बिरोबा (बन) मंदिर कलशारोहण समारंभाचा चौथा वर्धापनदिन
बिरोबा बनात व्हावे 'सांस्कृतिक संग्रहालय'
शनिवार दि. २२ ऑगस्ट, २०२०: सोमवार, २२ ऑगस्ट, २०१६ हा दिवस आरेवाडी येथील बिरुदेवाचे पुजारी आणि भक्तभाविक यांच्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे. कारण साडेतीनशे एकरांच्या बनात काशिलिंगाचं भव्यदिव्य मंदिर उभारावे आणि त्याच्या शिखरावर कांबळ्याचे निशाण फडकवून सोन्याचा कळस लागावा, ही वाडवडिलांची इच्छा अन् संकल्पपूर्ती करणारा हा सोनेरी दिवस आहे. बिरोबाच्या मंदिरावरील सोनेरी कळसाने प्रत्येकाचे डोळे दिपत होते आणि तितकाच आनंद चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. याच डोळे दिपवणाऱ्या आनंदी दिवसाचा आज चौथा वर्धापनदिन... त्यानिमित्त थोडेसे...
५०-६० वर्षांपूर्वी आरेवाडीतील पुजाऱ्यांनी बिरोबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता. पण तो काही अडचणीमुळे सिद्धीस गेला नाही. त्यानंतर पुढे शिवाजीराव (बापू) शेंडगे यांनी मंत्रीपदी निवड झाल्यानंतर १९९१ मध्ये बनात झालेल्या मेळाव्यात मंदिराच्या जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. त्यानंतर पायाखुदाई करून १९९६ पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पुढे अनेक अडचणींवर मात करत २०१६ साली म्हणजेच दोन दशकांनंतर मुख्य तिन्ही मंदिरांची (बिरोबाच्या, मायाक्का व कामादेवी) बांधकामे पूर्ण झाली. दरम्यान अनेक कर्तीधरती माणसं निवर्तली गेली. स्व. सामाजरत्न शेंडगेबापूंच्या पश्चात जयसिंग (तात्या) शेंडगे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, पुजारी, भक्तभाविक आणि दानशूर मंडळी यांच्या अथक प्रयत्नांनंतर २२ ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी एक वाजता रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने सोनेरी कलशाचे अनावरण करण्यात आले. तो दिवस खरोखरच डोळ्याचे पारणे फेडणारा होता. मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई... फुलापत्रींनी सजवलेला सभामंडप... हेलीकॉप्टरमधून केलेली पुष्पवृष्टी... ढोल कैताळांचा निनादासह कैपतनृत्याची झलक... भंडाऱ्याने पिवळा झालेला आसमंत... नेते पुढाऱ्यांची भाषणे... गोड प्रसादाचा आस्वाद... अशा भक्तिमय वातावरणाने भरलेला आणि भारलेला तो क्षण आणि दिन अविस्मरणीयच होता.
मुख्य तीन मंदिराच्या बांधकामानंतर इतर छोट्या छोट्या मंदिरांची बांधकामे दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर मागील वर्षभरामध्ये काही प्रमाणात बांधकाम सुरू होते. पण गेल्या पाच महिन्यांपासून करोनाच्या संकटामुळे बांधकाम पूर्णपणे ठप्प आहे. तरी सध्या कोळेकर पुजाऱ्यांच्या स्मारकांची बांधकामे म्हणजेच धुपे देवांची बांधकामे सुरू आहेत. बिरोबाच्या देवस्थानला सध्या तीर्थक्षेत्राचा ब दर्जा असून, याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेतून विविध पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या निधीपैकी बराचसा निधी रखडल्यामुळे ओवऱ्यांसह (पोवळी) काही कामे सध्या ठप्प असल्याचे समजते. त्यासाठी सध्याच्या सरकारमधील मंत्रीमहोदयांकडे सदर निधी मिळवण्यासाठी देवस्थानकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या प्रयत्नातून मंदिर परिसरात सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे.अशा या विकासाच्या मार्गावर असलेल्या बिरुदेवाच्या प्रांगणामध्ये पशुपालक समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे एक भव्य असे 'सांस्कृतिक संग्रहालय'' निर्माण व्हावे, असे अनेकांकडून बोलले जात आहे. कारण आरेवाडी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्त्वाचे केंद्र असून येथे विविध राज्यातील लाखो भक्त भाविक एकत्र येऊन सांस्कृतिक व धार्मिक महोत्सव साजरा करत असतात. तसेच या मंदिर परिसरात आवश्यक असणारी जागा देखील येथे उपलब्ध होऊ शकते. "भारतीय समाज व्यवस्थेमधील विशिष्ट समाज घटकाच्या संस्कृतीची आठवण करून देणारे संग्रहालय म्हणजे सांस्कृतिक संग्रहालय होय." यातूनच सांस्कृतिक वारसा जतन होण्यास मदत होऊन विविध वस्तू व प्रसंगांच्या आठवणींना उजाळा मिळत असतो. यामुळे जुन्या वास्तू, वस्तू व ठेवा प्रदर्शनी मांडल्याने समाज शिक्षण होण्यास मदत होते. तसेच अशी संग्रहालये ज्ञान केंद्र ठरत असतात.
असे असावे संग्रहालय
यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कलाकृती साकारलेल्या असायला हव्यात, म्हणजेच भारतीय पशुपालक समाज, त्यांची भटकंती, दैवते, जीवनप्रणाली तसेच सांस्कृतिक वारसा अर्थात लोककला यांचे चित्र, छायाचित्र व शिल्पाकृतीच्या माध्यमातून दर्शन घडविले पाहिजे. तसेच यामध्ये अनेक ऐतिहासिक साधने यांचेही मांडणीवजा प्रदर्शन साकारले जावे. तसेच यामध्ये बिरुदेवाची अख्यायिका चित्रबद्ध करण्याची संकल्पना मध्यवर्ती ठेवून हे संग्रहालय निर्माण व्हावे, म्हणजेच यातून पशुपालक संस्कृती उत्तम प्रकारे साकारली जाईल. ही संकल्पना सर्वप्रथम मुंबईतील कैपतनृत्य मंडळाचे प्रमुख आकाराम कोळेकर यांनी बोलून दाखवली आहे. त्यानंतर काहींनी काळाची गरज असल्याचे बोलून दाखविले. तर अनेकांनी असे संग्रहालय आरेवाडीच्या बिरोबा बनात होणे भविष्याचे अत्यंत महत्त्वाचे असून याकामी सर्वांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली.
बिरोबा बनातील उपलब्ध होणारी प्रशस्त जागा, दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक परंपरा आणि भविष्यात वाढणारी गर्दी या सर्वांचा विचार करता असे सांस्कृतिक संग्रहालय बनण्यासारखी ठिकाण उभारणे, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरणार आहे. पण यासाठी स्थानिक प्रशासनाकडून राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. तसेच भक्तभाविक व समाज बांधवांनी देखील याकामी योगदान देणे आवश्यक ठरणार आहे.
शब्दांकन
दाजी कोळेकर
आरेवाडी (नवी मुंबई)
Great job
उत्तर द्याहटवा