धनगर समाजाची मते मिळणार नाहीत - जानकर

सकाळ, १९ , फेब्रुवारी २०१९, पिंपरी - ‘‘धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास समाजातील मतदारांचे एकही मत मिळणार नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार तर जाईलच, मात्र केंद्र सरकारचेही नामोनिशाण राहणार नाही,’’ असा इशारा धनगर समाजाचे अभ्यासक उत्तम जानकर यांनी रविवारी (ता. १७) येथे दिला.
धनगर समाजाच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. नागेश चित्तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली.  


जानकर म्हणाले, ‘‘आमच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्याची प्रामाणिक जिद्द आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या एक हजार तरुणांना आरक्षणाच्या महत्त्वाबाबत शिक्षित केले आहे. आरक्षणाबाबत सरकारमध्ये बेइमानीची भूमिका आली आहे. आरक्षणासाठी आता फार वाट पहावी लागणार नाही. सरकारने फूट पाडण्याचे सगळे प्रयत्न करून पाहिले. मात्र त्यांना यश आले नाही. धनगर समाजाचा कोणी प्रतिनिधी सत्तेत नसेल, तर वेगळा विचार करावा लागेल. त्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे.’ राजेंद्र घोडके यांनी प्रास्ताविक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.