‘उद्योगपूर्ण गावा’साठी...
‘अजिंक्य उद्योग समूह’, लोकसहभागातून तुळजापूर व उस्मानाबाद येथे ‘उद्योगपूर्ण गाव’ संकल्पना राबवणारे राम जवान यांच्या जीवनाचा घेतलेला हा आढावा...
‘उद्योगपूर्ण गाव’ ही संकल्पना घेऊन तुळजापूरमध्ये राम जवान काम करत आहेत. ‘उद्योगपूर्ण गाव’ म्हणजे गावातल्या प्रत्येक व्यक्तीला अर्थार्जनाची, विकासाची संधी. ‘अजिंक्य उद्योग समूहा’च्या माध्यमातून राम जवान यांनी या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. ‘बळीराजा चेतना अभियाना’अंतर्गत काम करताना राम जवान यांनीही हे सत्य अनुभवले की, आजही गावागावात शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहे. शेतीसाठी वातावरण अनुकूल असेल तर ठीक, नाहीतर शेतकर्याचे हाल ठरलेले. बरं, आजही कित्येक शेतकरी शेती एके शेतीच करतात. उत्पन्नाचे दुसरे स्त्रोत निर्माण करणं त्यांना माहीतचं नसतं किंवा परिस्थितीने तशी संधी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे घरदार नव्हे कुटुंब शेतीवरच अवलंबून असते. शेतमाल पिकला आणि विकला तर ठीक, नाहीतर मग शब्दातीत समस्या आणखीन उग्ररूप धारण करतात. बचावाचा मार्ग दिसत नाही आणि मग शेतकरी आत्महत्या करतो. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकर्याचा आर्थिक, कौटुंबिक कणा मोडायचा नसेल, तर शेतकर्यांची दैनंदिन जीवनातील आर्थिक चणचण दूर केली पाहिजे.
नेमके याचसाठी राम जवान कार्यरत आहेत. यामध्ये शेतकर्यांना हक्काचा पैसा मिळावा म्हणून फुलशेती, कुक्कुटपालनासंबंधि ते शेतकर्यांना प्रशिक्षण देतात. राम जवान या तरुणाला ही संकल्पना सुचली, कारण त्यांचे वडील धोंडीराम आणि आई महानंदा दोघेही शेतकरी, वडील धोंडीराम तर पहाटे ४ वाजता उठत, पहिलवान असल्यामुळे सकाळी दोन तास व्यायाम केल्यानंतर सगळं आटपून गुरे राखायचे काम करत. दुपारी जेवून पुन्हा शेतीकाम करायला जात. संध्याकाळी परतले की मग स्वत:च्या शेतीत राबत. आई घरादारातलं आटपून घरच्या आणि रोजंदारीच्या शेतीतही राबायची. घरची पारंपरिक गरिबीच. ज्या दिवशी गव्हाची पोळी ताटात पडेल, तो सण असायचा. राम बारावी होईपर्यंत त्यांच्या घरात वीज नव्हती. त्यामुळे दिवसा जो काही अभ्यास होईल तो आणि मग रात्री वस्तीच्या दिव्यांवर ते अभ्यास करत. अशा गरिबीत राम वाढत होते. एकेदिवशी राम यांनी मित्राला मारले. मित्र रडत राम यांच्या वडिलांकडे आला. वडिलांनी नंतर रामला खूप मारले म्हणाले, “उगीच कुणावर अन्याय का करायचा आणि उगीच कुणाचा अन्याय सहनही करायचा नाही.” तो क्षण राम यांच्या मनात आजही ताजा आहे. त्यामुळेच की काय कुठेही अन्याय होत असेल, तर राम जातीने तिथे हजर राहतात. राज्यभरात मेंढपाळ समाजात कुठेही काहीही अन्यायास्पद घडले, तर राम न्याय मिळवून देण्यासाठी तिथे हजर असतातच. बीएपर्यंत शिक्षण घेत असताना राम यांचा संबंध विविध न्याय-हक्काच्या चळवळींशी आला. धनगर आरक्षण असो की कोणत्याही वंचितावरचा अन्याय, राम आपला गोतावळा घेऊन तिथे पोहोचलेच समजा. राम यांनी समाजाला प्रगतिपथावर नेतील, असे अनेक उपक्रम राबविले. तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, यासाठीही ते काम करतात.
सध्या राम यांचा ‘ग्रेट भेट’ हा उपक्रम सुरु आहे. ‘ग्रेट भेट’ कुणाशी, तर ५२ जातीत विभागलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या लोकांशी. या ५२ समाजगटांच्या प्रतिनिधींना भेटून त्या त्या समाजाच्या चालीरीती, कुळाचार, देवदैवत, नियम, परंपरा, गौरवशाली इतिहास याची नोंद घेणे. सगळ्या समाजगटांची अशाप्रकारे माहिती जमवल्यावर त्या संबंधिचे ‘संघर्ष भटक्यांचा सह्याद्रीचा’ हे पुस्तक प्रकाशित करणार आहेत. अर्थात, आजवर कित्येकांनी हे प्रयत्न केलेल आहेत. पण, राम जवान म्हणतात की, “मी अभ्यासू किंवा टीकाकार म्हणून ही नोंद करत नाही, तर मला कुतूहल आणि अभिमान आहे की, भटक्या-विमुक्त गटाच्या प्रत्येक जातीचा इतिहास हा गौरवशाली आहे. तो समाजापर्यंत आलाच पाहिजे. देशासाठीचे या समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे. ते प्रकाशात यावे यासाठी हा प्रयत्न.” आता कोरोनाच्या परिस्थितीतही राम सुविधांपासून वंचित असलेल्यांना अन्नधान्य वाटप, आवश्यक वस्तूंचे वाटप, आरोग्य शिबीर इत्यादींचे आयोजन करत आहेत. “पालावरच्या भावाबहिणीलाही जगण्याचा हक्क आहेच, दुसरा कोणीतरी येईल आणि मग पालावरच्या भावंडांना थोड्यातरी सुविधा मिळतील, याची वाट बघण्यापेक्षा आपण स्वत: पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी,” असे राम जवान यांचे म्हणणे. राम जवान यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, ते कोणत्याही राजकीय पक्ष, कोणत्याही विशिष्ट विचारधारा मानणार्या संस्था, संघटना यांच्याशी बांधील नाहीत. ते म्हणतात, “चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. आपण केवळ संवेदनशील माणूसपण जपायचे. मी तर काम करताना एकच विचार करतो, समाज आहे म्हणून आपण आहोत. समाजासाठी काम करताना कशाला कुणाचा टेकू हवा?” तू चाल पुढे गड्या रे तुला भीती कुणाची पर्वा ही कुणाची...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत