महादेव जानकर लोकसभेच्या मैदानात, बारामतीतून लढवणार निवडणूक ?

महापॉलिटिकस, ० ८, फेब्रुवारी २०१९, पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर उतरणार असल्याची शक्यता आहे. कारण याबाबत स्वतः जानकर यांनी वक्तव्य केलं आहे.  शिवसेना आणि भाजप यांची युतीबाबत चर्चा चालू असली तरी बारामतीतून मीच लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे. बारामतीची जागा राष्ट्रीय समाज पक्षालाच मिळणार असून आणखीही सहा जागांची मागणी मी भाजपकडे केली असल्याचंही जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान बारामती मतदारसंघातून भाजपनं जानकर यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट, महाराष्ट्रात निर्माण झालेला धनगर आरक्षणाचा प्रश्न यामुळे बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी झगडावं लागल्याचं पहावयास मिळाले.

त्यावेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या आघाडीकडून महादेव जानकर यांनी आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 719 मतांनी पराभव केला होता.परंतु आगामी बारामती लोकसभा निवडणूक लढवून सुप्रिया सुळे यांचा पराभव आपणच करणार असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.