पुण्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; शेखर गायकवाड यांना ‘धक्का,’ तर चौघांना बढती

मुंबई, दि. १२ जुलै, २०२०: पुण्यात ‘करोना’चा संसर्ग वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्यातील IAS अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट केली आहे. याचा फटका महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना बसला आहे. त्यांची बदली करण्यात आली असून अन्य चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

शेखर गायकवाड यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणून विक्रम कुमार यांची नियुक्ती केली आहे. विक्रम कुमार हे पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. विद्यमान साखर आयुक्त सौरभ राव यांची विभागीय आयुक्तांकडे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली आहे.

विद्यमान कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची बदली पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. नवखे आयएएस अधिकारी असलेले जितेंद्र दुधी यांची नियुक्ती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे. ते सध्या मंचरमध्ये (पुणे) आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते.

बदली झालेल्या या पाच अधिकाऱ्यांपैकी शेखर गायकवाड यांच्यावर एक प्रकारे ‘कारवाई’च केल्यासारखेच दिसत आहे. अन्य पाच अधिकाऱ्यांना मात्र बढती दिल्याचे दिसत आहे.

शेखर गायकवाड ही मराठी व्यक्ती आहेत. तळागाळात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ‘करोना’च्या काळातही त्यांनी उत्तम काम केले असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत गायकवाड यांनी ‘करोना’च्या स्थितीबाबत (Coronavirus in Pune ) प्रभावी सादरीकरण केले होते, असे असताना गायकवाड यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, IAS शेखर गायकवाड यांच्या तुलनेत विक्रम कुमार हे कमकुवत व कमी अनुभव असलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे गायकवाड यांना डावलून ठाकरे सरकारने नक्की काय साधले याबद्दल उलटसूलट चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.