भाजप सरकारची सत्ता उलथवू

म. टा., १४ , जानेवारी २०१९,  हातकणंगले : 'धनगर समाजाला आरक्षणासाठी सत्तर वर्षे अनेक सत्ताधारी मंडळींनी फसवले. आता पुन्हा तीच कारणे देऊन फसविण्यासाठी सज्ज झालेल्या भाजप सरकारच्या बुडाखाली जाळ लावणे गरजेचे असून, प्रस्थापित राजकारण्यांची लंका आता जाळायची वेळ आली आहे. भाजप सरकारला समाजाने भीक न घालता फक्त धनगर समाजाच्या मतांमुळे सत्तेवर आलेल्या मग्रूर सरकारने समाजाला महिन्याभरात एसटी आरक्षणाचा दाखला न दिल्यास सरकारविरोधी आरपारची लढाई सुरूच राहील,' असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीनाथ पाडळकर यांनी दिला.


पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे धनगर समाजाच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या धनगर समाज आरक्षण परिषदेत ते बोलत होते.

पाडळकर म्हणाले, 'काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपची मंडळी खोटी आणि लबाड आहेत. या सत्ताधारी भाजपला सत्तेत पुन्हा यायची स्वप्ने पडू लागली आहेत. धनगर आरक्षणाची लढाई कोल्हापुरातून सुरू झाली असून, ती आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला मतदानाचा अधिकार वापरून बटन दाबून निर्ढावलेल्या भाजपला धडा शिकवायची वेळ आली आहे.'

समाजाचे नेते उत्तमराव जानकर म्हणाले, 'समाजाच्या आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे. सर्वच सरकारनी आरक्षणासाठी वेळोवेळी धनगर समाजाची फसवणूक केली असून, ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ही समाजक्रांतीची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील. आता समाजाने आरक्षण मिळाले नाही तर 'अब की बार.. नक्कीच मोदी फरार' या घोषवाक्यांनी भाजपचा नायनाट करण्यासाठी समाजाने सज्ज राहावे.'

यावेळी धनगर समाज बांधवांनी सरकारविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी गोपीचंद पडकळकर यांच्या हस्ते धनगर समाजाच्या उपस्थित नेत्यांना यशवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आरक्षण परिषदेसाठी संदीप कारंडे, उपसरपंच धुळा डावरे, सिद्राम भाणसे, लक्ष्मण पुजारी, राणोजी पुजारी, नारायण मोठे, बाबूराव हजारे, नागेश पुजारी, राजू दलवाई, तात्यासाहेब हराळे, कृष्णात शेळके, स्वप्निल नांगरे, अभिजित कोळेकर, आदीसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते. संदीप कारंडे यांनी आभार मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.