मराठी माणुस सुधारणार कधी?

हजार दोन हजार मैलावरून पडेल ते काम करायची तयारी ‘एवढ्याच भांडवलावर’ परप्रांतीय लोक घरदार सोडून मुंबईत येतात. अनोळखी प्रांत, अनोळखी भाषा, राहण्याच्या गैरसोयी, अशा अनेक अडचणींवर मात करीत छोटे छोटे उद्योग धंदे करतात. कष्टाने चार पैसे मिळतात. त्याचवेळी आपला स्थानिक मराठी तरुण मात्र सरकारी किंवा सहकारी नोकरीत वाशीलयाने चिकटण्याच्या आशेवर वर्षानुवर्षे बेकार फिरत राहतो. नाक्यावर,पारावर राजकारण, क्रिकेट असल्या विषयावर ज्ञान पाजळतो असतो. नाहीतर कुठल्याशा "शेठ" कडे त्याची भाषा बोलत चाकरी करतो. हेच सर्वसाधारण चित्र दिसते. सध्या लॉकडाउनमुळे लाखो परप्रांतीय आपापल्या गावी निघून गेल्याने मराठी माणसांना रोजगार धंदा करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. ‘आता लोक काय म्हणतील’? याचा विचार न करता, प्रतिष्ठेच्या खोट्या समजुती आणि "मी"पणा  सोडून रोजगार धंदा करण्याची संधी आली आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेच्या साठ वर्षांनंतर मराठी माणसाची महाराष्ट्रात स्वतःची ओळख काय आहे. सिंधी, मारवाडी, गुजराती लोक व्यापारी म्हणून ओळखले जातात. दाक्षिणात्यअण्णा, उडपी हॉटेल धंद्यात जम बसवून आहेत.  राजस्थानी फर्निचर व तत्सम व्यापार करतात. पंजाबी ऑटोमोबाईल व वाहन उद्योगात नाव कमावतात. केरलावले टायर व्यवसायात तर अगदी म्हैसी राखणाऱ्या भैयानी दूधवाले म्हणून आपली ओळख बनवली आहे. संख्येने अत्यल्प असलेले पारशी लोक उद्योजक म्हणून जगात आपली ओळख टिकवून आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरी बहुसंख्य मराठी माणूस खासगी वा सरकारी हापिसात, मुन्शीपालटीत चतुर्थश्रेणी कर्मचारी नाहीतर कारकून साहेब असतो. तो कुठल्याशा सिंधी, मारवाडी, गुजराथी शेठ कडे कामाला जातो, तरी त्याचा रुबाब लय भारी असतो. हिंदी, भोजपुरी, गुजराती, दाक्षिणात्य चित्रपटात सिघानिया, गोसलिया, मेहता, ठाकूर, शर्मा नाव धारण करणारे लोक मालकाच्या भूमिकेत तर मराठी माणूस नोकरांच्या भूमिकेत दाखवलेला असतो. हेच चित्र समाजातही सर्रास दिसते. त्यामुळे मराठी माणूस म्हणजे चाकरमानी ही ओळख गडद झाली आहे. ही मनाला यातना देणारी बाब आहे.

मराठी माणसाचा रोजगार परप्रांतीयांनी हिरावून घेतला. मुंबईतला मराठी टक्का कमी झाला. अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. त्यालाही मराठी माणसाची वृत्तीच कारणीभूत आहे. दोन मराठी माणसं एकमेकांना भेटली की हिंदीत बोलतात. आपले सुधारलेपन दाखवण्यासाठी त्यांना हिंदी व हिंदी मिक्स इंग्लिश (हिंग्लिश) चा आधार घ्यावा वाटतो. त्यामुळे हिंदी भाषिक पट्यातील परप्रांतीयांचे काम अधिक सोपे होते. त्यांना महाराष्ट्रात व्यापार उद्योग करताना स्थानिक भाषेचा अडसर येत नाही. परिणामी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गाव चावडी पर्यंत परप्रांतीयांनी आपली दुकांने थाटली आहेत. दाक्षिणात्य लोकांसारखा भाषभिमानी आपल्याकडे नाही. दुकानावर मराठी पाट्या लावण्या पुरता आपला स्वाभिमान जागा होतो. मात्र दुकानही मराठी माणसाचेच असावे हा विचार आपण करीत नाही. अव्वल इंग्रजी काळापासून मुंबई शहरात बाहेरून पोटापाण्यासाठी आलेल्यांनी आपले नाव कमावले आहे. टाटा, बिर्ला, गोदरेज, अंबानी, महिंद्रा सारख्या शेकंडो जणांना मुंबई पावली आहे. स्थानिक भूमीपुत्राना मुंबई का पावत नाही. याचा विचार करण्याची वेळ आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा आपण घोषणा दिल्या. मुंबई तुमची, भांडी घासा आमची अशा प्रति घोषणाही आल्या. मात्र मुंबई आमच्या बापाची असे ठणकावणाऱ्या मराठी माणसाला गेल्या साठ वर्षात बोलण्याशिवाय आपले कर्तृत्व काही दाखवता आलेले नाही.

मराठी  माणसांच्या चांगुलपणामुळे व भाषेचा अडसर नसल्याने परप्रांतीय लोंढे महाराष्ट्रात येतात. इथल्या कार्यसम्राट भाईंना सलाम नमस्ते करतात. आपलेच भाई, दादा, त्यांना चिरीमिरी घेऊन जागा उपलब्ध करून देतात. आवश्यक ते कागदपत्रे तयार करून देतात. भैय्या गावाहून आणखी चार जणांना बोलावून घेतात. आज मुंबईत अंदाजे 22 लाख परप्रांतीय लोक राहतात. त्यांचे संख्याबळ वाढल्याने मुजोरपणा वाढला आहे. घाटकोपर मुलुंड येथे मराठी फेरीवाल्यांना परप्रांतीयांनी  झोडपल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक परप्रांतीय आता महाराष्ट्राच्या राजकरणात लुडबूड करू लागले आहेत. मूळचे परप्रांतीय असलेले लोक महाराष्ट्राचे नेते म्हणून मिरवतात. इथे येऊन नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री होतात. आपली पोरं इमाने इतबारे त्यांचे झेंडे मिरवतात. जौनपूर हुन आलेले कृपाशंकर सिह या राज्याचे गृहमंत्री होतात. मराठी माणूस सुधारला नाही तर एक दिवस ‘अमराठी व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल’ असे भाकीत प्रसिद्ध लेखक वामन होवाळ यांनी केले होते. ते खरे होईल अशी परिस्थिती आली तरीही मराठी माणूस जागा होत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मुंबई आमच्या बापाची म्हणणाऱ्या मराठी माणसाला विरार चर्चगेट लोकल मध्ये चौथ्या सीटवरही गुजराती बसू देत नाहीत. टॅक्सीवाले मराठी माणसाचे भाडे नाकारतो. मराठी माणसाला उडपी हॉटेलात, राजस्थानी दुकानात कामावर ठेवत नाहीत. लॉकडावून मुळे कामगार मिळत नसतानाही कारखानदार युनियन करणार नाही यासह अनेक अटी शर्थी घालत आहेत॰ अशा परिस्थितीत माणसाला आता भानावर येण्याची वेळ आली आहे.

खरेतर मराठी माणसाकडे अटकेपार झेंडा रोवण्याचे सामर्थ्य आहे. मराठी डबेवाल्यांनी उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा जगाला आदर्श घालून दिला आहे. मराठी माणसाकडे धडाडी आहे,  त्याचेकडे  व्यवसायिक कौशल्य आहे. आता राजकारणाचा नाद, "मी"पणा सोडून, पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास खर्‍या  अर्थाने  मराठी पाऊल पुढे पडेल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.