मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत कडक कायदा करण्यात यावा.- कल्याणी वाघमोडे

धनगर समाजाचे प्रलंबित प्रश्न सरकारने मार्गी लावावे- कल्याणी वाघमोडे

बारामती, दि. १२ जुलै, २०२०:
महाराष्ट्रातील अनेक धनगर समाज कुटुंब वंशपरंपरागत मेंढपाळ व्यवसाय करत आहेत. आपले घरदार सोडून मेंढ्या चारण्यासाठी भटकंती करावी लागते, त्या दरम्यान गायरान भागात चराई करताना अनेक वेळा तेथील ग्रामस्थांकडून, प्रस्थापितांकडून मारहाण झाल्याच्या घटना पुढे येत आहेत.

अनेक वर्षांपासून मेंढपाळ कुटुंब हे अन्याय सहन करत आहेत. मागील सरकारने धनगर समाजाच्या कुटुंबाच्या विकासाच्या दृष्टीने योजनांची घोषणा केली तसे परिपत्रक १६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केले मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मेंढपाळ कुटुंबांसाठी मागण्यांचा विचार व्हावा, अशा आशयाचे निवेदन क्रांती शौर्यसेना अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

यामध्ये प्रामुख्याने अशा मागण्या आहेत.

१] मेंढपाळ कुटुंबांना त्यांच्या मूळ ठिकाणी त्याच तालुक्यात चराई क्षेत्र, गायरान भूभाग राखीव ठेवावा म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
2] वन विभागाच्या अधिकारी वर्गातून दखल न घेता त्रास दिला जातो, त्यामुळे चराई क्षेत्राबाबत सरकारने वनविभागाला नियमांचे परिपत्रक जाहीर करावे.
३] मेंढपाळ महिलांवरील होणारे अत्याचार, अतिप्रसंग असे गुन्हे वाढतच आहेत, त्यासाठी सुरक्षा संदर्भात कायदा करून अंमलबजावणी करण्यात यावी.
४] भटकंती करणार्‍या मेंढपाळ कुटुंबातील लहान मुले हे शिक्षण व सवलतींपासून वंचित राहतात.
५] अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी मागणी म्हणजे राज्यघटनेप्रमाणे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी. माहितीच्या अधिकाराअंतर्गत हे स्पष्ट झाले आहे की, 'धनगर 'व 'धनगड' हे एकच आहे. राज्य शासनाने फक्त दुरुस्तीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा.

तसेच मागील सरकारने घोषीत केलेल्या धनगर समाजाच्या विकासासाठी १००० कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही. या सर्व मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा न्याय हक्कासाठी धनगर मेंढपाळ समाज रस्त्यावर उतरेल, असे मत क्रांती शौर्यसेनेच्या कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.