धनगर आरक्षण आक्रोश महामेळाव्याची पूर्वतयारी !

लोकमत, 16 जानेवारी 2019, वाशिम : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारीला धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा होत असून, या महामेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात गावोगावी बैठका, कॉर्नर सभा घेतल्या जात आहेत. १५ जानेवारी रोजी वाशिम शहरासह ग्रामीण भागात रात्री ८ वाजताच्या सुमारास बैठक घेण्यात आली.


मागील कित्येक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असून आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असा आरोप करीत या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे आक्रोश महामेळावा आयोजित केला आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ३४२(१) अंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनूसूचित जमातीच्या यादीत ओरॉन, धनगर (धनगड) जमातीचा समावेश असून येथील प्रस्थापित राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रात ‘धनगड’ अस्तिवात नसताना ‘धनगर-धनगड’ वेगवेगळ्या जमाती असल्याच्या ठरवून गेली ६५ वर्षापासून धनगर जमातीला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवले, असा आरोप करीत धनगर समाजबांधवांनी आरक्षणासाठी ‘एल्गार’ पुकारला आहे. मागील २०१४ निवडणूकीपुर्वी सत्तेतील भाजपा युती सरकारने  धनगर आरक्षण प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावू, असे आश्वासित केले होते. 

मात्र, अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. या प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २० जानेवारी २०१९ रोजी धनगर आरक्षण आक्रोश महामेळावा असून, जनजागृतीपर जिल्हाभरात बैठका घेतल्या जात आहेत. या महामेळाव्यात धनगर  समाजातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १५ जानेवारीला वाशिमसह ग्रामीण भागात बैठका घेत या महामेळाव्याची पूर्वतयारीवर चर्चा करण्यात आली. या महामेळाव्यास धनगर समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती वाशिमचे जिल्हाध्यक्ष महादेव लांभाडे, वाशिमचे नगरसेवक बाळू मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती किसनराव मस्के, पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांच्यासह धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.