पंतप्रधान मोदींविरोधात धनगर समाजाकडून आंदोलनाची हाक


सांगली - धनगर समाजाने आरक्षणासाठी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी गो बॅक'चा नारा देत आज आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला.


भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षात धनगर आरक्षणाबाबत एक कागद टेबलावरून हलवला नाही. तसेच आता केवळ शिफारस करण्याची भाषा करण्यात येत आहे. हा धनगर समाजाला फसवण्याचा प्रकार असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. मात्र, समाजाला 'एसटी' प्रमाणपत्र मिळेपर्यंत समाज स्वस्थ बसणार नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

उद्या सोलापूर येथे होणाऱ्या मोदींच्या सभेवर धनगर समाजाने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे. तसेच मोदींच्या सभेला एकही भाजपमधील धनगर समाजातील नेत्याने व कार्यकर्त्याने जाऊ नये अशी हाकही त्यांनी यावेळी दिली. शिवाय महाराष्ट्रात मोदींच्या सभेदरम्यान लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.