धनगर आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स, ० ८, फेब्रुवारी २०१९, औरंगाबाद : धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाज क्रांतीमोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

धनगर समाजाच्या वतीने आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. आता निर्वाणीचा इशारा म्हणून धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने लोकशाही पद्धतीने मुंडण आंदोलन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आरक्षणाची मागणी मंजूर करा, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर असे नाव देऊन अंमलबजावणी करा, धनगर साजाच्या आरक्षण मागणीसाठी बळी गेलेले सामाजिक नेते मनजित कोळेकर यांना शहीद दर्जा द्यावा व कुटुंबास आर्थिक मदत करावी, शेळी मेंढी महामंडळास शंभर कोटी रुपये तरतूद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदेालन करण्यात आले. या मागण्यांची अंमलबजावणी त्वरित झाली नाही, तर धनगर समाज युवक रस्त्यावर उतरून यापुढे उग्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मुख्य निमंत्रक डॉ. संदीप घुगरे तसेच नारायण रहाटकर, दादाराव रोकडे व सुरेश डोळझाके यांनी मुंडण केले. यावेळी संघटनेचे संजय फटांगडे, रवी वैद्य यांच्यासह धनगर समाजातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.