आयुक्त गंगाथरन डी. यांचा 'मराठी बाणा!'

वसई-विरार महानगरपालिका आयुक्त गंगाथरन डी. सापत्न वागणूक देत असल्याचे आरोप होत असतानाच; नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आयुक्त गंगाथरन डी. यांचा 'मराठी बाणा' दिसून आला आहे. मराठीवरील या अनपेक्षित प्रेमाने समस्त वसई-विरारकरांच्या 'मनसे' प्रेमास आयुक्त पात्र ठरले असल्याची चर्चा आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ची स्थिती आणि त्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी शुक्रवारी वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त गंगाथरन डी. यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेला मुख्य वर्तमानपत्र, वृतवाहिनी आणि यूट्यूबचे प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकार परिषदेला सुरुवात झाल्यानंतर काही पत्रकारांनी आयुक्तांनी हिंदीत बोलावे, असा हट्ट धरला.
मात्र आयुक्तांनी या प्रतिनिधींना इंग्रजी अथवा मराठीत प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावर या प्रतिनिधींनी आयुक्तांना दिल्लीतील उदाहरणे देत, त्यांना अनावश्यक सल्ले देण्याचा प्रयत्न केला.

वृत्तप्रतिनिधींच्या या 'फिरकी'वर आयुक्तांनी आपण महाराष्ट्रातील असून मला मराठी आणि इंग्रजीच येते, असे सांगून आपला 'मराठी बाणा' कायम ठेवला.

पण हिंदी भाषिक यूट्यूब वृत्तवाहिन्यांचा माहिती घेण्यापेक्षा हिंदीबाबतचा अडेलतटूपणा आणि वेळेचा अपव्यय लक्षात घेऊन आयुक्तांनी ही पत्रकार परिषद अर्ध्यावर विसर्जित केल्याचे उपस्थित काही वृत्तप्रतिनिधींचे म्हणणे आहे.

मात्र आयुक्तांच्या या 'मराठी बाण्या'ची चर्चा सध्या वसई-विरारमध्ये आहे. आयुक्तांच्या या 'मनसे' मराठी प्रेमामुळे समस्त वसई-विरारकरांच्या अभिमानास ते पात्र ठरले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गंगाथरन डी. हे मूळचे तमिळनाडूचे. या आधी ते धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नंतर जिल्हाधिकारी होते. त्यामुळे त्यांची मातृभाषा तमिळ; तर कार्यकाल महाराष्ट्रात गेल्याने त्यांना मराठी भाषा अवगत आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर त्यांची वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, मात्र नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच या ना त्या कारणाने त्यांना 'टार्गेट' करण्याचा प्रयत्न केला गेला.

वेळेप्रसंगी सरकारने नव्हे; तर 'शिवसेने'ने त्यांची नियुक्ती केली. अशा वावडया उठवून आयुक्त पक्षधार्जीणे असल्याचे चित्र जाणीवपूर्वक उभे केले गेले.

वेळेप्रसंगी ते अन्यायी, घमंडी असल्याचेही सांगण्याचा प्रयत्न झाला. इतकं सगळं राजकारण करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांकड़े आणि कामांपासून नागरिकांचे दुर्लक्ष कसे होईल, यासाठी विशेष काम केले गेले.

आयुक्तांना जागेवर टिकताच येऊ नये म्हणून 'बहु'जण मागच्या दरवाजाने 'राज'कीय मदत घेत असल्याच्याही चर्चा होत्या, आणि यात कोणते 'राज'कीय पक्ष पुढे होते हे वसई-विरारकरांना सर्वश्रुत आहेच.

अशात 'राज'भाषेबाबतचा आपला 'बाणा' कायम ठेवल्याचे पाहून तरी 'राज'योगासाठी 'बाल'हट्ट करुन (जा)यादवी माजवू पाहणाऱ्यांच्या मनात आयुक्तांच्या प्रति प्रेमाचा अंकुर फुटायला हरकत नसावी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.