…तर पानिपत झालेच नसते

सर्वसंहारक पानिपत युद्धाला यंदा 251 वर्षं झाली आहेत. तरीही या शोकांतिकेचा सल मराठी मनमानसातून अद्याप गेलेला नाही. ज्या वीरांनी या अकल्पनीय अशा युद्धात रक्त सांडले त्यांना आदरांजली वाहत मुळात हे युद्ध झालेच का? या प्रश्नाचा ऊहापोह येथे करायचा आहे. या युद्धापूर्वी आणि बुराडी घाटावर दत्ताजी शिंदेंच्या वीरमरणानंतर मल्हारराव होळकर भाऊसाहेब पेशवा उत्तरेत येईपर्यंत मल्हारराव नेमके काय करत होते हे इतिहासातील दुर्लक्षित ठेवले गेलेले प्रकरण आपल्याला मल्हारराव होळकरांच्या 319 व्या जयंतीनिमित्त पाहायचे आहे.अब्दाली 1759 मध्ये पाचव्यांदा चालून आला.
खरे तर मराठय़ांनी पातशाही रक्षणाचा अहदनामा 23 एप्रिल 1752 रोजीच केला होता. त्यानंतरही 1756 मध्ये अब्दाली चवथ्यांदा चालून आला होता, पण नानासाहेब पेशव्याने होळकर-शिंदे या सरदारांना मोहिमांसाठी दक्षिणेत बोलावलेले असल्याने मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी तिकडे जाऊ शकले नाहीत. एका अर्थाने तो
करारभंग होता. पाचव्यांदा अब्दाली चालुन आल्यानंतर भाऊसाहेब पेशवा आणि स्वतः विश्वासरावांनी उत्तरेकडे मोहीम काढावी यामागे नेमके काय कारण होते? रघुनाथरावांना, ज्यांना अटकेच्या मोहिमेमुळे उत्तरेची आणि तिकडील राजकारणाची जाण होती त्यांना का पाठवले नाही? अटक मोहिमेत रघुनाथराव कोटभरचे कर्ज करून आले म्हणून त्यांना उत्तरेकडे पाठवायला नानासाहेब पेशवे तयार नव्हते असा निर्वाळा शेजवलकर देतात. पण ते खरे आहे काय?
आणि कोणाला उत्तरेच्या मोहिमेवर पाठवायचे याचा खल करून भाऊसाहेबांची नियुक्ती करत भाऊ उत्तरेत पोहोचेपर्यंत तिकडे होळकर आणि बुराडी घाटावर जखमी झालेले जनकोजी शिंदे काय करत होते? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि येथे या प्रश्नांची थोडक्यात उपलब्ध पुराव्यांनुसार उत्तरे तपासायची आहेत.
बुराडी घाटावर युद्धात दत्ताजी शिंदेंचा झालेला अपघाती मृत्यू हा एकार्थाने मराठेशाहीवर मोठा आघात होता. प्रत्यक्षात शिंदे आणि होळकर यांच्यात वैमनस्य निर्माण होईल अशा घटना घडूनही होळकर आणि शिंदे उत्तरेतील पेशव्यांचे राजकारण सांभाळण्यासाठी होळकरांच्या औदार्यशील स्वभावामुळे एक राहिलेले दिसतात. खरे तर दत्ताजीच्या मृत्यूमुळे शिंदेंची बाजू कमजोर झाली होती. तरीही मल्हारराव होळकरांनी सुरजमल जाटाची मदत घेत शिंद्यांसह 14 जानेवारी 1760 ते 28 फेब्रुवारी 1760 या काळात गनिमीकाव्याने वेगवेगळ्या पद्धतीने चढाया करत पार सिकंदराबाद ताब्यात घेत अब्दालीच्या नाकावर टिच्चून चौथाई वसुल केली. अब्दालीने अशा हल्ल्यांची अपेक्षा केली नव्हती. अब्दालीच्या खजीना लुटला जायची वेळ आली होती. त्यामुळे कंटाळून त्याने शेवटी मल्हाररावांकडे तहाचा प्रस्ताव पाठवला. अनेक चर्चा होत 13 मार्च 1760 रोजी तहही झाला… अब्दालीचा नजीबला असलेला पाठिंबा लक्षात घेऊन शिंदे-होळकरांनी हाफिज रहमतखानामार्फत तोड ठरवली, की नजीबचा प्रदेश त्याच्याकडे कायम ठेवून अब्दालीला मार्गस्थ करावे. या बोलण्यात गंगोबातात्या ( होळकरांचा कारभारी ) आणि हिंगणे म्हणजे पेशव्यांचा दिल्लीतील वकील – यांचा सहभाग होता. तहाच्या वाटाघाटी चालू होत्या तेव्हा मल्हारराव होळकर भरतपूर येथे होते. सुरजमल्ल जाटदेखील मध्यस्थी करू लागला होता. नजीबकडे असलेला प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या अटीवर अब्दाली-मराठे यांच्यात तह घडून आला.
पण तेवढय़ात उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीवर भाऊची नेमणूक झाल्याची बातमी आली आणि नजीब घाबरला. तेव्हा अब्दाली छावणी उठवून परत निघालेला होता, परंतु घाबरलेल्या नजीबने त्यास येथेच राहण्याची गळ घातली. परिणामी हा करार फिसकटला. 12 जून 1760 रोजी रोजी मल्हारराव होळकर लिहितात, गिलच्यांच्या फौजेतून हाफिज रहमतखान भरतपुरास आला. गंगाधरपंतांशी (बहुतेक गंगोबा तात्या) बोलत आहे. नजीबखानाने सलुखाचा संदर्भ चालविला आहे, पण आमचे विचारानुरूप बनत नाही. (मराठी रियासत – खंड 4)
पानिपत युद्धाचे नवीन भाष्यकार संजय क्षिरसागर यांनी जे पुरावे समोर आणले आहेत जे मराठी वाचकांना अज्ञात होते ते मननीय असेच आहेत. प्रा. मधुकर सलगरे यांनीही पानिपत युद्धाबाबतची जी साधने वापरली आहेत त्यातूनही वरील विचारांना आणि माहितीला पुष्टी मिळते.
आता 13 मार्च रोजी अब्दालीशी तह झाला आहे. या तहानुसार नजीबाला त्याचा प्रदेश तसाच मिळणार असून दिल्लीची पातशाही व्यवस्था सुरजमल जाटाच्या इच्छेनुसार होणार आहे हे पक्के झाल्यानंतर अब्दालीला भारतात राहण्याचे कारण उरले नव्हते. तसेच भाऊलाही उत्तरेत मोहीम करण्याचे कारण उरले नव्हते. आणि अब्दाली परत जायला निघालाही होता.
पण कदाचित भाऊला ही माहिती उशिरा मिळाली असावी कारण तो 14 मार्च 1760 लाच उत्तरेकडे निघालाही होता. रघुनाथराव पेशवा हा किमान होळकरांच्या ऐकण्यातील होता, नजिबाचे प्राण त्यामुळेच वाचलेही होते. पण भाऊचे तसे नव्हते, तो होळकरांचा द्वेष्टा असल्याने जर अब्दाली निघून गेला तर आपली खैर नाही हे माहीत असल्याने नजिबाने इस्लामची वाह-उलि-उल्लाहप्रणित दुहाई देत अब्दालीला थांबवून ठेवले.
रघुनाथराव पेशवा आणि होळकर यांच्यात सख्य आहे आणि रघुनाथरावांची राज्यत्रुष्णा पाहता होळकरांच्या मदतीने ते उत्तरेत स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करतील अशी भीती नानासाहेबांना सतत वाटत होती. भाऊची उत्तरेसाठीची नियुक्ती त्याचाच परिपाक. त्यामुळे मल्हारराव होळकरांचा कोणताही सल्ला भाऊ ऐकणे शक्यच नव्हते आणि झालेही तसेच. पूर्ण पानिपत प्रकरणात भाऊने होळकरांचा एकही सल्ला न ऐकता नव्यानेच सेवेत रुजू झालेल्या इब्राहिमखान गारद्याचाच भरवसा धरला. तरुण जनकोजीलाही विचारात घेतले नाही. इब्राहिमखान प्रस्तुत गोलाची लढाई एक प्रकारे हाराकिरी ठरली.
या युद्धाच्या तीन दिवस आधीपर्यंत (11 जानेवारी 1761) भाऊसाहेब पेशवा अब्दालीशी तहाच्या वाटाघाटी करत होता. सरहिंदेची सीमा आणि दिल्लीच्या पातशहाची नियुक्ती या मुद्दय़ांबद्दल तह अडकून बसला होता. युद्धखर्च हाही एक मुद्दा होताच. महत्त्वाची बाब अशी आहे, की मुळात होळकरांनी आणि शिंद्यांनी 13 मार्च 1760 रोजी अब्दालीशी जो तह आधीच केलेला होता त्यातील अटी जवळपास अशाच होत्या. त्या आधीच मान्य करत भाऊने संशयी स्वभाव बाजूला ठेवला असता तर त्याला सुखनैव सर्व तीर्थयात्राही करता आल्या असत्या आणि हवे तर बंगालवरही स्वारी करता आली असती. पानिपत घडलेच नसते!
पण या 13 मार्च 1760 च्या आधीच झालेल्या तहाबाबत इतिहासकार मौन बाळगत असतात हेही खरे! आज मल्हारराव होळकरांची 319 वी जयंती. त्यांना विनम्र अभिवादन.
– संजय सोनवणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.