चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या किल्ले रायगडावरील कुटुंबांना आ. भरत गोगावले यांनी दिला मदतीचा हात

रायगड टाइम्स, माणगाव, दि. १५ जून, २०२० : छत्रपती शिवरायांच्या काळापासून पिढ्यानपिढ्या किल्ले रायगडावर वास्तव्यास असलेला धनगर समाज ऊन-वारा पावसाची तमा न बाळगता येणार्‍या शिवभक्तांना लागेल ते सहकार्य करत आला आहे. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे या समाजास आज उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. आमदार भरत गोगावले यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने येथील 24 कुटुंबांना स्वखर्चाने घरावर टाकण्यासाठी प्लॅस्टीक ताडपत्री आणि अन्नधान्य साहित्याचे वाटप केले.

किल्ले रायगडावर वास्तव्यास असलेला हा धनगर समाज गडावर येणार्‍या शिवभक्त, पर्यटकांना दही, दूध, ताक विकून त्यांचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र चक्रीवादळात या गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला. वादळाच्या तडाख्यात सापडल्याने त्यांच्या घराचे छप्पर उडाले आणि घरातील साहित्य पावसाच्या पाण्यात भिजून गेले. याची माहिती मिळाल्यानंतर आ. भरत गोगावले यांनी या कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना स्वखर्चाने घरावर टाकण्यासाठी प्लॅस्टीक ताडपत्री आणि अन्नधान्याचे वाटप केले.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडीक, सरपंच प्रभाकर सावंत, जिल्हा वाहतूक संघटनेचे सुभाष मोरे, रघुवीर देशमुख, लहू अवकिरकर, गणेश अवकिरकर आदी उपस्थित होते. हे वाटप करून झाल्यानंतर लागलीच आ. गोगावले यांनी पाचाड या ठिकाणी तहसीलदार पवार आणि संबंधित अधिकारी वर्गासमवेत बैठक घेऊन या नुकसानग्रस्तांना ताबडतोब शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना केल्या. पावसात सर्व धान्य भिजून गेल्यामुळे तहसीलदार पवार यांनी त्याच ठिकाणी रेशन दुकानदारास बोलावून या लोकांना मोफत धान्य देणाचे आदेश दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.