धनगर समाजाच्या नावावर कोणीही विधानपरिषद मागू नये : प्रा. लक्ष्मण हाके

महाराष्ट्र देशा, पुणे, दि. ८ जून, २०२० : महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त काही जागा भरण्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील काही नेते धनगर समाजाला गृहीत धरून आमदारकी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी ते अवश्य करावेत परंतु धनगर समाजाच्या नावावर नव्हे तर वैयक्तिक मेरिटवर करावेत अश्या आशयाचे मत धनगर समाजाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले.
प्रजा समाज असणाऱ्या धनगर समाजाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्यापासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वांनी एखादी दुसरी विधानपरिषद समाजातील एखाद्या नेत्याला द्यायची आणि सर्व धनगर समाजाला गृहीत धरायचे, त्यांच्या न्याय हक्कांच्या
मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे असे आजपर्यंत घडले. अनेक आंदोलने दडपली गेली आहेत, विधानपरिषद या जुन्या पुराणावर धनगर समाजाचा तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे. या महाराष्ट्रात सत्तर पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात निर्णायक स्वरूपाचे मतदान असताना इथला कोणताही प्रमुख पक्ष एखादा अपवाद वगळता विधानसभेचे तिकीट देत नाही. एखादा कार्यकर्ता निवडून आणण्याचा प्रयत्न करत नाही एखादी विधान परिषद द्यायची आणि समाजाच्या अनेक मागण्यांना वाटाण्याच्या अक्षदा लावायच्या हा उद्योग अनेक वर्षे झाली सुरू आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
हाके म्हणाले, ज्यांना सत्तेत जायचे असेल त्या पक्षाने विधानसभेच्या पन्नास जागा धनगर समाजाला सोडाव्यात आणि महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घ्यावी, त्यासाठी धनगर समाजाचा तरुण तन मन धनाने काम करण्यासाठी तयार आहे. ज्यांना विधानपरिषद घेऊन आमदार व्हायचे आहे त्यांनी आपल्या वैयक्तिक मेरिटवर खुशाल आमदार-खासदार व्हावे. आमच्या शुभेच्छा आहेत पण धनगर समाजाला गृहीत धरू नये.
धनगर समाजाच्या तरुणांची मने डावलले गेल्याची भावना तीव्र आहे, त्यांचे प्रश्न मार्गी न लागल्याचे दुःख आहे, बजेटमध्ये कोणताही निधी आज या समाजाला उपलब्द होत नाही, आरक्षणावर कोणताही पक्ष ठोस भूमिका घ्यायला तयार नाही, असे सर्व मुद्दे असताना धनगर समाजातील तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे, असेही मत प्रा. लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले.
साभार: https://maharashtradesha.com/no-one-should-ask-for-legislative-council-in-the-name-of-dhangar-samaj-prof-laxman-hake/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.