धनगरांची ओवी गीतं

प्रा. तानाजी ज्ञानदेव पाटील
मानवी संस्कृती ही मानवाची निर्मिती असल्यामुळे मानवाने तिला वेळोवेळी निरनिराळया पर्वात व अवस्थांमध्ये दिशा व आकार दिला आहे. संस्कृती स्वत:च्या स्वयंगतीने बदलत व वाढत गेली. संस्कृती म्हणजे समाजाची जगण्याची रीत व शैली होय. तिच्यावर अनेक घटकांचा व शक्तींचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे ती वेगवेगळे आकार व वळणे घेत असते. तिला भूतकाळातील सातत्य लाभते.
जीवंत वनस्पतीप्रमाणे संस्कृती एक सजीव वस्तू असून, तिला वाढायची स्वत:ची जणू अंत:प्रेरणा व स्वयं गतिमानता आहे.सुप्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ लेवीज मुनफोर्ड या संस्कृत चिंतकाने संस्कृतीचा मूलगामी सखोल अभ्यास करताना म्हटले आहे. मानव समाज व संस्कृती यांची वाढ व विकास हा क्रमाक्रमाने, वेगवेगळ्या अवस्थांतून होत असतो. संस्कृती हा शब्द काहीसा मूल्यनिरपेक्ष तटस्थ असतो. संस्कृती केवळ एक जीवन पद्धती म्हणून जर तिच्याकडे पाहिले तर जगातील सर्वच लोकांच्या विविध संस्कृती सारख्याच मानल्या जातात. पण, बऱयाच वेळा असंस्कृत व सुसंस्कृत असा फरक माणसाच्या वागण्यात, प्रवृत्तीत व सवयीत करण्यात येतो.
समाजातील व्यवहारीक शहाणपण, कला, कौशल्य, प्रामाणिकपणा, पारदर्शकता, वाड्:मयता, तंत्रज्ञान, शास्त्र, भाषा, लिपी, ओव्या, गीते, इत्यादींचे सुस्थितीतील दर्शन, संस्कारांचे श्रवण, निरिक्षण आणि त्यानुसार त्यांच्या कलाकृत्ती घडविणे अशा बहुपेढी परिवर्तनवादी कार्यप्रणालीला संस्कृती असे म्हणावे लागेल. थोडक्यात, कुठल्याही समाजातील संस्कृती ही भ्रामक कल्पना नसून ती त्या समाजातील बदल मूर्त स्वरूपात आणायला लावणारी संकल्पना होय.
मराठी लोकसंस्कृती ही अनेकविध वैशिष्टयांनी नटलेली आहे. ही संस्कृती जोपासण्याचे काम खऱयाअर्थाने भटक्या लोकांनी केलेले दिसते. वास्तविक, पाहता आपण सर्वजन लोकसंस्कृतीचे उपासकच आहोत. लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोककला जोपासण्याचे काम भटके लोक करीत असताना दिसताता. यामध्ये वासुदेव, गोंधळ, वाघ्यामुरळी, पोतराज, जोगतीन, कंझारभट, बेलदार आणि धनगर असे अनेक भटके लोक सांगता येतील. आजही खेडय़ा -पाडयांतून व शहरात सुद्धा या भटक्यांचे दर्शन घडले. त्यांची गीते आजही लोकजीवनात प्रचलित आहेत. लोकांच्या मनावर चांगले संस्कार करणे, लोकसंस्कृतीचे महत्व पटवून सांगणे समाज परिवर्तन करणे, समता, स्वातंत्र्य व बंधूभाव निर्माण करणे या आदर्श गुणांमुळेच त्यांच्या गीतांना प्रयोगमुल्य लाभलेले असते.
या एकूण भटक्यांच्यामध्ये धनगर समाज देखील आपल्या कला कौशल्याने ओवीगीतांच्या माध्यमातून लोकसंस्कृती जोपासताना दिसून येतो. उदाहरणार्थ फुगडी, उखाणा, कोडी, देव-देवतांवर गीते, सामाजिक व कौटुंबिक गीते या अशा अनेक माध्यमातून आपल्या बुद्धीकौशल्याने अशिक्षित असून देखील सुंदररीत्या ओवीगीते सादर करून समाज परिवर्तन करण्याचे काम प्रामाणिकपणे करतो. त्यांची ओवीगीते असंख्य पाहता येतील, पण आपण इथे उदाहरणादाखल काही ओवीगीतांचा विचार करणार आहेत.
करमत नाही मला
पत्र देते तुला
रडू नको माझ्यासाठी
माझ्या गुलाबाच्या फुला
भल्लरी दादा भल्लरी…
एकमेकाविषयी असलेला जिव्हाळा, प्रेम, अतूट आहे. दोघांमध्ये विरह आला की, एकमेकांवाचून करमत नाही. विरहामध्ये जरी ताटातूट झाली असली तरी. धनगर प्रियेशी आपल्या धनगर प्रियकराला रडू नको म्हणून पत्राद्वारे समजावते. दोघेही पत्रातून एकमेकांशी संवाद साधत असलेले दिसून येतात.
पंढरपुरचे गोसावी बुवा।
माझ्या साळुच्या घरी गेलतात का ?।
माझी साळु खुशाल हाय का ?।
हाई पण हाई: तिची सासुच मेली ।
बरी मेली: तरी मेली ।
मांगातली मांगीन : होती गं माय ।
साळुला माझ्या गांजीत होती गं माय ।।1।।
पंढरपुरचे गोसावी बुवा ।
माझ्या साळुच्या घरी गेलतात का ?।
माझी साळु खुशाल हाय का?।
हाय पण हाय, तिची नणंदच मेली।
बरी मेली : बरी मेली।
हाडुळीतली हाडुळीन, होती गं माय, ।
साळुला माझ्या गांजीत होती गं माय।।2।।
पंढरपुरचे गोसावी बुवा ।
माझी साळु खुशाल हाय का ?।
हाय पण हाय : तिचा सासराच मेला ।
बरा मेला, बरा मेला
सरणातला सरप, होता गं माय।
साळुला माझ्या गांजीत होता गं माय ।।3।।
वरील ओवीगीतांतून विनोद व उत्तम असा संवाद साधला आहे. धनगर स्त्रीला इतर स्त्रियांप्रमाणे सासुरवास असतो. पितृसत्ताक कुटुंब पद्धतीमुळे धनगर स्त्रीला कुटुंबामध्ये दुय्यम स्थान असते. सासरी सासू, नणंद आणि सासरा छळ करीत असतात. पोटाला साधे पोटभर जेवण देखील मिळत नाही. दिवस दिवस कष्टाची कामे आणि चालताबोलता सतत सासूचे टोमणे खावे लागते. या छळाबाबत आई रात्रंदिवस काळजी करत असते. म्हणून आई गोसाव्याजवळ आपल्या धनगर मुलीची खुशाली विचारत असते. गोसावी आणि आई यांचा संवाद धनगर स्त्रीने गीतांतून हुबेहुब मांडला आहे.
आपुन दोघी सोबतीनी, एक पान खाऊ
इंग्रजी साळत शिकायला जाऊ
इंग्रजी साळत बत्तीस मुलं
आपापल्या बहिणीला गुलाबाची फुलं
गुलाबांच्या फुलांचा घमघम वास
आत्याची पोरगी मॅट्रीक पास
नवऱयाला म्हणती भांडी घास
नवरा उठला दणक्यांनी
लाथ बसली खणक्यांनी….
धनगर मुलीच्या फुगडीच्या गीतातुंन विविध प्रसंग, विनोद दृष्टीने येत असतात. गावातील इतर समाजातील मुली शिकलेल्या पाहून त्यांना विशेष नवल वाटते. आपण सुद्धा इंग्रजी शाळेला शिक्षण घेण्यासाठी जावं असे त्यांना सतत वाटते. आत्याची मुलगी मॅट्रीक पास झालेली असल्यामुळे नवरा तिचे सर्व काम करत असतो. ती नवऱयाला भांडी घासायला सांगते. पण नवऱयाला तो आपला अपमान वाटतो. त्यामुळे तो बायकोच्या कमरेत लाथ घालतो.
इथे परंपरा किती माणसाच्या मनात घट्ट रुजलेल्या असतात याचे दर्शन वरील गीतांतून घडते.
इठ्ठला-इठ्ठला, कधी येता ना माझ्या घरां
माझ्या घरी शेळ्या-मेंढय़ा
तुमच्या घरी पताका दिंडय़ा
इठ्ठला-इठ्ठला, कधी येता ना माझ्या घरां।
माझ्या घरी दाळीदुळी
तुमच्या घरी वनमाळी..
वरील गीतांतून धनगर समाजानुभूतीची दृष्टी दिसून येत असल्यामुळे धनगर समाज जीवनाचे दर्शन अशा प्रकारच्या गीतांतून होताना दिसते. धनगर स्त्रिया भजनामध्ये सेत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांचे लिखित अभंग म्हणत नाहीत तर लोकपरंपरांनी चालत आलेली लोकसंस्कृतीतील गीते म्हणताना दिसतात.
सुंबरानं मांडिलं गा, सुंबरान मांडिलं
सुंबरानं मांडिलं, बिरु गा देवाचं
धरतरी मातेचं, मेघराया पित्याचं
चांदसूर्या बंधूचं , चांदसूर्यादोघांच
महाराष्ट्र धनगर लोकजीवनात सुंबरान, या धनगरी आख्यानामध्ये स्वत:चे असे आगळे-वेगळे स्थान आहे. गाणं, नाचण आणि वाजविणं, या तिन्ही कलांचा सुमेळ सुंबरानमध्ये दिसून येतो. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पहावयास मिळणाऱया धनगर या जाती समुहातील एक विशेष गायन प्रकार म्हणून सुंबरान हे आख्यान काव्य आजही ओळखले जाते. ओवीच्या छंदातील या रचना प्रकाराला मराठी लोकगायनातील महाकाव्य म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण सुंबरान मधून जी ओवीबद्ध लोकाख्यानं म्हटली जातात ती प्रदीर्घ अशा कथेवर आधारीत असतात. ही कथा लोककथेच्या जातकुळातीलच असते. ही आख्याने गद्य-पद्य स्वरुपात गायली जातात. लोककथा, नाटय़ आणि संवाद यांच्या साह्यानेच सुंबरान आकार घेत असते.
देवा नारायणा एकच माझं मागणं
मला पाईजे सौभाग्याचं मरण,
दागिनं-दुगिन्याची
नार झाकून घेती गळां
हळदी- कुंकवाचा
नित्य उघडा पान-मळा…
धनगर स्त्रियांना सौभाग्याचं प्रतिक असलेले कपाळीचं कुंकू ही त्यांना महत्वाचा दागिना वाटतो. बाकीचे दागिने नसले तरी चालतील, परंतु कपाळीच्या कुंकवाला जपणारी इतर हिंदू स्त्रिायांसारखी ही स्त्री आहे. म्हणूनच ती या कुंकवाविषयीची आपुलकी गीतांतून व्यक्त करते.
मांडवाच्या दारी का गं वरमाई येती-जाती
बंधुच्या आहेराची वाट चोरुन पाहती…
शिंप्याच्या दुकानात
बंधू बसला भोळा राजा
तेज्या जीवावरी
उच घडिला हात माझा..
अशी अनेक गीते स्त्रीच्या मुखातून अगदी सहजतेने बाहेर पडतात. घरची परिस्थिती अगदी गरिबीची असली तरीदेखील अशा शुभप्रसंगी गरिबीवर मात करून आहेर हा आपलाच आहे हे वरील गीतातून स्पष्ट होते.
अशारीतीने धनगर स्त्री-पुरुषाच्या ओवी गीतांतून वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवनाबरोबरच तिच्या धार्मिक, सांस्कृतिक जीवन विशेषांचेही विविध पैलू ओवीगीतांतून अभिव्यक्त होताना दिसतात. यामध्ये तिचे धर्माचरण, देवावरची श्रद्धा, व्रत वैकल्य आणि नवस इत्यादींच्या समावेश होतो. त्यांची प्रत्येक ओवी गीते लोकसंस्कृती जपताना दिसतात. कुठेही भडकपणा, अश्लिलपणा दिसत नाही. जे आहे ते सत्य या भूमिकेतून गीतांतून मांडणे आणि समाजाची लोकसंस्कृती कशी आहे, कशी नाही हे बोली भाषेतून व्यक्त करणे, यामुळे त्यांची ओवीगीते आजही तितकीच महत्वाची ठरतात.
धनगर स्त्री-पुरुषांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांची एकूण गीते ही राधा-कृष्ण, विठ्ठल-रुक्मिणी, विठ्ठल-बिरदेव, खंडोबा-बाणाई, राम-सिता, धुळोबा-भिवाया या देवदेवतांची दिसून येतात. यातूनच एकमेकांविषयीचा आदर, प्रेमभाव, सहकार्य वृत्ती वाढीस लागण्यास खऱया अर्थाने मदत होते. पूर्वीच्या आणि सध्याच्या संस्कृतीवर लोकसंस्कृतीचा प्रभाव परंपरेने पडत असलेला दिसून येतो. तसेच कृषिगीते, विधिगीते, डोहाळ, पाळणे, लग्नसमारंभातील गीते, बारसे, जन्म या सर्वांतून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. पिढय़ान्-पिढय़ांच्या सांस्कृतिक प्रथा आजही पहावयास मिळतात. जुने ते सोने, या प्रथेप्रमाणे धनगरांनी या प्रथा धार्मिक भावनेतून, श्रद्धेतून टिकविल्या आहेत.
संदर्भ :
1. सौ. हाके लक्ष्मी हरिबा : कारंडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
2. सौ. खरात बाळाबाई भगवान : करातवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
3. सौ. मोटे सुरेखा अशोक : गोळेश्वर, ता. कराड, जि. सातारा.
4. सौ. पुकळे स्वाती विलास : पुकळेवाडी,ता. माण, जि. सातारा.
5. तत्रैव
6. शेंडगे दत्तात्रय मारुती : कराड, ता. कराड, जि. सातारा.
7. हुलवान इंदुबाई आकाराम : कर्वे, ता. कराड, जि. सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.