लालपरीची चाके रुतलेलीच...

विकास सावंत
९९२२९६०५६७
vikassawant2018@gmail.com

"भैया मुलुख जाके वापीस बंबई आया’’ पण मराठी माणुस मात्र गेले तीन महिने झाले, आपल्या गावी जाण्यासाठी तडफडतो आहे. मायबाप सरकारने परप्रांतीयांना विशेष रेल्वेने, सरकारी खर्चाने, बिस्लेरीची बाटली व फूड पॅकेट देऊन त्यांचे गावी पाठवले. साडेपाच लाख परप्रांतीयांना महाराष्ट्र सरकारने ४४१३६ बसद्वारे पाठवण्याची सोय केली. मात्र मुंबईत १० बाय १०च्या विश्वात अडकलेल्या आपल्या माणसाची जाण्याची सोय मात्र झाली नाही. महाराष्ट्रीयन माणसाला रेल्वेने राज्यांतर्गत प्रवासास परवानगी नाही व "प्रवाशांच्या सेवेसाठी’’ हे ब्रीद वाक्य असलेली लालपरी आंतरजिल्हा वाहतुक बंदीच्या कोलदांडयात अडकलयाने बंद आहे. अशावेळी पैसेवाले लोक अव्वाच्या सव्वा भाडे देऊन खाजगी वाहनाने गावी पोहचले असून गरीब बिचारे गावाच्या ओढीने एसटी सुरू होण्याकडे डोळे लावून बसले आहेत.


आज रात बारा बजेसे’’ या आपल्या आवडत्या स्टाईलने चौकीदाराने अचानक देश लॉकडावून केला. वाहतूक थांबली, उद्योगधंदे बंद झाले, हाताला काम नाही, खिश्यात पैसे नाहीत. अशा अवस्थेत लाखो माणस शहरात अडकून पडली. मुंबईसारख्या शहरात दहा बाय दहाच्या खोलीत हजारो कुटुंबे राहतात. त्यांना सामाजिक अंतर (social distancing) ठेवने शक्य होत नाही. सार्वजनिक स्वच्छता गृहाचा वापर करावा लागतो. कोरोना झाल्यास उपचाराचा खर्च करण्याची त्यांची कुवत नाही. रोज आजुबाजुचे लोक बाधित झाल्याचे पाहून आणि टिव्हीवरील बातम्या ऐकून बायकापोरांच्या काळजीने गरीब माणुस हवालदिल होतो आहे. त्याला गावची ओढ लागली आहे. ज्याची ऐपत आहे तो १५-३० हजार रुपये गाडीभाडे मोजून मुंबई सोडून जात आहे. ऐपत नसलेले लोक एसटी कधी चालू होईल याची वाट पाहत आहेत. कोरोनाची भीती कॅश करत खासगी प्रवाशी वाहतुकदारांची चांदी सुरू आहे. अशावेळी प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या लालपरीची चाके मात्र नाकर्तेपणाच्या गर्तेत रुतली आहेत.

रोज सकाळी झुकेर भैयाच बुक उघडले तर अनेक माणसांच्या पोस्ट दिसतात. कोणी मुंबई पुण्यात ठाण्यात तर कोणी कोल्हापुर, सोलापूर, नागपुरात अडकले आहे. त्यांना गावी जायचे आहे. जिल्हा बंदीमुळे इ-पास मिळेल का? पोलिस कुठे कुठे अडवतात, कसे जाता येईल या विवंचनेत ते चौकशी करत आहेत. परप्रांतीयांसाठी अहोरात्र झटलेल्या सरकारने आपल्याच राज्यात अडकलेल्या आपल्याच लाखो लोकांचा जीव असा टांगणीला लावला आहे. मराठी माणूस सोशिक आहे. तो परप्रांतीयांसारखे रेल्वे स्थानकात गोळा होऊन दंगा करत नाहीत. त्यामुळे त्याची दखल घेण्याची कोणाला गरज वाटत नाही. एसटी सुरू नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सवाले ई-पास काढून सुसाट धावत आहेत. ट्रॅव्हल्सच्या बाधित ‘वडाप’ वाहनांमुळे अनेक लोक प्रवासादरम्यान बाधित होऊन गावी पोहचत आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल व बस सेवा सुरू झाली आहे. रिक्षा, टॅक्सीसेवा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. परंतु महाराष्ट्राची lifeline असलेली एसटी कधी सुरू होणार याबाबत कोणी काही बोलत नाहीत.


सतत तोट्यात असलेल्या राज्य एसटी महामंडळाला लॉकडाऊनच्या काळात दीड हजार कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. महामंडळ आता सात हजार कोटी रुपये तोट्याच्या उंबरठयावर आहे. अगोदर कमी पगार असलेल्या या मंडळातील कामगारांना अर्धा पगार देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. त्याचवेळी खासगी इ-पास प्रवाशी वाहतूक सुसाट सुरू आहे. एसटी कोमात व खासगी वाहतूक जोमात अशी सध्याची स्थिती बनली आहे. खरेतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Social Distancingचे नियम पाळून, Sanitize करून एसटी सेवा सुरू करणे शक्य होते. प्रवास भाड्यापोटी जादा दर देण्याचीही लोकांची तयारी आहे. एसटीच्या माध्यमातून अनेक जण अबाधित आपल्या गावी, आपल्या माणसात जातील. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणांवर ताण कमी होईल. मुंबईत लोकसंख्येच्या घनतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे. सामान्य माणसाला इथला दवाखान्याच्या खर्च परवडणारा नाही. या कारणाने गरीब माणूस रोज आशाळभूत नजरे एसटी चालू होण्याची घोषणेची वाट बघत आहे. एसटी महामंडळाने लवकरात लवकर लालपरीची गाळात रुतलेली चाके गतिमान करून "प्रवाश्यांच्या सेवेसाठी" हे ब्रीद वाक्य खरे करण्याची वेळ आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.