मेंढ्यांच्या लेंड्या फायद्याच्या

रानावनात मेंढ्या चारत फिरणारा धनगर समाज आता शेतीत स्थिरावतोय. बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरखेडचे हटकर कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून फिरता मेंढपाळ सोडून स्थिर झाले. दहा वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या १५० एकर माळरानात त्यांनी लेंढी खताच्या सहाय्याने नंदनवन फुलवले. धनगर समाज म्हटले की मेंढपाळ करणारा, रानावनात भटकणारा असे चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहाते. पण बुलडाणा जिल्ह्यातल्या हिवरखेडच्या हटकर कुटुबाने हे चित्र बदलायचे ठरवले. दिवसभर मेंढ्या चारत भटकायचे आणि रात्री दुसऱ्याच्या शेतात मेंढ्या बसवायच्या हा त्यांचा नित्यक्रम. रात्री मेंढ्याच्या पडणाऱ्या लेंड्यांमुळे दुसऱ्यांची शेती फुलायची आणि त्याबदल्यात हटकरांना धान्य आणि पैसे मिळायचे. पण ह्याच मेंढ्या जर आपल्या स्वतच्या शेतात बसवून भटकण्याऐवजी स्वतच शेती करण्याचा विचार दादारांवांनी केला. मेंढपाळातून मिळालेल्या पैश्यातून गेल्या दहा वर्षांपूर्वी दादाराव आणि त्यांच्या ४ भावांनी ३५ लाख रुपयांना १५० एकर माळरानाची खरेदी केली. २००५ मध्ये त्यांनी फिरता मेंढपाळ व्यवसाय बंद केला आणि हिवरखेड इथे स्थिर होऊन शेतीला सुरुवात केली. १५० शेतीजमिनीचे प्रत्येकी १० एकरांप्रमाणे भाग पाडले. जमिनीचे सपाटीकरण केले. त्यामध्ये मेंढ्यांचे खत टाकले. त्यामुळे ओसाड माळरानात नंदनवन फुलू लागले.

आज त्यांच्याकडे दरवर्षी ३० एकरात ठिबकवर कापसाचे पीक घेतले जाते. यापासून त्यांना दरवर्षी ३५० क्विटल कापसाचे उत्पादन मिळते. त्यांच्याकडे ४० एकरांत संत्रा २० एकरात डाळींबाचे पीक आहे. त्यांच्या फिरत्या मेंढ्या आता बंदिस्त जागेत राहात असल्याने त्यांना १०० ट्रॉली लेंडीखत मिळते. हीच त्यांची खरी कमाई.

बंदिस्त मेंढीपालनासाठी त्यांनी लोखंडी गव्हाणी तयार केल्या. शेती करायला सुरुवात केल्यानंतर दादारावांनी विहीरी खोदल्या. फलोत्पादन योजनेतून शेततळ्याची निर्मिती केली. मेंढ्याना हिरव्या चाऱ्यासाठी बरसीम, हत्ती गवत, लसूण गवताची लागवड केली. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्यांना कडबाकुट्टीचा वापर केला. बंदिस्त मेंढापालनामुळे मेंढ्यांना चांगला दर्जाचा चारा मिळू लागला. मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळाली. यामुळे मेंढ्या आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी झाले. आज त्यांच्याकडे चारशे मेंढ्या आहेत.

आज त्यांच्या एका संत्रा, डाळिंब आणि कापसाच्या पिकांपासून त्यांना वार्षिक खर्च जाता अंदाजे ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्याशिवाय संपूर्ण कुटुंबाला लागणाऱ्या धान्य आणि भाजीपाल्याचे उत्पन्न घरच्याच शेतीतून मिळत. मेंढ्यापासून वर्षभरात खर्च जाता पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मेंढ्यांमुळे त्यांना १५० एकर शेतीला खतांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागत नाही.

काही वर्षांपूर्वी भटकंती करत जीवन जगणारे हटकरांचे कुटुंब आता स्थिरावले. घोड्यावरुन प्रवास करणारे आता कारमधून प्रवास करतायत. शेती करायचे म्हटल्यावर त्यांना वेड्यात काढणारा त्यांचा समाज त्यांच्या शेतीतल्या प्रगतीने अवाक झालाय. भटकंती थांबल्याने त्यांची मुले आता चांगल शिक्षण घेतायत. त्यामुळे रानोमाळ भटकणाऱ्या धनगर समाजाने हटकरांचा आदर्श घ्यायला हवा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.