सहा सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन; तर नऊ ठेका मजुरांना घरचा रस्ता!

एक वरिष्ठ स्वच्छ्ता निरीक्षक, एक लिपिक तथा प्रभारी स्वच्छता निरीक्षक व एक मुकादम यांना कारणे दाखवा नोटीस
वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांची धड़क कारवाई


विरार, दि. १७ जुलै, २०२०: वसई-विरार महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात कार्यरत सहा सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे व ९ ठेका मजुरांना सेवेतून कमी करण्याचे आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांवर कामचुकार व गैरहजर राहत असल्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. तर बेजबाबदारपणाबद्दल एक वरिष्ठ स्वच्छ्ता निरीक्षक, एक लिपिक तथा प्रभारी स्वच्छता निरीक्षक व एक मुकादम यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गंगाथरन डी. यांनी वसई-विरार मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.

वसई-विरार शहर महानगरपालिकेने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून करोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एकूण ४६६ कायम सफाई कर्मचाऱ्यांपैकी २०० सफाई कर्मचाऱ्यांची व ठेका पद्धतीने घेतलेल्या ठेका मजुरांची महानगरपालिकेच्या अलगीकरण व विलगीकरण केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक करण्यात आली आहे; परंतु या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रात हजर झालेले नाहीत. तसेच काही कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर गैरहजर राहत आहेत.

त्यामुळे अलगीकरण व विलगीकरण केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या संदर्भात १६ जुलै, २०२० रोजी महानगरपालिका मुख्यालयात विरार आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी अलगीकरण व विलगीकरण केंद्राची जबाबदारी नेमून दिलेल्या स्वच्छ्ता निरीक्षक, मुकादम व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक आयोजित केलेली होती.

काही सफाई कामगार व ठेका मजूर या केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक झाल्यापासून कामावर हजर झालेले नसल्याचे व काही कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर गैरहजर राहत असल्याचे तसेच स्वच्छ्ता निरीक्षक व मुकादम यांचेही अलगीकरण व विलगीकरण केंद्रातील नियोजनावर योग्य नियंत्रण नसल्याचे बैठकीत घेतलेल्या माहितीत आयुक्त गंगाथरन डी. यांच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे अशाप्रकारे कामचुकारपणा करणाऱ्या सहा कायम सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची तात्काळ विभागीय चौकशी करण्याचे व ९ ठेका मजुरांना सेवेतून कमी करण्याचे आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

तसेच बेजबाबदारपणा बद्दल एक वरिष्ठ स्वच्छ्ता निरीक्षक, एक लिपिक तथा प्रभारी स्वच्छ्ता निरीक्षक व एक मुकादम यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती या वेळी आयुक्तानी दिली.

तसेच जे कर्मचारी आजारपणाचे कारण देऊन गैरहजर राहिले आहेत, त्यांची वैद्यकीय मंडळाकडून ते सेवा करण्यास वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आहेत का? याची तपासणी करून घेण्याचे आदेशही संबंधित विभागास दिले असल्याचे आयुक्त यावेळी म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.