मल्हारराव होळकर

मल्हारराव होळकर ( १६ मार्च १६९३ - २० मे १७६६ ) हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते. ते शिवाजीच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.

बालपण
मल्हाररावांचा जन्म भटक्या धनगर कुटुंबातला होता. त्यांच्या वडिलांचा, खंडोजी वीरकर चौगुला यांचा, अशाच धनगरी भटकंतीत पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातील होळ या गावी मुक्काम पडला होता. या गावी तांड्याचा मुक्काम असतानाच मल्हाररावांचा जन्म १६ मार्च १६९३ रोजी झाला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ या मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हारराव आपल्या पराक्रमाने, कसलीही घराणेशाहीची परंपरा नसतांना स्वबळावर पुढे येत मराठेशाहीचे मुख्य आधारस्तंभ बनले. ते एक धोरणी, मुत्सद्दी व शिवरायांच्या गनिमी काव्याला अंगीकारणारे सेनानी होते. अंगी गुण असले, वीरश्री असली तर एक सामान्य अनाथ धनगर मुलगा भारताच्या इतिहासाला घडवणारा महानायक कसा बनू शकतो हे मल्हाररावांनी सिद्ध करून दाखवले.

कारकीर्द
मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.

भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हाररावांची धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

उत्तरोत्तर मल्हाररावांची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा झाला होता. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. १७ मार्च १७५४मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी खंडेराव छावणीतून बाहेर पडले आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून त्यांना वीरमरण प्राप्त झाले. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हाररावांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी अकराजणी सती गेल्या. पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हाररावांनी मोहिमा उघडल्या. इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. यात त्यांना मल्हाररावांनी मदत केली. मात्र, मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका त्यांनी अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळे सोडून दिले. त्यांच्या याच कृतीने घात झाला. आणि पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हाररावांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला.

मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.

जयाजी शिंदेंचा बिजोसिंगने केलेला खून आणि कुंभेरच्या लढ्यात खंडेराव होळकरांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रकरणांमुळे शिंदे-होळकरांत जरी वैमनस्य निर्माण झाले असले तरी मराठी साम्राज्याच्या हितासाठी त्यांनी शिंदेंशी पुन्हा मैत्री साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. 'शिंद्यांशी मैत्र होते तोवर पेशव्यांनाही आमची धास्ती होती..' असे सार्थ उद्गार दत्ताजी शिंदेंनी त्यांची भेट नाकारल्यावर काढले. तरीही ते किल्मिष मनात न ठेवता मल्हाररावांनी बुराडी घाटावर दत्ताजी शिंदे झुंजत असताना तुकोजीराव होळकरांना मदतीसाठी पाठवले.

पानिपतच्या युद्धापूर्वीच १३ मार्च १७६0 रोजी मल्हाररावांनी अब्दालीशी तह करून त्याला परतही पाठवायची सुरुवात केली होती, परंतु तोवर भाऊसाहेब पेशवेच उत्तरेत यायला निघाल्याने नजीबाच्या आग्रहाने अब्दाली येथेच थांबला. १४ जानेवारी १७६१ रोजी मल्हारराव होळकर ऐन वेळी रणमैदान सोडून गेले असा त्यांच्यावर आक्षेप आहे पण आता नव्या पुराव्यांच्या प्रकाशात संजय क्षीरसागर या संशोधकाने, मल्हारराव सायंकाळी साडेपाचपर्यंत रणमैदानावरच झुंजत होते, व त्यांनी आपला सरदार संताजी वाघ यास भाऊच्या मदतीसाठी ससैन्य पाठवले होते हे सप्रमाण सिद्ध केले आहे. (हे पुरावे अजून इतिहासकारांनी मान्य केलेले नाहीत.!)

पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांच्या पहिल्या पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्युमुखी पडल्या. त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारराव अनेकदा तिच्याशी सल्लामसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदाऱ्या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

मृत्यू
पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या. पेशव्यांच्या घरात त्यांना वडीलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.