अहिल्यादेवी होळकरांच्या दूरदृष्टीमुळे आज कांद्याचं ‘लासलगाव’ ताठ मानेने उभं आहे.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आज आपल्या कांद्याच्या बाजारपेठेमुळे जगाच्या नकाशावर जाऊन पोहचलेल आहे. आशियातील सर्वात मोठे कांद्यांचे मार्केट म्हणून या गावाला ओळखले जाते. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळवून देणारे असे हे लासलगाव. या गावाला होळकरी इतिहासाची महान परंपरा आहे.

सुभेदार मल्हारराव होळकर हे मुळचे जेजुरीजवळच्या होळ गावचे. पहिल्या बाजीरावाच्या काळात आपल्या पराक्रमाने त्यांनी सुभेदारी मिळवली. उत्तरेत मराठेशाहीचा जरीपटका लहरला या मागे होळकर शिंदे गायकवाड या घराण्याने गाजवलेली तलवार कारणीभूत ठरली.

साधारण १७५० साली मल्हारबाबांना चांदवड परगण्याची जहागिरी मिळाली. या जहागिरीच्या रक्षणासाठी त्यांनी एका भुईकोट किल्याची उभारणी केली. कालांतराने या भागात लष्करी तळ उभा राहिला.

मल्हारबाबांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या सुनेला सती जाण्यापासून परावृत्त केले आणि राज्याची सर्व धुरा त्यांच्यावर टाकली. त्यांना राज्यकारभारात तयार केलं. पुढे मल्हारबाबांचा वारसा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी समर्थपणे सांभाळला.

होळकरांची राजधानी माळव्यात महेश्वर येथे होती. इतक्या दुरहून निफाड चांदवडमधल्या आपल्या जहागिरीकडे लक्ष देणे त्यांना अवघड जात होते. लासलगावचा भाग पूर्वीपासून सुपीक होता. येथे बाहेरून येणाऱ्या लुटारुंचे व गुंडगिरीचे प्रमाण वाढले होते. अनेक प्रयत्न केले तरी त्याला अटकाव करता येणे अशक्य झाले होते.

अशी कथा सांगितली जाते की, अहिल्यादेवींना ही रयतेची रोज चालेली लुट बघवत नव्हती. अखेर त्यांनी या लुटारूंचा व गुंडांचा कोण बिमोड करेल त्याला मोठ इनाम देण्यात येईल अस जाहीर केलं. यात यशवंतराव फणसे हा धनगर युवक पुढे आला. त्याने आपल्या पराक्रमामुळे लासलगावमधून सर्व लुटारू पळवून लावले. गावाचा बंदोबस्त केला.

त्यांच्या या पराक्रमामुळे अहिल्यादेवींनी त्यांना मोठे इनाम तर दिलेच पण शिवाय आपल्या लाडक्या मुलीचा म्हणजेच मुक्ताबाईचा त्यांच्याशी विवाह लावून दिला. त्यांना आंदण म्हणून महाराष्ट्रातील लासलगाव व किल्ला, निफाडचा होळकर वाडा सोनेवाडी, चांदवड मधील शिवरे बोऱ्हाके, जुन्नरमधील मडके जांब व जमीन आणि मध्यप्रदेशातील तराणा प्रांताची जहागीरदारीच्या स्वरूपात दिली होती.

सरदार यशवंतराव फणसे व त्यांच्या घराण्याने अनेक वर्ष लासलगावचे रक्षण केले. त्यांना शिक्षा देणे, कर वसुली, यात्रेचा मान, पाटीलकी असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात होळ्करांतर्फे प्रदान करण्यात आले.

संपूर्ण लासलगावच्या भोवती दगडी तटबंदी व सात वेशी होत्या व त्याच्या आत सध्याचा बालेकिल्ला होता. तटबंदीचे काही अवशेष आजही आपल्याला पाहवयास मिळतात व सात वेशी पैकी आज फक्त एकच वेश नजरेस पडते.

लासलगावचा भुईकोट किल्ल्याचे दोन मजबूत प्रवेशद्वार, त्यावर लोखंडी खिळे, सदर, प्रचंड मोठे पाषाणी बुरुज, त्याकाळचे भुयारी मार्ग, बाहेरून आलेल्या शत्रूवर मारा करण्यासाठीच्या बुरूज व तटबंदीमध्ये सज्जे, चौरस आकार, भक्कम तटबंदी तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि त्याचे दोन बुरुज असे एकूण आठ बुरुज आहेत.

शत्रूने हत्तीच्या साहाय्याने दार तोडण्याचा प्रयत्न करू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणजे “गजखिळे” आजही पाहायला मिळतात. याच उत्तरेला तोंड करून असलेल्या दारातून होळकरी सैन्य आपल्या शत्रूंवर चालून जात असेल.

किल्ल्याच्या बाहेर गणेश मंदिर व एका बारवेचा निर्माण अहिल्यादेवी यांनी केलेला आहे. किल्ल्यात राणीचा महाल होता. त्याच्या खांबावर हिरे मोतींचे नक्षीकाम केले होते असे म्हणतात.

पुढे कालांतराने काही तरी संकट आले व  फणसे घराण्यातील पुढच्या पिढीने लासलगावचा किल्ला अब्बड या व्यापार्‍याला पाच हजार रूपयात विकला. आजही हा किल्ला आब्बड कुटुंबाकडे आहे. लासलगावची शान असणाऱ्या या किल्ल्यावर भगवा जरीपटका लहरतान दिसून येईल.

अहिल्यादेवींच्या कारकिर्दीत लासलगावची उभारणी केली. या गावाला संरक्षण दिले. स्थैर्य दिले. गुंडापुंडाचा नायनाट केला. यामुळेच पुढे कालांतराने हे गाव बाजारपेठ म्हणून उदयास आले. आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला उच्च दर्जाचा कांदा विकण्यासाठी हक्काची जागा मिळाली. आजही ही ओळख टिकून आहे याचं श्रेय जाते महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीला.

संदर्भ- ahilyabaiholkar.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.