बालमजूर ते कीर्तनकार व्हाया पत्रकार

भगवान हारुगडे
आयुष्याच्या सुरुवातीला बालमजूर, नंतर केवळ बालपणीची इच्छा आणि नवं काहीतरी करण्याचा ध्यास म्हणून पत्रकार आणि अध्यात्माचे बाळकडू आजीकडून लहानपणीच मनावर बिंबवले गेल्यामुळे कीर्तनकार असा शामसुंदर यांचा प्रवास सुरू आहे. त्यांचा हा प्रवास सरळसोट झालेला नाही. त्यासाठी त्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत. अनेक खाचखळगे पार करावे लागले आहेत. म्हणून बालमजूर ते कीर्तनकार व्हाया पत्रकार हा त्यांचा प्रवास निश्चितच अनेक होतकरूंना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

सख्खा भाऊ आणि मित्राच्याही पलीकडं माझं ज्यांच्याशी नातं आहे ते शामसुंदर सोन्नर यांनी गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात त्यांच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरलेले संजय राऊत यांच्यावर लिहिलेला लेख वाचला. त्या लेखात त्यांनी राऊतसाहेबांनी संधी दिल्यामुळेच त्यांची लहानपणीची पत्रकार-लेखक होण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे नम्रपणे कबूल केले आहे.

अत्यंत खडतर परिस्थितीतून जीवनाचा यशस्वी टप्पा गाठलेले शामसुंदर हे अगदी शालेय जीवनांतील शिक्षकांपासून ते लहानपणी मांडीवर झोपवून धार्मिक ग्रंथांची पारायणे ऐकविणाऱया आजीबद्दल अनेकदा कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणूनच लहानपणीची आजी तुळसाबाई, अनेक शालेय शिक्षक, कंत्राटी काम देणारे कंत्राटदार, सुतारकाम करणारे पांचाळ, ज्यांच्या आशीवार्दाने प्रेसची काळी शाई हाताला चिकटली ते गुरुवर्य विश्वनाथराव वाबळे आणि संजय राऊतसाहेब या साऱयांचे ऋण आजही ते विसरत नाहीत.

अशा या कृतज्ञ मित्राच्या आयुष्यातील अनेक खाचखळगे आणि यशापयशाचा मी गेली बावीस-तेवीस वर्षे साक्षीदार आहे. कदाचीत त्यामुळेच असेल, शामसुंदर हेही मुंबईत बिकट परिस्थितीशी सामना करणाऱया अनेकांना मदतीचा हात देत असतात. त्यातील काहीजण आजही त्यांचे ऋणी आहेत. मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि लायकी नसतानाही केवळ शामसुंदर यांच्या आशीवार्दाने ज्यांना पत्रकारितेत उच्च पदे मिळाली ते कृतघ्न आणि ढोंगी लोक फक्त त्यांच्या पश्चात्तापास कारणीभूत आहेत.

असो. दुसऱयांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱया शामसुंदर सोन्नर यांनी मलाही वेळोवेळी आधार दिला, प्रोत्साहन दिलं, अनेकदा चांगलं मार्गदर्शन केलं. म्हणूनच अनेक नवोदितांना आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्यांना प्रोत्साहन ठरेल असा त्यांचा जीवनपट उलघडविण्याचा प्रयत्न.
शामसुंदर सोन्नर यांचा जन्म बीड जिह्यातील वडखेलसारख्या अत्यंत मागासलेल्या गावात झाला. गावात चौथीपर्यंतची शाळाही नव्हती इतकं मागासलेलं ते खेडं. तथापि अशा मासलेल्या ठिकाणी जन्म होऊनही या सामान्य कुटुंबातील युवकाला कळायला लागल्यापासूनच आपण लेखक व्हावं असं वाटत होतं. आज ते पत्रकार-लेखक झालेले आहेत ते काही अपघाताने किंवा चुकूनमाकून नाही, तर मजुरीची कामं करीत असतानाही एक ध्येय ठरवून ते संधीची वाट पाहत होते. या संधीच वाट पाहत असताना अनेक काटेरी मार्ग आणि अवघड कडे त्यांच्या आड आले. पण मार्गदर्शनाच्या सुगंधीची पखरण करणारे प्रेमाचे काही हातही त्यांच्या डोक्यावरून फिरले.

या त्यांच्या वाटचालीत, पत्रकारितेत त्यांना अनेक गुरू भेटले. परंतु अध्यात्म आणि साहित्याची एक समज येण्याचं नकळत काम त्यांच्या आजीकडून घडलं. विठ्ठलाची भक्त असणारी त्यांची आजी तुळसाबाई ही दोन वर्षाच्या शामसुंदरला मारुतीच्या पारावर चालणाऱया धार्मिक ग्रंथांच्या पारायणासाठी घेऊन जात असे. त्यामुळे त्या ग्रंथाचे निरूपण, मांडणी, कथानक हे आपोआप मनावर बिंबत गेले. रामायण, महाभारत, हरिविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत, नवनाथ, ज्ञानेश्वरी या धार्मिक ग्रंथाबरोबरच तुकाराम, नामदेव आदि संतांचे अभंग वाचणे, त्यावरील किर्तनं ऐकणं आणि निरूपणं समजून घेणं हा छंद बालवयातच त्यांना जडला. त्यामुळे अज यशस्वी पत्रकारीता करत असतानाच ते ह... शामसुंदर महाराज म्हणूनही अवघ्या वारकरी सांप्रदायात प्रसिद्ध आहेत.

चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असताना किसनराव महामुनी हे धार्मिक शिक्षक त्यांना भेटले. तेही रोज मारुतीच्या पारावर चालणाऱया पारायणासाठी येत असत. शामसुंदर यांच्यातील धिटाई आणि समज पाहून त्यांनी अनेक वेळा एखाद्या ग्रंथातील एखाद्या अध्यायाच्या ओव्यांच्या निरूपणाची संधी त्यांना दिली. त्याअगोदर गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचं नियोजन करणारे शंकरराव बोडके ऊर्फ मास्तरसाहेब यांनी तर त्यांना धार्मिक ग्रंथातील आशय समजावून त्याच्या विवरणाचं बाळकडू दिलं. पुढे पाचवीनंतरचं शिक्षण वडखेलपासून सुमारे 7 कि.मी. असणाऱया पिंपळगाव या गावी झालं. तेथेही मुख्याध्यापक राडकर, शिक्षक दसवंते, राख, नानवटे, फुटके, कुलकर्णी, भांगे, घोडके आदी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं. तेथे शिकत असताना वार्षिक स्नेहसंमेलनात बसविल्या जाणाऱया एकांकिका यात भाग घेणं, कविता सादर करणं यामुळे नकळत लेखक बनण्याची ऊर्मी त्यांच्यात अधिक दृढ होत गेली.

शालेय शिक्षणाशिवाय काहीतरी वेगळं करून दाखविण्याची खुमखुमी असल्यामुळे शामसुंदर गाव सोडून मुंबईला आले. कुणाचाही आसरा नाही, कोणत्याही रस्त्याची माहिती नाही, काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही, अशा अवस्थेत कॉलेज प्रवेशासाठी म्हणून आजोबा बळीराम सोन्नर यांच्याकडून 100 रुपये घेऊन त्यांनी महामुंबईत पाऊल ठेवले. त्यातले 65 रुपये गाडीभाडय़ात खर्च झाले होते आणि उरलेल्या 35 रुपयांत काय करावं, असा प्रश्न डोळयासमोर उभा असताना मुंबईतील गोल देऊळ नाक्यावर मजुरीचं काम मिळतं असं त्यांना गावीच कुणीतरी सांगितलं होतं. त्यांच्या गावचे काही लोक तेथे कामही करत होते. म्हणून मुंबई सेंट्रल बस स्थानकात उतरल्यानंतर विचाराच्या तंद्रीत त्यांनी गोल देऊळ नाका गाठला. मजुरीचं काम करण्याची सवय नव्हती. पण पोटासाठी काहीही करणं भाग होतं. इलाज नव्हता. गावी परत जायचा विचारच नव्हता. अखेर एका बांधकाम व्यावसायिकडे रेती, विटा आणि सिंमेट उचलण्याचं काम मिळालं.

गावाकडच्या माळरानावर हुंदडायचं, मौजमजा करायचं, विटी-दांडू खेळायचं जे वय होतं त्याच वयात वाळूची गोणी डोक्यावर घेऊन इमारतीचे मजले चढताना त्यांचे पाय लटपटत. पण मन खंबीर होतं. त्यामुळे पायात गोळे आल्यावर ते क्षणभर थांबत पण पुन्हा मन घट्ट करून तितक्याच ताकदीनं आपल्या इवल्याशा हाताने वाळूची गोणी पकडून ते पायऱया चढत. पाच-सहा मजले चढताना अंगातून घामाच्या धारा वाहू लागत. काम करण्याची सवय नसल्यामुळे गावाकडची आठवण सतावू लागे. पण त्यांचा दृढनिश्चय पक्का होता. नाही... काहीही झालं तरी आता माघार नाही. या त्यांच्या निश्चयानेच जीवनात कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची ताकद दिली. दिवसभर अंगमेहनतीचं ढोरकाम केल्यानंतर रात्री अर्ध्यापोटीच निद्रादेवी त्यांच्यावर अरेरावी करी. त्यामुळे कोवळी हाडं ठणक्या मारत असतानाही त्यांच्या डोळयावर झापड येत असे. गावाला आजीच्या कुशीत झोपून आकाशातील ताऱयांशी खेळत स्वप्ने रंगवाणाऱया शामसुंदरना मुंबईत गोणपाटाचा आधार घ्यावा लागत असे.

याच दरम्यान सुतारकाम करणारे पांचाळ बाबू यांनी फार आधार दिला. इतर अनेक कामे मिळवून देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. इमारत दुरुस्तीची कामं वेगवेगळया ठिकाणी करीत असतानाच शिवनेर कार विश्वनाथराव वाबळे यांच्या इमारत दुरुस्तीचं काम करणाऱया कंत्राटदाराकडे काम मिळालं. ते काम म्हणजे जीवनाच्या खडतर मार्गावरील एक यशस्वी वळणच ठरलं. कारण या इमारतीच्या पहिल्या दिवशीच विश्वनाथराव वाबळे ऊर्फ बाबा यांच्या रूपानं त्यांना देवच भेटला. त्या दिवसापासून सिमेंटच्या पाटय़ा आणि वाळूच्या गोण्या वाहण्याचं त्यांचं काम बंद झालं. त्यांनी एका वेगळयाच दुनियेत प्रवेश केला. लहानपणापासून पत्रकार व्हायची इच्छा होती त्या क्षेत्रात बाबांमुळेच ते आले.
ती घटनाही मोठी विलक्षण आहे. कुठलीही गोष्ट योगायोगाने घडली असे आपण म्हणतो. पण शामसुंदर आणि विश्वनाथराव वाबळे  यांच्या भेटीला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. एक योगायोग की साक्षात व्यंकटेशानं घडवून आणलेलं विधिलिखित की अन्य काय... कारण इथून पुढेच त्यांच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली.

वाबळेसाहेबांच्या बिल्डिंगच्या कामावरील तो पहिलाच दिवस होता. बाबा नुकतेच आंघोळ करून खडय़ा आवाजात व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते. सहा फूट उंच आणि धिप्पाड बाबांच्या पाठीमागे रेतीने बरबटलेलं शिडशिडीत अंग घेऊन शामसुंदर उभे होते. व्यंकटेश स्तोत्र पाठ असल्यामुळे ते मनातल्या मनात बाबांसोबत म्हणत होतो. परंतु ज्यावेळी द्रोपदीची वस्त्रे अनंता। देत होता असे भाग्यवंता। आम्हालागी कृपनता। कोठुनी आणिली गोविंदा। या वाक्याजवळ ते आले त्यावेळी नकळत परिस्थितीमुळे असेल कदाचित परंतु हे वाक्य शामसुंदर यांच्या तोंडून मोठयाने उच्चारलं गेलं. त्यांच्या सुरात सूर मिसळून ते वाक्य उच्चारलं गेल्यामुळे बाबांचं लक्ष्य आपोआपच पाठीमागे गेलं. त्यांनी एक नजरेचा कटाक्ष टाकला आणि पुन्हा पूजा चालू ठेवली. बाबांनी मागे वळून पाहिल्यामुळे शामसुंदरना मनातून भीती वाटू लागली. साहेबांना मी इथं उभा राहू राहून व्यंकटेशस्तोत्र म्हटलेलं आवडलं नाही की काय... मी मध्येच बोलल्यामुळे साहेब दुखावले की काय... आता हाताचं कामही जाणार... दुसरं काम कुठं शोधायचं ... उगीच अवदसा आठवली आणि मी इथं उभा राहिलो असा स्वत:ला दोष देत ते तिथंच उभे राहिले.

एव्हाना बाबांची पूजा आटोपली होती. त्यांनी शामसुंदरला आपल्या खडय़ा आवाजात हाक मारली. ए पोरा इकडं ये रे. काय नाव काय तुझं? बाबांची भेदक नजर आणि भरडय़ा आवाजामुळे 14-15 वर्षाचे शामसुंदर हात जोडून बाबांपुढे उभे राहिले. त्यांचं संपूर्ण अंग सिमेंटनं माखलं होतं.
शामसुंदर जवळ येताच बाबांनी आपल्याजवळ खुर्चीवर बसायला सांगितलं. घरची, शिक्षणाची चौकशी केली आणि मागचापुढचा विचार न करता खडसावलं, आमची प्रेस आहे. शिवनेर, नावाचं दैनिक आम्ही काढतो. उद्यापासून तू आमच्याकडे काम कर. आजपासून तू हे काम सोडून दे. तुझ्या ज्ञानाचं आणि कौशल्याचं चीज होईल माझ्याकडं.,
बस्स... याला योगायोग म्हणा किंवा पांडुरंगाची कृपा।

दुसऱया दिवशी शिवनेर मध्ये शामसुंदर दाखल. शिशाची जुळवलेली अक्षरं आणि त्याची तयार झालेली वर्तमानपत्राची पानं घेऊन दुसऱया प्रेसमध्ये जाण्याचं काम सुरूवातीला त्यांना मिळालं. मुळातच शिक्षण्याची आणि काहीतरी करण्याची जिद्द असल्यामुळे कंपोझिटरच्या बाजूला उभं राहून हे कसं कंपोझ करतात याचं निरीक्षण ते करू लागले. त्याचा कॅललॉग पाठ करू लागले. त्यावेळचे शिवनेरचे फोरमन दिनकरराव झारापकर यांना त्यांनी कंपोझिंग शिकवण्याची विनंती केली. त्यांनीही ते कबूल केलं आणि एका महिन्यातच ते कंपोझिटर झाले. माझी आणि शामसुंदर यांची भेटही या शिवनेर नावाच्या मंदिरात झाली. शिवनेर चे कार्यालय म्हणजे खरोखरच एक मंदिर आहे. कारण या मंदिरातील बाबांच्या आशीर्वादाचा हात ज्यांच्या ज्यांच्या माथ्यावर फिरला ते सर्वजण आज या क्षेत्रात अनेक मानाची पदं उपभोगीत आहेत. कितीतरी लोक शिवनेर मध्ये शिक्षण घेऊन अन्यत्र नोकरी करत आहेत.

असो. या कार्यालयातच शामसुंदर कंपोझिटर आणि मी प्रुफरीडर असल्यामुळे दैनंदिन कामकाजात आमाचा नेहमीच संबंध येत असे. इथंच आमचं मैत्रीचं नातं घट्ट झालं. बातम्या कंपोझ करताना, लेख कंपोझ करताना मुळातील त्यांची लेखक, कवी प्रवृत्ती जागी व्हायची आणि अधिक चिकीत्सक पद्धतीने ते वाचायचे. त्यातूनच वाचकांची पत्रं लिहायला लागले. पुढे काही बातम्याही लिहायला लागले. थोडय़ा दिवसांत साधलेली प्रगती शिवनेर चे संपादक विश्वनाथराव वाबळे व कार्यकारी संपादक नरेंद्र वाबळे यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यानंतर त्यांनी काही सदर-लेखनाची संधी दिली. लहानणी ठरविलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकू अशा आशा पुन्हा त्यांच्या मनात पल्लवित झाल्या.

याच दरम्यान सामना या वर्तमानपत्राच्या निर्मितीची जुळवाजुळव सुरू होती. वेगवेगळया विभागांत कर्मचारी भरण्याचं काम सुरू होतं. दरम्यान, त्यांनी डी.टी.पी. ऑपरेटिंगचं कामही त्यांनी शिकून घेतलं होतं. थोडंसं संगणकीय ज्ञानही मिळवलं होतं. त्यामुळे सामना मध्ये कर्मचाऱयांची भरती आहे हे कळताच मी शामसुंदर यांना सानाचे विश्वस्त सुभाष देसाई यांना शामसुंदर यांच्यासाठी विनंती केली. देसाईसाहेबांनीही ती मान्य केली आणि सामनात डी.टी.पी. ऑपरेटरची नोकरी मिळाली. परंतु हे काम करत असताना लिहिण्याची ऊर्मी मात्र स्वस्थ बसू देत नव्हती. गुन्ह पत्रकारीतेबद्दल प्रचंड आकर्षण होतं. त्यावेळची गुन्हे वृत्त देणारी मोठय़ा प्रमाणातील श्री, सह्याद्री, आदी साप्ताहिकं त्यांच्या बॅगेत असायची. याचवेळी कोल्हापूरहून निघाणाऱया साप्ताहिक पोलीस टाइम्स मध्ये अंशकालीन गुन्हे वार्ताहर म्हणून त्यांची नियक्ती झाली. ते जोमाने पोलीस टाइम्स साठी गुन्हे वृत्तसंकलन करू लागले.

गुन्हे वार्ताहर म्हणजे कठोर मनाचा माणूस अशी सर्वसाधारण माणसाची समजूत असते. परंतु मुंबईतील गुन्हेगारीवर, समाजातील अपप्रवृत्तीवर प्रहार करत असतानाच शामसुंदर यांचे कवीमनही त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. मग वेळ मिळेल तेव्हा ते रेशमी प्रेमभावना व्यक्त करताना कविता तसेच स्वार्थी, ढोंगी पुढाऱयांचे बिंग फोडणारी विडंबन काव्येही ते करत.
दरम्यानच्या काळात सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी संधी दिल्यामुळे सामना मध्येच ते पत्रकार म्हणून काम करू लागले. पूर्णवेळ पत्रकारीतेचा अनुभव त्यांना इथंच मिळाला. त्यांनी केलेल्या पत्रकारितेमुळे अनेक दीनदुबळयांना न्याय मिळाला. मुंबईतील गँगवॉर तर त्यांनी भरमसाट लिहिलं आहे. त्यांच्या जीवनाला दुसरी यशस्वी कलाटणी मिळाली ती सामनामुळे आणि संजय राऊतसाहेबांमुळे.

सध्या ते लोकमत, दैनिक गुन्हे वार्ताहर म्हणून काम करत आहेत. शिवाय ई टीव्ही मराठीच्या क्राइम डायरीचे लेखनही चालूच आहे. अशा प्रकारे क्राइम रिपोर्टिंग करीत त्यांचा मूळ उपजत गुण असलेल्या अध्यात्म क्षेत्रातही त्यांचा वावर सुरू आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची कीर्तने सुरू आहेत. वारकरी सांप्रदायात तर ह... शामसुंदर महाराज सोन्नर हे नाव माहीत नसलेला एकही वारकरी भेटणार नाही. अलीकडेच ऑर्थर रोड जेलमध्ये खास कैद्यांसाठी त्यांचे झालेले कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले.

क्राइम आणि अध्यात्म अशा दोन विरूद्ध टोकांच्या क्षेत्रात ते कसे काय टिकून आहेत हे न उलघडणारे कोडे आहे. पत्रकारितेपेक्षा कीर्तनाकडे त्यांचा असलेला ओढा आणि तितकाच लोकांचा मिळणारा उत्सफुर्त प्रतिसाद यामुळे येत्या काही दिवसांत त्यांना पत्रकारीता सोडून पूर्ण वेळ कीर्तनाकडे द्यावा लागेल असे वाटते. कारण महाराष्ट्राबाहेरून गुजरातसारख्या राज्यांतूनही त्यांच्या कीर्तनाला मागणी आहे. एकेक वर्ष अगोदरपासून कीर्तनासाठी त्यांच्या तारखा बुक आहेत. त्यामुळे पत्रकार शामसुंदर ऐवजी ह... शामसुंदर महारज सोन्नर म्हणूनच ते येत्या काही वर्षात ओळखले जाणार आहेत.
अशा प्रकारे आयुष्याच्या सुरूवातीला बालमजुर, नंतर केवळ बालपणीची इच्छा आणि नवं काहीतरी करण्याची इच्छा म्हणून पत्रकार आणि अध्यात्माचे बाळकडू आजीकडून लहानपणीच मनावर बिंबवले गेल्यामुळे कीर्तनकार असा त्यांचा प्रवास सुरू आहे. त्यांचा हा प्रवास सरळसोट झालेला नाही. त्यासाठी त्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत. अनेक खाचखळगे पार करावे लागले आहेत. म्हणून बालमजूर ते कीर्तनकार व्हाया पत्रकार हा त्यांचा प्रवास निश्चितच अनेक होतकरूंना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.