गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिक तपासणीसाठी पथके तैनात करणार: जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी दि. ३० जुलै, २०२०: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिक तसेच चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर १ ऑगस्टपासून महसूल, पोलिस आणि आरोग्य विभाग यांची संयुक्त पथके तैनात करण्यात येत आहेत आणि ज्या व्यक्ती संशयित आढळतील अशांच्या करोना रॅपिड टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.

करोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाउनची स्थिती आहे. सद्यस्थितित थोडीफार शिथिलता देण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यापासून लॉकडाउन स्थितिमुळे जनता हैराण झाली आहे. सर्व आर्थिक गणितेही कोलमडली आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गवासियांचा सर्वात लाडका आणि मोठ्या धार्मिकतेने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा सण २२ ऑगस्ट रोजी येत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकार्यांशी संपर्क साधला.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाल्या की, गणेशोत्सव कालावधीसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत शासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीत जी नियमावली आहे, त्यानुसारच जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. नव्याने सूचना आल्यास त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच लॉकडाऊनमध्ये शिथिलता न झाल्यास सद्यस्थितीत असलेल्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.  नियमांची अंमलबजावणी करताना चाकरमानी आणि स्थानिक ग्राम नियंत्रण समित्यामध्ये वाद होणार नाहीत याचीही दक्षता घेतली जाणार आहे.

गणेशोत्सव कालावधीमध्ये दीड लाख चाकरमानी येतील असा अंदाज आहे, त्यामुळे करोनावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर खारेपाटण सहजिल्ह्याची प्रवेशद्वार असलेल्या चेक नाक्यावर महसूल, पोलीस आणि वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त पथके ठेवली जाणार आहेत. त्याठिकाणी संशयित वाटणाऱ्या म्हणजेच करोनाची लक्षणे दिसणाऱ्यांची प्राथमीक आरोग्य तपासणी करून स्वाब टेस्टिंगला पाठवले जाणार आहे.

जिल्ह्यात करोनाबाधीत रुग्ण संख्या साडेतीनशेपर्यंत गेली तरी बरे होणाऱ्या रूग्णाचेही प्रमाण चागले आहे. कोव्हिडं सेंटरची आपण स्वत: प्रत्यक्ष पाहणी केली असून त्याठिकाणी रुग्णांशी संवादही साधला असता चागल्या प्रकारे उपचार होत असल्याचे त्यांनी सांगितले जेवणही चांगले मिळत असल्याचे रूग्णांनी सांगितले त्यामुळे रुग्ण बरे होऊन करोना मुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण चांगले असले तरी सुद्धा गणेशोत्सव काळात रुग्ण संख्या वाढली तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिडं सेंटरमध्ये २१५ बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच आवश्यकता भासल्यास तालुक्याच्या ठिकाणीही व्यवस्था केली जाणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यात प्राशकीय यंत्रणा चागले काम करतच आहे परंतु सरपंच व ग्रामनियंत्रण समित्या चांगले काम करीत आहे. त्यामुळे करोनावर नियंत्रण ठेवता आले. आता गणेशोत्सव कालावधीमध्येही सर्वांकडून सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील जनतेने व चाकरमानी यांनीही नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

गेल्या चार महिन्यात महसूल पोलीस आणि जी. प. आरोग्य यंत्रणा यांनी अतिशय चांगला समन्वय ठेवून काम केला त्याच पद्धतीने गणेशोत्सव काळात समन्वय ठेवून करोना नियंत्रणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.