पडळकर-आंबेडकर भेट ; धनगर समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत

Maharashtra Today, २५, फेब्रुवारी २०१९, मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी चर्चा केली.या भेटीनंतर धनगर समाज वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचे संकेत मिळत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत . तसेच यावरुन विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते प्रकाश आंबेडकरांशी जवळीक साधत असल्याचं दिसत आहे.

राज्य सरकारकडून धनगर आरक्षणासाठी अद्यापही कोणतीच पाऊले उचलण्यात आली नाही . त्यानिमित्ताने गोपीचंद पडळकर यांची लोकप्रियता आणि धनगर समाजात असलेल्या पाठिंब्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेतून त्यांना आघाडीत येण्याचं आवाहन करण्यात आले होते. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपने पाळले नसून, या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये धनगर समजाचे नेतृत्व आपण करणार असल्याचे आंबेडकर यांनी एका सभेत जाहीर केले होते .
धनगर समाजास आरक्षण देण्याची घोषणा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही आरक्षणाचा तिढा सोडविला नाही. यामुळे समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. इतकेच नाही तर धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (गुरुवारी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली . मराठा समाजाला शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळाले असतानाच आता राज्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केली . मात्र मुख्यमंत्र्यांकडून धनगर आरक्षणाबाबत शिष्टमंडळाला फक्त आश्वासनांची गाजरं दाखवण्यात आल्याचा आरोप धनगर नेत्यांनी केला आहे. दरम्यान पडळकर हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याने प्रकाश आंबेडकर आणि गोपिचंद यांची भेट महत्वाची मानली जात आहे .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.