प्रा. राम शिंदे यांना पितृशोक...

शंकर बापू शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन
जामखेड, दि. ४ जुलै, २०२० : अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे नूतन प्रदेश उपाध्यक्ष मा. राम शिंदे  यांचे वडील शंकर बापू शिंदे यांचे आज दुःखद निधन झाले. हृदयविकार व मधुमेहाच्या आजारामुळे गेली दोन महिन्यापासून दवाखान्यात त्याचेवर उपचार सुरू होते. तसेच पँरेलेसीसही झाला होता असे समजते. आपल्या वडिलांच्या उपचाराचे वेळी माजी मंत्री ना शिंदे हे सतत त्याचे जवळ असत. नगर येथे साईदीप दवाखान्यात आज  दि ४ जुलै रोजी दुपारी ५ वा त्यांनी अंतिम श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा प्रा. राम शिंदे, तीन मुली, सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. रविवार सकाळी नऊ वाजता त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी चोंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



स्वर्गीय शंकर बापू शिंदे यांनी अतिशय हलाकीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत केले. अनेक वर्षे दुसऱ्यांच्या शेतात साल घालून त्यांनी आपला व आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह केला. भाऊ या नावाने परिचित असलेल्या शंकर शिंदे यांनी आपले चिरंजीव प्रा. राम शिंदे यांच्या शिक्षणाच्या आड गरिबी येऊ दिले नाही. काबाडकष्ट करून दुसऱ्याच्या शेतात घाम गाळून प्रा. शिंदे यांना उच्च शिक्षण दिले. एका महाविद्यालयात सुरुवातीला काही दिवस त्यांनी नोकरी केली. त्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्राध्यापक राम शिंदे यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले. एका सालकरी गड्याचा मुलगा राज्याचा मंत्री झाला. मातब्बरांचा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात शंकरराव शिंदे यांच्या मुलाने आपले स्थान निर्माण केले. केवळ जिल्ह्यातच नव्हे राज्याचे नेतृत्व म्हणून ते पुढे आले त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. प्रा. राम शिंदे यांच्या गरुड भरारीला आईवडिलांची पुण्याई आणि साथ लाभली. दरम्यान शुक्रवारी प्रा. शिंदे यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली, आणि शनिवारी त्यांचे वडील शंकर शिंदे यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मितभाषिक, मनमिळावू आणि अतिशय प्रेमळ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने चोंडी गावासह कर्जत जामखेडमधून शोक व्यक्त करण्यात आला आहे. स्वर्गीय भाऊंना धनगरराजाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.