मा. गोपीचंद पडळकर - मा. उत्तमराव जानकर ही सिंहरूपी जोडी ठरणार महाराष्ट्रातील धनगर जमातीच्‍या राजकीय उत्कर्षाचा पाया!

गतकाळातील साठ ते सत्तर वर्षांच्या खडतर प्रवासात महाराष्ट्रातील धनगर जमातीने अनेक प्रतिभावंत नेत्यांना निर्माण केले. यामध्ये काही नावे घ्यावी लागतील. मा. गणपतराव देशमुख साहेब, मा.महादेव जानकरसाहेब ,मा. विकास महात्‍मे, मा. प्रकाश शेंडगे, मा. रामहरी रुपनवर, मा.राम शिंदे त्याचप्रमाणे इतर सर्व ज्ञात-अज्ञात अशा सर्व राजकीय पुढाऱ्यांना या जमातीने मोठे केले. या सर्वांवर अखंड धनगर जमातीने भरभरून प्रेम केले. मात्र धनगर जमातीचे हे सिंहरूपी, धुरंधर आणि मातब्बर नेते मात्र प्रस्थापितांचे झेंडे नाचवण्यातच धन्यता मानू लागले. धनगर जमातीचा तेजस्वी, ओजस्वी, जाज्वल्य, स्वाभिमानि आणि अभिमानी इतिहास सांगणार्‍या पवित्र पिवळ्‍या ध्वजाचा मात्र यांनी फक्त स्वतः पुरताच हवा तेवढा उपयोग करून घेतला. आजही अखंड दोन कोटी धनगर जमात आरक्षण आणि सत्ता या प्रभावी मुद्द्यांवर मा. गोपीचंद पडळकर आणि मा. उत्तमराव जानकर यांच्यासोबत पिवळ्‍या ध्वजाखाली एकवटलेली असताना सुद्धा अजूनही आमच्या जाणत्या धनगर नेत्‍यांना, माय-बापांना आरक्षण आणि धनगर जमातीच्‍या राजकीय संघर्षासाठी सर्वांनी एकत्र यावे असे का वाटत नाही? छत्रपती शिवरायांनी अतिशय प्रतिकूल आणि बिकट परिस्थिती असताना सुद्धा स्वराज्याचे देखणे स्वप्न बघितले, जगले आणि साकारले. शिवरायांनी स्वराज्यासाठी परकीयांची गुलामगिरी करणाऱ्या स्‍वकियांमध्ये स्वाभिमानाची व अभिमानाची चाड निर्माण केली. परकियांची गुलामगिरी, लाचारी स्वीकारलेल्‍या सर्वांनी स्वराज्यासाठी प्रस्थापितांच्या ,परकीयांच्या दौलतीवर पाणी सोडून स्वराज्याची कास आणि आस धरली. याचप्रमाणे आमच्या धनगर नेत्यांना अशा आणीबाणीच्या काळामध्ये धनगर जमातीच्‍या राजकीय स्वराज्यासाठी प्रस्थापितांची लाचारी सोडून समाजाशी आणि जमातीशी इमान राखण्याची सुबुद्धी अजून का लाभलेली नाही?


धनगर जमातीच्या साठ वर्षांच्या काळातील राजकीय प्रवासातील मा. गोपीचंद पडळकर व मा. उत्तमराव जानकर यांच्या सारखा दुसरा नेता मी पाहिला नाही. आज महाराष्ट्रातील अखंड दोन कोटी धनगर जमातीच्या सत्ता संघर्षाचा आणि राजकीय उत्कर्षाचा पाया घालण्याचे महत- मंगल कार्य या सिंहरूपी जोडीकडून होत आहे. मागील साठ वर्षांच्या काळातील राजकीय दारिद्र्य आता संपणार आहे आणि मा. पडळकर साहेब व मा. उत्तमराव जानकरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली धनगर जमातीस यापुढील काळात राजकीय संपन्नता, भव्यता आणि दिव्‍यत्ता लाभेल यात शंका नाही. आज माननीय पडळकर व माननीय जानकर साहेब हे अखंड दोन कोटी धनगर जमातीच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत याचे कारण त्यांच्या आश्वासक आणि प्रगल्भ विचारांमध्ये आहे. ज्याप्रमाणे एखाद्या हार स्वीकारलेल्या सैनिकांना लढण्याचे बळ त्या सैनिकांचा सेनापती देत असतो, त्याचप्रमाणे साठ वर्षांपासून पराजित भावनेने सत्ता संघर्षासाठी अखंड प्रयत्न करणाऱ्या दोन कोटी धनगर जमात बांधवांना पेटून उठण्याचे दहा हत्तींचे बळ या दोन सेना नायकांकडून दिले जात आहे. मागील साठ वर्षांतील धनगर जमातीच्‍या माझ्या अनेक पिढ्‍यांनी असा मा. पडळकर व जानकर यांच्‍या सारखा दुसरा नेता पाहिलाच नाही, जो नेता धनगर जमातीच्‍या युवकांना तुम्ही राज्यकर्ते होऊ शकता असा विश्वास ठामपणे देऊ शकेल.

प्रस्‍थापित धनगर नेत्‍यांनी धनगर जमातीचा फक्‍त स्‍वत:ची राजकीय पोळी भाजण्‍यासाठी हवा तेवढा आणि हवा त्‍या वेळेस फायदा उठवला. अखंड धनगर जमात शोषणशील जमात बनली असताना पडळकर व जानकर या महानायकांच्‍या जोडीने सकल धनगर जमातीमध्ये चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केलेले आहे. पुढील काळामध्ये अखंड धनगर जमातीचे महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील प्राबल्य आणि स्थान माननीय पडळकर व माननीय जानकर साहेब या दोघांमुळे नक्कीच उत्तरोत्तर उंचावत जाईल यात शंका नाही. आज पर्यंत अखंड धनगर जमातीची प्रस्थापित धनगर नेत्यांकडे पाहून राजकीय उत्कर्षाची नवआशा मावळल्याचे दिसत होते. अखंड जमातीला काहीसे असेच वाटायचे -

"अरे जावे ज्यामागे बेधडक
असा झुंजार नेता नाही आता,
ठेवावे मस्तक ज्या नेत्यांच्या
चरणांवर असे चरणच नाहीत आता!
सारेच कसे सुस्तावले आता ,
सारेच कसे मस्‍तावले आता!"

महाराष्ट्रातील माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्‍या धनगर जमातीची काहीशी अशीच बिकट मनअवस्था झाली असताना मा. गोपीचंद पडळकर व मा. उत्तमराव जानकर यांच्या रूपाने एक सच्चा नेता अखंड धनगर जमातीला पाहायला आणि ऐकायला लाभला हे धनगर जमातीचे भाग्य आहे. आता यांच्‍या मागे बेधडकपणे जाण्‍यास दोन कोटी जमातीस राईएवढी हि शंका वाटत नाही. काही मतलबी लोक अजूनही सांगत सुटले आहेत की, मा. पडळकर आणि जानकर यांचाही काही ना काही स्वार्थ आहे म्हणून ते इतके धडपडत आहेत.
अशा स्वार्थी लोकांना, समाजाप्रति कृतघ्‍न लोकांना एवढेच सांगावेसे वाटते की, आजवर माझ्‍या धनगर जमातीने अनेकांना मोठे केले, पण त्यांनी जमातीच्या युवकांना कधी राज्यकर्ता, शासक बनण्याचे स्वप्न दाखवले का? मा. पडळकर आणि जानकर यांनी महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या युवकांना आपल्यावर प्रस्थापितांकडून होत असलेल्या गुलामीची जाणीव करून देऊन त्यांच्या उरामध्ये खदखदणारा असंतोष बाहेर काढण्याचं काम या दोन रत्नांनी केले.

आज सद्यस्थितीमध्ये मा. पडळकर - जानकर ही धुरंदर जोडी, बुलद तोफ एका मोठ्‍या फौजेसमानच आहे. अाज ज्‍या प्रकारे अखंड धनगर जमात या दोघांमागे एका अभेद्‍य बुरुजाप्रमाणे उभी आहे ती पाहता येणार्‍या भविष्‍यात हि जोडी नक्‍कीच धनगर जमातीच्‍या राजकीय प्रगतीचा पाया घालेल यात वाद नाही.

शेवटी नेहमीप्रमाणे जमातीचा एकच नारा मनात साठवुया. आपले एक मत धनगर जमातीच्‍या उमेदवारास द्‍या आणि न्‍यायालयीन लढाईसाठी एक रुपया अवश्‍य द्‍या.
जय अहिल्‍या! जय मल्‍हार!

सुरेश बिरु रानगे
इचलकरंजी, कोल्‍हापूर.
९४२३३९६४६०.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.