मी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय – महादेव जानकर

सामना, 16 जानेवारी 2019, नगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पाच जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये नगर दक्षिण जागेचाही समावेश आहे. जर लोकसभेसाठी युती झाली तर दोन जागांचा प्रस्ताव दिला आहे, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मी लोकसभेची निवडणूक लढणार असून बारामती मला प्रिय आहे, असेही ते म्हणाले. नगर येथे शासकीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


जानकर पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही एनडीए सोबतच राहणार आहोत. सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही पाच जागांची मागणी केलेली आहे. जर युती झाली तर आम्हाला दोन जागा मिळाव्यात, अशी आमची माफक अपेक्षा आहे. लोकसभेसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट करून मला बारामती बद्दल प्रेम आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पण भाजप निवडणूक स्वतंत्र लढली तर नगर दक्षिणची जागा आम्हाला मिळावी व आपणही या ठिकाणी उभे राहू शकतो, असे सूचक वक्तव्य मंत्री जानकर यांनी यावेळी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी धनगर समाजाला आरक्षण मिळेल असा आमचा विश्वास आहे. धनगर समाजाला आरक्षण पहिल्याच कॅबिनेटमध्ये दिले जाईल, अशी घोषणा भाजपाने केली होती, हे अगदी बरोबर आहे. मात्र गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने धनगर समाजाच्या कोणत्याही मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले नाही. उलट त्यांनी आम्हाला दूर ठेवले मात्र हे सरकार आल्यानंतर धनगर समाजाचा प्रश्न हा केंद्राशी निगडित असल्यामुळे कोणत्याही प्रकारे संविधानात्मक विषय राहू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. यासंदर्भातील चर्चा सुद्धा सुरू आहे धनगर समाजावर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतली आहे. त्याच प्रमाणे आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मी धनगर समाजाचा नेता आहे हे मान्य आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचा अध्यक्षही आहे. माझ्या पक्षामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक आहेत. त्यामुळे याची गल्लत कुणी करू नये, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याबद्दल कोणाचे दुमत नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत आरक्षण मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मात्र जर आरक्षण मिळाले नाही तर जनता आमच्या सोबत राहणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे, असेही जानकर यांनी म्हटले आहे.


साभार :  http://www.saamana.com/i-will-contest-loksabha-election-mahadeo-jankar/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.