पानिपत शोकांतिकेची दुसरी बाजू…
पानिपत युद्धास यंदाच २५०
वर्ष पुर्ण झालीत. या युद्धाने मराठ्यांची कधीही भरुन न येणारी हानी झाली.
घरटी बांगडी फुटली, एवढा संहार या युद्धात झाला. त्याचा दुखरा सल आजही
मराठी बांधवांत आहे.
पण पानिपतचे युद्ध ही एकाएकी घडलेली घटना
नव्हती. अशा संहारक घटना एकाएकी होत नसतात. मराठे आणि मोगलांचा जो शिवाजी
महाराज व औरंगजेबानंतर सामाजिक/सांस्क्रुतीक/राजकीय तत्वद्न्यानाचा जो
क्रमश: -हास होत गेला
त्याची अपरिहार्य परिणती म्हणुन पानिपत युद्धाकडे
पहायला हवे. ताराराणीनंतर इकडे छत्रपती नामधारी बनून पेशवे सर्वोपरी बनले
तसेच तिकडे औरंगजेबानंतरचे पातशहा वजीराहातची कठपुतळी बनले.रयतेसाठी
म्हणुन राज्यकर्ते असतात ही भावना शिवोत्तर काळात जवळपास नष्ट होत गेली.
मराठा सरदारांची स्वतंत्र बेटे बनत गेली. उत्तरेतही जवळपास असेच झाले.
केंद्रीय सत्ता क्रमशा: नामशेष होत गेली.
मराठी इतिहासकारांनी नादिरशहाच्या १७३९
मधील आक्रमणाकडे जवळपास दुर्लक्षच केलेले आपल्याला दिसते. त्याला निमंत्रीत
करण्यात मोठा वाटा होता तो शाह वलीउल्लाह या कट्टरपंथी जिहादी विचारांच्या
हाजीचा. भारतातील मुस्लीम हे हिंदुंच्या साहचर्याने अजलाफ (हीण) बनले
आहेत, त्यासाठी सच्चा मुस्लिमांचीच देशावर सत्ता असावी असा प्रचार तो करत
असे. नादिरशहाचे आक्रमण न्रुशंस आणि रानटी होते. कर्नाळ येथे झालेल्या
युद्धात खुद्द पातशहाला अटक होण्याची वेळ आली. मुस्लीम सरदार/वजीरांतील
स्वार्थलोलुपतेमुळे नादिरशहा दिल्लीपर्यंत पोहोचला. हजारो दिल्लीवासी ठार
मारले गेले. मोगलांनी ३८० वर्ष जमवलेली संपत्ती नादिरशहाने एका झटक्यात
लुटली. या धक्क्यातुन मोगल कधीच सावरले नाही.
आणि याच परिस्थीतिचा फायदा मराठ्यांना
झाला. एरवी जे अशक्यप्राय होते ते साध्य करण्याची संधी मराठ्यांना मिळाली.
तख्ताची मांडलिकी करत (पहिले शाहू महाराज महाराष्ट्रात आले तेच
मांडलिकीच्या सनदा घेवून.) राहिले. आधीच निर्बल-कंगाल-लुटल्या गेलेल्या
प्रांतांवर स्वा-या करणे, रयतेजवळ जे उरले-सुरले आहे तेही लुटने हा
मराठ्यांचा एकमेव उद्योग बनला. त्यामुळे उत्तरेत मराठे रयतेच्या मनात कधीही
आत्मीयतेचे स्थान मिळवू शकले नाहीत, हे वास्तव आजही अनुभवाला येते. याचा
फटका पानिपत युद्धात बसला. ज्या तख्तासाठी म्हणुन ते पानिपतवर लढायला गेले,
त्या तख्ताचे त्यावेळीचे स्वयंघोषित दोन्ही पातशहा दुरुन तमाशा बघत बसले.
एकही मुस्लिम सरदार त्यांच्या बाजुने आला नाही….याचे एकमेव कारण म्हणजे
मराठ्यांची पराकोटीची स्वार्थलोलुपता आणि त्याआधारीत सोयीचे राजकारण.
१७५२ मद्धे नादिरशहानंतर पुन्हा शाह
वलीउल्लाहच्या जिहादी प्रेरणेने अब्दालीने पहीली स्वारी केली. दुस-या
स्वारीच्या वेळीस सफदरजंगाने पातशहाच्या वतीने मराठ्यांशी अहदनामा
(तख्ताच्या रक्षणाचा करार) केला. नंतर याच प्रकरणी सफदरजंगालाही दुखावले.
पुढे अब्दालीने तीन वेळा भारतावर स्वा-या केल्या, दिल्ली लुटली…लुट घेवून
गेलाही…पण मराठे अहदनामा पाळायला आले नाहीत. एकदाही अब्दालीशी भिडले नाहीत.
हा एका प्रकारे अहदनाम्याचा भंगच नव्हता का?
मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले याचा
आपल्याला खुप अभिमान वाटत असतो…पण त्यांत काही पराक्रम होता असे इतिहासातुन
दिसत नाही. अब्दालीने चार वेळा स्वा-या करुन पार नागवलेल्या, उध्वस्त
केलेल्या प्रदेशात घुसणे हे खरे तर राजकीय आणि आर्थिक दु:साहस होते. आणि
त्याचे फळ हे कि अटकेपार झेंडे रोवुनही राघोबादादा कोटभराचे कर्ज करुन आला.
आणि ते स्वाभाविकही होते. राघोबादादाला नानासाहेब पेशव्यांनी या
कर्जप्रकरणी दोष दिला. नवी लुट मिळायला अब्दालीने काहीतरी सोडायला तर हवे
होते ना याचा तारतम्यभावाने नानासाहेब पेशव्यांनी विचार केल्याचे दिसत
नाही. पुढे पानिपतच्या मोहिमेतुन त्यांचे नाव वगळले हे सर्वस्वी अन्याय्य
होते. राघोबादादाला उत्तरेचा अनुभव होता आणि तो लढवैय्या तरी होता…पण
त्य्याच्या ऐवजी फडावरच्या कागदोपत्त्री मुत्सद्दी भाऊंची निवड या
युद्धासाठी केली गेली याबद्दल शेजवलकरांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे आणि
ते संयुक्तिकही आहे. भाऊला प्रत्यक्ष युद्धाचा कसलाही अनुभव नव्हता.
दरम्यान मराठा सरदारांतही फुटीचे चित्र
निर्माण होवू लागले. शिंदे-होळकरांत वैमनस्य निर्माण झाले. जातीयवाद
बोकाळला. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची ठिणगी तेथेच पडली. “एक नजिब खली
राहिला आहे….त्याचे पारिपत्य कराल तर पेशवे तुम्हास धोतरे बडवावयास
लावतील…” असे जुन १७५८ च्या पत्रात मल्हारराव होळकरांनी दत्ताजी शिंदेस
लिहिले. तर पेशव्यांनी अन्यत्र “शुद्र मातला आहे…” असे नमुद केले. याचा
अर्थ मराठ्यांत कोणत्याही धोरणाबाबत एकवाक्यता नव्हती. जातीय गंड निर्माण
झाले होते…बलाढ्य सरदार पेशव्यांना जुमानत नव्हते…असते तर नजिबखान रोहिला
तावडीत सापडल्यानंतर राघोबादादाची इछ्छा त्याला ठार मारण्याची असतांनाही
केवळ होळकरांच्या अभयदानामुळे त्याची मुक्तता झाली नसती…कदाचीत पानिपत
युद्धही मग झालेच नसते.
अहदनामा झाल्यापासुन तीन वेळा अब्दालीने
स्वा-या करुनही तिकडे न फिरकलेले पेशवे याच वेळीस का गंभीर झाले आणि
भाऊसाहेबांच्या व विश्वासरावांच्या नेत्रुत्वाखाली एवढे सैन्य तिकडे
पाठवले? जर बुराडी घाटातील धामधुमीत दत्ताजी शिंदे अपघाती पडले नसते तर
पेशव्यांनी हे पाऊल उचलले असते की नाही हा एक प्रश्न आहे.
पण लढायचे होते काय?
पानिपतच्या युद्धाचा सारा घटनाक्रम पाहिला
तर भाऊला खरोखर अब्दालीशी भिडायचे होते असे दिसत नाही. पानिपतचे युद्ध हे
अपघात होते असे नाईलाजाने म्हणावे लागते. या स्वारीत भाऊ लाखो यात्रेकरु व
बुणग्यांचे ओझे घेत अत्यंत संथपणे प्रवास करतांना दिसतो. त्याला युद्धाची
घाई दिसत नाही. उलट अब्दाली गेल्या वेळीस जसा परभारे निघुन गेला तसाच
याहीवेळी जाईल अशी आशा त्याला असल्याचे दिसते. या काळात तो अन्य मुस्लिम
सरदार ते हिंदू राज्यकर्त्यांना युद्धात सामील होण्याचे आवाहन करणारे खलिते
मात्र पाठवतांना दिसतो. शिवाय त्याला आपल्या सरदारांत मनैक्य नाही याचीही
जाण असलेली दिसते. ज्या शुजाउद्दौल्ल्याच्या अयोध्या प्रांतावर दत्ताजी
शिंदे खंडणीसाठी नजिबाच्या मदतीने स्वारी करायला निघाला होता, त्याच शुजाला
आपल्या बाजुने वळवण्याचे वा त्याने तटस्थ रहावे असे प्रयत्न करतांना भाऊ
दिसतो. पण ज्याचा बाप, सफदरजंग, मराठ्यांच्या स्वार्थलोलुपतेमुळे हाय खावुन
मेला तो मराठ्यांच्या बाजुने उभा राहील ही अपेक्षाच चुकीची नव्हती काय?
पण ज्या तख्ताच्या रक्षणासाठी भाऊ येवढा
सरंजाम घेवून निघाला होता, त्याच तख्ताचा मराठ्याना मान्य असलेला पातशहा
अली गौहर मात्र बिहारमद्धे जावुन तमाशा बघत राहीला होता. त्याने मराठ्यांना
मदत करावी असा तख्ताच्या सरदारांना एकही आदेश काढला नाही. इकडे मराठे
उपासमारीने मरु लागले होते. जनावरे दानापाण्याअभावी मरत होतीच. पोटाला
मिळावे म्हणुन कुंजपु-यावर हल्ला केला. केवळ येथे आणि येथेच, ज्या
इब्राहिमखान गारद्याची पलटनी सेना आणि तोफखाना कामाला आला. खुद्द पानिपत
युद्धात त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.
कुंजपु-यात एक विजय काय मिळाला मराठे
निघाले कुरुक्षेत्राकडे तीर्थयात्रा करायला. याच दर्म्यान २५-२६ ओक्टोबर
१७६० ला अब्दालीने पराकोटीचे साहस करुन बागपतजवळ पुराने अलांघ्य झालेली
यमुना ओलांडली. तेंव्हा मराठे सोनपतजवळ होते. अब्दालीने यमुना ओलांडली या
वार्तेने मराठ्यांना एवढी धडकी भरली कि ते जे पळत सुटले ते सरळ पानिपत येथे
येवून पोहोचले. पानिपत हे युद्धस्थळ पुर्वनियोजित नव्हे तर अपघाताने
स्वीकारावे लागलेले एक संकट बनले ते असे.
येथे मराठ्यांनी जवळपास अडीच महिने तळ
ठोकला. अब्दालीवर मात करण्याच्या मराठ्यांकडे आधी सुविधा होत्या….संध्याही
होत्या. याही प्रदिर्घ काळात भाऊ सर्वकश युद्धाच्या योजना न करता तहाचाच
प्रयत्न करतांना दिसतो. त्याच वेळीपण सरदारांतील जातीय तेढींमुळे एकदा
अब्दालीला पराजित करण्याची संधी गमवावी लागली. एकेक सरदार व्यक्तिगत लढला
तर दुसरे काय होणे अपेक्षित होते? बळवंतराव मेहेंदळ्यानी केवळ इरेला पेटुन
हकनाक प्राण गमावले व आधी विजयाची संधी असतांना शिंद्यांना मदत केली नाही
याचे प्रायश्चित घेतले…पण मराठ्यांना त्याचा लाभ काय झाला?
पलायन
पलायन
१४ जानेवारी १७६१ रोजी मराठे जिंकु किंवा
मरु या भावनेने अब्दालीच्या सेनेवर तुटुन पडले हे खरे नाही. सत्य सांगते ती
आदल्या रात्रीची सर्वांची मसलत: “गिलच्यांचे बळ वाढत चालले. आपले लष्कर
पडत चालले……तेंव्हा हा मुक्काम सोडुन बाहेर मोकळे रानी जावे…दिल्लीचा राबता
सोडुन दुसरीकडे जाउ…पण झाडी मोठी मातब्बर….गिलचा जावू देणार नाही…यास्तव
बंदोबस्ताने निघावे.” म्हणजे निकराच्या युद्धाचा बेतच नव्हता. करायचे होते
ते सुरक्षीत पलायन. आणि अशा सुरक्षीत पलायनासाठी इब्राहिमखान गारद्याने
विलायती पद्धतीच्या गोलाची कल्पना सर्वांना समजावुन सांगीतली. होळकर त्याशी
सहमत नव्हते. पण भाउंचा गारद्यावरच सर्वाधिक विश्वास होता. त्यामुळे
त्याचीच कल्पना मान्य झाली. दुस-या दिवशी गोलाची सुरक्षित रचना करुन मराठे
यमुनेच्या दिशेने सरकु लागले. गारद्याचे ऐकले असते तर कदाचित एवढी हानीही
झाली नसती. पण विलायती पद्धतीच्या गोलाची वैशिष्ट्ये न समजलेले विट्ठल
शिवदेव व दत्ताजी गायकवाड गोल मोडुन अमीर बेग व बरखुरदाराच्या वाट अडवायला
आलेल्या सैन्यावर तुटुन पडले. गारद्याचा तोफखाना मग कुचकामी ठरला.
हातघाईच्या लढाईला तोंड फुटले. असे काही होईल याबाबतीत अनभिद्न्य असलेल्या
भाऊने कसलीही पर्यायी योजना बनवलेली नव्हती. उलट युद्ध ऐन भरात असतांन
होळकरांना निघून जायला सांगीतले. साबाजी शिंदे, खानाजी जाधव, जानराव वाबळे
असे सेनानीही त्यामुळे निघुन गेले व सुरक्षीत सटकले. सेनापती म्हणुन भाऊची
ही गंभीर चुक होती. पुढे काय झाले हे सर्वद्न्यातच आहे. मराठे या युद्धात
नंतर ज्या शौर्याने लढले त्याला जागतीक इतिहासात तोड नाही, पण योजनाच नीट
नसल्याने विनाश आणि पराजय अपरिहार्य झाला.
मराठ्यांची या युद्धात अतोनात हानी झाली.
मोगल तर मोडकळीस आलेच पण अन्य हिंदु सत्तांनाही नवी राजकीय पोकळी भरुन
काढता आली नाही. नागपुरकर भोसल्यांचा अशाच चुकामुळे बंगालमद्धे पाय
रोवलेल्या इंग्रजांना संधी मिळाली. दिल्लीच्या तख्ताचे पारतंत्र्य जावुन
इंग्रजांची गुलामी स्वीकारायची वेळ आपल्यावर आली. कारण देशाचे एकंदरीत
राजकारणच भरकटत गेले. धर्म-जातीय विग्रहाची बीजे तिकडे शाह वलीउल्लाहने
पेरली, तशीच इकडे मराठेही फक्त “मराठे” न राहता जातीयतेत अडकत गेले त्याची
ही एक अपरिहार्य राष्ट्रीय शोकांतिका होती.
इतिहास हा शिकायचा असतो तो त्याचे
उदातीकरण करत आपल्या सुप्त भावनांना मलम लावण्यासाठी नव्हे तर त्या
इतिहासाचे तटस्थ आकलन करुन घेत त्यातुन बोध घेण्यासाठी. पण आपण काहीच शिकलो
नाहीत हे आजही ज्या पद्धतीने जातीवाद/धर्मवाद फुलवला जात आहे त्यावरून
लक्षात येईल. आपण नवे पानिपत घडवण्याचा चंग तर बांधला नाहीय ना?
-संजय सोनवणी
(“….आणि पानिपत” या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक.)
९८६०९९१२०५
-संजय सोनवणी
(“….आणि पानिपत” या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक.)
९८६०९९१२०५
साभार http://sanjaysonawani.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत