वेडात "धनगर" वीर दौडले चारशे!!
"वेडात मराठे वीर दौडले सात" हा शिवकालीन इतिहास आपणास माहीत आहेच, असलाच पाहिजे. गोपीचंद पडळकर साहेब व उत्तमराव जानकर साहेब यांनी धनगर जमात आरक्षणासाठी उचललेले आणि पूर्ण क्षमतेने पेललेले शिवधनुष्य आता प्रस्थापितांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. वर्षांनुवर्षे मुक धनगर जमातीला वाचा फोडण्याचे महत्त्वाचे उन्नत कार्य मा. पडळकरसाहेब, व मा. उत्तमराव जानकरसाहेब या दोन धनगर जमातीच्या सुपुत्रांकडून घडो, यापुढील काळात सुद्धा हे महत मंगल काम करण्याची शक्ती बिरोबा व खंडोबा त्यांना देवोत हीच एकमात्र इच्छा.
मा. पडळकरसाहेब, मा.उत्तमराव जानकर साहेब यांनी धनगर जमात आरक्षणाचे उठवलेले वादळ इतके शक्तीशाली आहे की, त्यामध्ये प्रस्थापित गारद झाले शिवाय राहणार नाहीत. मी माझ्या मागील लेखात सांगितले होते "जो सामान्यांना असामान्य स्वप्न दाखवतो तोच खरा नेता." अखेरचा आरक्षण लढा याद्वारे या दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढला असताना अखंड, सकल महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर जमात बांधवांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून दिली. जमात बांधवांना त्यांच्या अस्तित्वाची आणि स्वतःची ओळख करून दिली. जमातीच्या युवकांना नव प्रेरणा आणि नवसंजीवनी देण्याचं काम या दोघांच्याकडून घडत आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज धनगर जमातीचे युवक ज्यांच्या रक्तामध्ये फक्त जय मल्हार'चा उदघोष आहे. ज्यांचे रक्त सळसळते असे धनगर जमातीचे युवक- युवती अाज प्रस्थापितांविरोधी आरक्षण प्राप्तीसाठी आक्रमक भूमिका घेताना महाराष्ट्राभर दिसत आहेत.
महाराष्ट्राच्या हिंगोली मधून ४०० धनगर जमातीचे घोडेस्वार मनामध्ये आरक्षणाचा नवविचार आणि हातांमध्ये मान. पडळकरसाहेब व मान. उत्तमराव जानकरसाहेब यांनी सोपवलेले शिवधनुष्य घेऊन मुंबईकडे आगेकूच करत आहेत. खरंतर ही वादळा मागची शांतता आहे. अजून मुंबईची मोहीम बाकी आहे. इतके बळ आणि उर्मी धनगर जमातीच्या युवकांना मिळण्याचे एकमात्र कारण आपण दोघेच आहात.
अखंड सकल धनगर जमात आरक्षणाच्या लढाईत उतरली असताना अजूनही काही लोक जे स्वतःला धनगर समजतात, पण ते प्रस्थापितांच्या दावणीला बांधले गेले आहेत. या लेखाच्या माध्यमातून मी अशा स्वार्थी लोकांना सांगू इच्छितो की, अखंड समाज एकवटला असताना आपण मागे राहू नका. प्रस्थापितांची साथ सोडा आणि आरक्षणाचा एक धागा व्हा. मा.पडळकरसाहेब, उत्तमराव जानकरसाहेब यांचे वादळ इतके प्रचंड आहे की, आता ना प्रस्थापितांची कोणती लाट वा परिवर्तनाची कोणती वाट पुन्हा दिसेल असे वाटत नाही. साठ वर्ष जो अन्याय सहन केला. जो जुलूम सहन केला, तो सर्व आक्रोश आता व्याजासह परत देण्याची हीच वेळ आहे. अन्यायाचे, जुलुमाचे परिमार्जन करण्याची याहून वेगळी संधी आपणास या जन्मी लाभेल असे वाटत नाही.
माझ्या प्रिय जमात बांधवांनो आपल्या सर्वांचे अंतिम ध्येय आरक्षण प्राप्त करणे आणि सत्तेमध्ये राज्यकर्ता बनणे हेच असले पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर फक्त या प्रस्थापितांना आपली आठवण येणार हे त्रिकालबाधित सत्य आपणास माहीत असेलच. रात्रंदिन मेंढरा मागे धावणाऱ्या माझ्या बाप्पासोबत एखादा फोटो किंवा धनगराप्रमाणे वेश केला म्हणजे आमच्या आरक्षण प्रश्नाविषयी आपणास खूप तळमळ, धनगर जमातीविषयी आपणास खूप आस्था आणि जिव्हाळा आहे, प्रेम आणि आपुलकी आहे असा खोटा भास जरी आपणाला वाटत असला तरी आपणासारख्या सत्तेतल्या किंवा विरोधातल्या प्रस्थापितांचे खरे रूप अखंड महाराष्ट्रातील दोन कोटी धनगर जमात बांधवांना माहित आहे .
पडळकरसाहेब व उत्तमराव जानकरसाहेब यांनी जागृत केलेली धनगर जमात आता फसणार नाही आणि आम्हाला जो आता फसवायला येईल, त्याला सोडणारही नाही. आता आमच्या जमात बांधवांनी बिरोबा आणि खंडोबा यांची शपथ घेऊन तुम्हाला गारद करण्याचा भंडारा उचललाय. एकच गोष्ट यापुढे लक्षात ठेवा -
"धनगर बांधव नाही शंकर भोळा! अरे उघडलाय त्याचा आता तिसरा डोळा"!
सकल, अखंड दोन कोटी धनगर जमात बांधवांनी आता वज्रमुठ बांधून ठरवले आहे आम्ही आता मोठे करणार फक्त आमच्याच लोकांना, प्रस्थापितांच्या एका एका घरात पाच-पाच आमदार आणि महाराष्ट्रात दोन कोटी धनगर जमातीच्या वाट्याला पाचच आमदार. हा कोणता न्याय आहे? हा कोणाता वाटा आहे? अाजन्म आम्ही तुमच्या प्रस्थापितांचे झेंडे उचलण्यातच धन्यता मानायचे का? माझ्या प्रिय जमात बांधवांनो आता आपण जागृत झालेलो आहोत, संघटित झालेलो आहोत. मा. पडळकर, मा.उत्तमराव जानकरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजन शेवटपर्यंत आरक्षण प्राप्तीसाठी आणि राज्यकर्ता होण्यासाठी लढणार आणि लढतच राहणार यात शंकाच नाही.
प्रस्थापितांच्या सारखे "पांढरे परिस" आणि त्यांच्या सत्तेच्या कुबड्या घेऊन वावरणारे आपले जाणते धनगर जमातीचे नेते यांची किव येते. महाराष्ट्रातील अखंड दोन कोटी धनगर जमातीच्या लोकांना जी साधी, सोपी ,सरळ गोष्ट समजली आहे ती आमच्या वडिलांसम जाणत्या धनगर नेत्यांना का समजू नये हा सोपा प्रश्न आज अखंड धनगर जमातीच्या समोर निर्माण झालेला आहे.
शेवटी या लेखाच्या समारोप प्रसंगी इतकेच सांगू इच्छितो की, वेडात धनगर वीर दौडले चारशे यावरच अापण थांबून चालणार नाही. यापुढेही आपल्याला ही आरक्षण लढाई आणि राज्यकर्ता होण्याचा ध्यास आणखी तीव्र आणि बळकट करावी लागणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाड, याच महाडपासून मुंबईपर्यंत आपण चालत प्रवास करणार आहोत. या अखेरच्या आरपारच्या लढाईत फक्त चारशे घोडेस्वार हे चालणारच नाही. शेवटच्या लढाईमध्ये महाराष्ट्रातून चार लाख घोडेस्वार दाखल झाले पाहिजेत व ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
शेवटी इतकेच लिहावेसे वाटते, माननीय गोपीचंद पडळकरसाहेब आणि माननीय उत्तमराव जानकरसाहेब यांचे हात आपल्याला मजबूत करावे लागतील. अधिक बळकटी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे महाराणी अहिल्यादेवी होळकर मंचाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, त्यासाठी सुद्धा आपल्याला आर्थिक योगदान द्यावेच लागेल. एकच नारा आपण लक्ष ठेवायचा धनगर जमातीच्या उमेदवारास आपले अनमोल एकमत आणि न्यायालयीन लढाईसाठी फक्त आपला एक रुपया! बाकी आपण सर्वजन जाणते आहात, विचारवंत आहात. बघा पटतय का?
जय अहिल्या! जय मल्हार!
सुरेश बिरु रानगे
इचलकरंजी, कोल्हापूर
९४२३३९६४६०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत