महान क्रांतिकारक: संगोळी रायान्ना
(सदर लेख लिहिताना विश्वाचा यशवंत नायक या मासिकातील एस. एल. अक्कीसागर यांच्या लेखाचा खूप उपयोग झाला.)
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात
महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण
महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वत: चा गौरव कुणाला आवडणार नाही.
त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके
असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या.
स्वत:चा
गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही.
या संकुचित प्रवृत्तीनीच छ. शिवराय आणि
महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना महाराष्ट्रापुरते
संकुचित करून टाकले. त्यांचा आदर्श, त्यांचे चरित्र इतर राज्यातील
लोकांपर्यंत नीट पोहचू दिले नाही. आपला सामाजिक, राजकीय स्वार्थ
साधण्यासाठी या महामानवांच्या नावाचा, कर्तुत्वाचा दुरुपयोग केला गेला.
परिणामी या महामानवांच्या कर्तुत्वाला जे राष्ट्रीय आणि सर्वसमावेशक स्वरूप
लाभायला पाहिजे होते ते लाभले नाही. त्याच प्रमाणे दुसऱ्या राज्यातील
महामानवांचे कर्तृत्वही महाराष्ट्रातील जनतेला समजू दिले नाही. एकीकडे भारत
एकसंध राहावा असे तोंडाने बोलून दाखवायचे आणि दुसरीकडे इतर राज्यांना फक्त
भूगोल आहे म्हणून त्यांचा गौरवशाली इतिहास नाकारायचा अशी दुटप्पी खेळी या
तथाकथित विद्वानांनी खेळली. त्यामुळे महाराष्ट्राला ज्याप्रमाणे छ.
शिवरायांचा इतिहास आहे त्याप्रमाणे कर्नाटकला ही राणी चेनम्माचा इतिहास आहे
हे आपण विसरून गेलो. निदान आतातरी बहुजन समाजाने देशातील सर्व
महामानवांच्या कर्तुत्वाचा योग्य तो गौरव करायला हवा. आजवर जे महापुरुष
उपेक्षित राहिले त्यात कर्नाटक मधील संगोळी रायन्ना यांचा क्रमांक फार वरचा
आहे. कर्नाटक वगळता इतर ठिकाणी बहुतांशी लोकांनी संगोळी रायन्ना हे नावही
ऐकलेले नसणार. त्यामुळे संगोळी रायन्ना यांच्या उज्वल कार्याची थोडक्यात
ओळख महाराष्ट्रातील लोकांना करून देत आहे.
संगोळी रायन्ना हे भारतातील प्रमुख
स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तूर
(कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा/धनगर कुटुंबात झाला.
रायान्ना यांचे घराणे पूर्वीपासून सैन्यात होते. त्यांचे आजोबा कित्तूरच्या
सैन्यात सरदार होते. लहानपणापासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी
होते. याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटीशांविरुद्ध लढताना झाला.
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटीशांशी निकराची झुंज दिली.
ब्रिटीश राजवटीविरुद्ध सलग सतत 6 वर्षे लढून, ब्रिटीश राजवटीला ‘ सळो की
पळो ‘ करून सोडणाऱ्या आणि वेळोवेळी संकटात आणणाऱ्या क्रांतीकाराकापैकी एक
अशा महान क्रांतिकारकाचे, आद्य स्वराज्यनायकाचे नाव ‘ रायान्ना ‘
रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध
पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा, अनेक गावाचा पाठींबा मिळाल्याने
ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती. रायान्नाने पोर्तुगीझाकडून ( गोवा ),
कोल्हापूर संस्थानकडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी पाठींबा मिळण्याचा
प्रयत्न हि केला होता. रायान्ना नायकाला पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, अमिषे
ब्रीटीशांनी जाहीर केले होते. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही, कारण
प्रजेची साथ रायान्नास होती. १ जानेवारी १८२९ रोजी रायान्ना नायक ने आपल्या
३०० साथीदार आणि बिचगुत्ती गावच्या जनता सैन्यासह ब्रिटीशांविरुद्ध लढा
दिला. ८ जाने. १८२९ रोजी खानापूर मिलिटरी कॅम्पवर हल्ला करून गावच्या चावडी
जाळून टाकल्या. कित्तूर, देवरहल्ली, खुदानपूर या गावातील बाजारांवर हल्ला
करून धन लुटले. बिडी संपगावच्या तालुका कार्यालयावर हल्ला करून तिजोरी
ताब्यात घेतली. रायान्नाने ब्रिटीश सरकारचे खजिने लुटून जनतेस वाटले ,
ब्रिटीश सैनिक कॅम्पवर जोरदार हल्ले केले, पुणे – मुंबई पोस्टल सेवा बंद
पाडल्यामुळे ब्रिटीश सरकारला रेवेन्यू गोळा करून मुंबईला पाठविणे फार कठीण
झाले. रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध उभी केलीली हि स्वराज्य चळवळ हि
आजच्या कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा व आंध्र प्रदेशाच्या काही भागात जावून
पोहोचली होती. गोरगरीब समाजातील, सर्व जाती-धर्मातील साथीदारांना बरोबर
घेवून रायान्ना संघर्ष करीत होते. बाळू नायक, भिमाप्पा जीद्दीमनी, बापू
भंडारी, बसलीन्गाप्पा, गजवीर, यच्चारप्पा, गुंडण्णा यांनी त्यांना मोलाची
साथ केली. ब्रिटिशांनी या भारताचे आद्य स्वराज्यनायकाच्या कार्याची नोंद
आपल्या फाईल मध्ये करून ठेवली.
कित्तुरचे युद्ध
धारवाड आणि बेळगाव दरम्यान असलेल्या
कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा
यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन
झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि
गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला
मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. ५ डिसेंबर १८२४
रोजी कित्तुरू किल्ल्यावरील स्वराज्याचा ध्वज उतरवून ब्रिटीशांनी युनियन
ज्याक फडकवला. स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध
पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः
घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती
होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु
दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले.
तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला. त्यानंतर मात्र संगोळी
रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब,
सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर
हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना
लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी
रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले.
सावकारशाहीविरुद्ध संघर्ष
कित्तुरचे संस्थान ब्रिटीशांनी ताब्यात
घेतल्यानंतर रायान्ना सह सर्व प्रामाणिक सरदारांची हकालपट्टी करण्यात आली.
ब्रिटिशांच्या वतीने कुलकर्णी गावचा कारभार पाहू लागले. शेतकी, मुलकी,
सारापट्टी गोळा करण्याची जबाबदारी कुलकर्ण्यावर होती. जे लोक सारा देणार
नाहीत त्यांच्यावर कुलकर्णी अत्याचार करत असे. गरीब शेतकऱ्यांना मारहाण
करणे, त्यांचा अमानुष छळ करणे अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळलेल्या
प्रजेच्या मदतीला रायान्ना धावून आला. ब्रिटिशांबरोबर संघर्ष करता करता
स्वकीय सावकार, कुलकर्णी यानाही रायान्ना शासन करू लागला. परिणामी त्या
भागातील सावकारशाही आणि कुलकर्ण्याचे अत्याचार यांना चांगलाच चाप बसला
होता.
परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील
कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले.
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला
होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी
शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून
लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या
स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना
खरोखर थोर क्रांतिकारक होते. १८ जून १८३० रोजी रायान्ना नायक आणि त्याच्या
३०० साथीदारांवर लुटमार, खून, जाळपोळ आणि राजद्रोहाचे खटले दाखल केले
गेले. १६ डिसेंबर १८३० रोजी रायान्नाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २६
जानेवारी १८३१ रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नंदगड येथे
रायान्ना यांना फाशी देण्यात आले. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे.
या समाधीस भेट देण्यास, दर्शन घेण्यास फार दूरच्या खेडोपाड्यातील राष्ट्रीय
समाजातील विविध जाती – जमातीचे लोक येतात. रायान्ना’सारखा शूरवीर पुत्र
वाहवा आमच्या पोटी व्हावा, असा नवस नवविवाहित करून, प्रतिक म्हणून समाधी
जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे येथे बांधतात.
त्यांच्या संघर्षाचे मोल मात्र आम्ही साफ
विसरून गेलो. बहुजन समाजातील अनेक क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्या
वाट्याला ही उपेक्षा आली. प्रस्थापित लेखणीबहाद्दर इतिहासकार, लेखक यांनी
बहुजन समाजातील कर्तुत्ववान माणसांचा गौरव केला नाही. त्यांना जाणूनबुजून
उपेक्षित आणि दुर्लक्षित ठेवले. त्यामुळे दलित, आदिवासी समाजातून पुढे
आलेल्या आणि आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर उज्वल कामगिरी केलेल्या अनेक
महामानवाच्या पदरी अवहेलना आली. या महान माणसांच्या कर्तुत्वाला जातीची,
धर्माची, भाषेची, प्रांतांची काटेरी कुंपणे लावून त्यांचे कार्य सीमित
केले. कर्नाटक मध्ये मात्र काही प्रमाणात त्यांच्या स्मृती जपण्याचे कार्य
सुरु आहे. हुबळी येथे संगोळी रायन्ना यांचा १३ फुटी ब्रांझ चा पुतळा आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर संगोळी रायन्नाच्या कार्याचा
प्रसार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. संगोळी रायन्ना यांच्या
कार्यावर एका चित्रपटाचीही निर्मिती करण्यात आली आहे. संगोळी रायन्ना यांचे
कार्य फक्त कर्नाटक पुरते मर्यादित न ठेवता त्याला सर्व भारतभर
पसरवण्यासाठी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे.
२६ जानेवारी हा संगोळी रायन्ना यांचा
स्मृतीदिन. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचीही पर्वा न करता अखेरच्या
श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत