. सांधेदुखीचे अनेक प्रकार आणि झीज, रक्तदोष, अनुवंशिकता अशी अनेक कारणे आहेत. आणि हा आजार बरा होऊ शकतो.
डॉ. श्री. नितिन जाधव. संजीवन चिकित्सक. डोंबिवली. 9892306092.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत