धनगर आरक्षणाच्या बळकटीसाठी साहित्यिक चळवळ
प्रहार, 28 जानेवारी 2019, शामसुंदर सोन्नर
महाराष्ट्रातील सर्वच समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे ऐरणीवर आले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारने कायदा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर धनगर आरक्षणासाठी ‘टीस’ने दिलेला अहवाल सरकारकडे प्राप्त झाला आहे. या अहवालावर अद्यापही सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. निवडणुकीच्या अगोदर कदाचित राज्य सरकार केंद्राकडे शिफारस पाठवू शकते. एकीकडे शासकीय पातळीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा रेंगाळलेला असताना त्याला बळकटी देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. धनगरांना आदिवासींचे आरक्षण देण्याचा मुद्दा नाही, तर धनगर हे आदिवासी आहेतच. त्यांच्या प्रथा, परंपरा, सामाजिक, आर्थिक मागासलेपण हे आदिवासी परंपरा प्रमाणेच आहे, हे पटवून देण्यासाठी डॉ. अभिमन्यू टकले यांच्या माध्यमातून आदिवासी धनगर साहित्य परिषदेच्या माध्यमातून चळवळी उभी केली जात आहे. या चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून धनगर आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात असून, त्यातून धनगरी आदिवासी परंपरा अधोरेखित केल्या जात आहेत. त्यातून धनगरांचे आदिवासी जीवन सरकारपुढे येईल आणि धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर होईल, अशी आशा धनगर समाजाला वाटत आहे. अर्थात सरकारने हे समजून घेतले, तरच मार्ग निघेल. मात्र, समजूनही ते करण्याची मानसिकताच नसेल तर मात्र धनगर आरक्षणाचा मुद्दा या सरकारला महागात पडू शकतो.

महाराष्ट्रात धनगरांना आदिवासींच्या सवलती लागू करण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळय़ा प्रकाराची आंदोलने सुरू आहेत. मागच्या लोकसभेच्या वेळी धनगर आरक्षणाच्या आंदोलनाची धार अत्यंत तीव्र झाली होती. पंढरपूर येथून धनगर आरक्षण यात्रा निघाली आणि बारामती येथे धनगर समाजाने उपोषण केले. त्यावेळी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री यांनी धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांची भेट घेऊन भाजपचे सरकार आले, तर मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. पुढे राज्यात भाजपचे सरकार आलेही, मात्र गेल्या साडेचार वर्षात धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्यात सरकारला यश आलेले नाही. इतकेच नव्हे तर धनगरांना आदिवासींचे आरक्षण लागू करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल पडत असल्याची कोणतीही हालचाल दिसत नाही. धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी नाही, तर धनगरांना आदिवासींचे आरक्षण आहेच, ते फक्त लागू करण्याचा प्रश्न आहे. इतर राज्यांत धनगरांना आदिवासींचे आरक्षण लागू आहे; परंतु भाषिक उच्चाराच्या फरकामुळे ‘धनगर’ ऐवजी तेथे ‘धनगड’ असा उच्चार होतो. इंग्रजी लेखनात अनेक ठिकाणी ‘र’चा उच्चार ‘ड’ असा होताना दिसतो. इतर राज्यांत जर धनगरांना आदिवासींचे आरक्षण आहे, तर मग महाराष्ट्रातच का नाही, असा धनगर समाजाचा सवाल आहे.
धनगरांना आदिवासींचे आरक्षण लागू करण्यास आदिवासींतील काही लोकांचा विरोध आहे. धनगरांच्या परंपरा या आदिवासी समाजासारख्या नाहीत, असा त्यांचा दावा आहे. हा दावा पुसून काढून धनगर समाजाच्या सर्व परंपरा, त्यांचे राहणीमान, त्यांची दैवते, त्यांच्या लोककला या आदिवासींसारख्याच असल्याचे समाजाच्या निदर्शनास यावे, त्यावर चिंतन व्हावे आणि धनगरांचे आदिवासीपण ठसठशीतपणे अधोरेखित व्हावे, यासाठी डॉ. अभिमन्यू टकले आणि त्यांच्या सहका-यांनी आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन सुरू केले आहे. पहिले धनगर आदिवासी साहित्य संमेलन सोलापूर येथे, दुसरे लातूर येथे, तर तिसरे अलीकडेच म्हसवड येथे पार पडले.
म्हसवड येथील आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या वेळी जी ग्रंथ दिंडी निघाली, त्या मिरवणुकीत धनगरांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर पारंपरिक नृत्य सादर झाली. त्यानंतर दिंडी सभामंडपात पोहोचल्यानंतरही तेथे ‘गज नृत्य’ हे धनगरी नृत्य विविध समूहाने सादर केले. त्यात धनगरांचा इतिहास, त्यांच्या परंपरा आणि ते आदिवासी असल्याचे विविध पुरावे यावर वेगवेगळय़ा परिसंवादातून चिंतन झाले. शोभायात्रा संपल्यावर संमेलनाचे माजी-आजी अध्यक्ष, संगीताताई धायगुडे आणि डॉ. मुरहरी केळे यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार रामहरी सुपनवर, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, रामराव वडकुते, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात शाळा-शाळांनी समूह नृत्यात भाग घेऊन मराठी आणि धनगरी संस्कृतीचे दर्शन घडविले. संधी मिळाली, तर काय होते याची चुणूक येथे पाहायला मिळाली. धनगरी संस्कृतीचे दर्शन जगासमोर आले. जवळपास प्रत्येक गाण्यात, बानू, खंडोबा, म्हाळसा आणि भंडारा यांचे दर्शन होत होते. मुलांनी जागरण, गोंधळ, धनगरी गीत, भलगरी गीत, लावणी हे सर्व प्रकार सादर केले. त्यानंतच्या सत्रात, धनगर धर्मपीठाची गरज, होळकरांचा इतिहास, महिलांचे प्रश्न यावरील परिसंवाद व कवी संमेलन उत्तम पार पडले.
तिस-या दिवशी समारोपाला, खासदार छत्रपती उदयनराजे व मंत्री राम शिंदे यांची भाषणे झाली. आरक्षणाच्या न्यायालयीन लढय़ाचे प्रमुख मधू शिंदे यांनी त्यांच्या लढय़ाची बाजू मांडली. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी, सद्गुरू यल्लालिंग महाराज, श्री. बाळासाहेब कर्णवर, नारायण शेषागिरीराव. डॉ. अभिमन्यू टकले, जहागीरदार श्रीमंत अमराजीत सरकार बारगळ, आर. एस. चोपडे, संभाजीराव सुळ, हणमंतराव चवरे, उत्तमराव खांडेकर, कृष्णा बुरूंगुले, अमोल पांढरे, देवीदास ऊर्फ बापू हाटकर आदींनी मोलाचे प्रयत्न केले. धनगरांना आरक्षण देण्याचा विषय नाही, तर त्यांना असलेले आदिवासी आरक्षण लागू करण्याची गरज आहे, असा सर्व वक्तव्यांच्या भाषणांचा सूर होता. राज्य सरकारने केवळ धनगड आणि धनगर एकच असल्याने त्यांना आदिवासींच्या सवलती लागू कराव्यात, अशी शिफारस केंद्राला करण्याची गरज आहे. ते अत्यंत सोपे आणि सरळ आदिवासी आरक्षणाचे उत्तर आहे. मात्र, एखादा प्रश्न सरळ सुटला, तर त्याचा तितका राजकीय लाभ घेता येत नाही. म्हणूनच धनगर आरक्षणाचा मुद्दा किचकट बनविला जात आहे. तो सुलभ करण्याचे काम डॉ. अभिमन्यू टकले आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल, अशी धनगर समाजाला आशा वाटत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत