कसारा घाटातली घुमटाकार बारव!




पाण्याच्या व्यवस्थांबाबत अवघ्या भारतात लक्षणीय कामगिरी करणारी व्यक्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. त्यांनी १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक घाट बांधले, तीर बांधले, अनेक बारवा बांधून दिल्या, कित्येक मंदिरं, धर्मशाळा बांधून वाटसरूंचा सोय पाहिली. त्यांच्या या कामांची साक्ष देणारी एक वैशिष्ट्यपूर्ण बारव मुंबई - नासिक मार्गावरील कसारा घाट चढताना उजव्या हाताला दिसते.

कसारा घाट म्हणजे "थळ घाट". या घाटात नासिककडं चढताना रेल्वे बोगद्याच्या पुढे येताच उजव्या हातास गोल घुमटाकार वास्तू दिसून येते. साधारण उलट्या टोपलीच्या आकाराची किंवा इगलू समान दिसणारी ही प्राचीन वास्तू लक्ष वेधून घेते. बारव मुख्य रस्त्यातून ५० फूट अंतरावरच आहे. १५ फूट व्यासाची बारव. पूर्ण दगडी बांधकाम. ती सुबक पद्धतीने बांधली आहे. हा तब्बल २५० वर्षांचा वारसा.

झाड पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनवला आहे. दगडी शिळा एकमेकांवर ठेवत राजवाडे किंवा महालाच्या घुमटासमान हे छत्र बनवताना बारवीच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत तिची स्वच्छताही ठेवण्याचं काम केलेलं दिसतं.

या बारवेत वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असतं. घाटातील दोन वाड्यांतील महिला आजही वर्षभर ह्याच बारवेचं पाणी उपसून नेतात. बारव किती खोल आहे याचा अंदाज, त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही. मात्र, आजही बारव स्वच्छ व सुंदर असून तिच्यात थोडीही पडझोड झालेली नाही. बारावेवर कुठेही शिलालेख किंवा नक्षीकाम नाही. स्थानिक व अभ्यासकांच्या मतानुसार ही बारव अहिल्याबाई होळकर यांनीच बांधली असल्याचं समजलं.

या घाटाला प्राचीन इतिहास आहे, पूर्वीपासून या घाटातून मोठी व्यापारी वाहतूक व्हायची. प्रवाशी व व्यापारी सोबत सैन्यासही तहान भागवण्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर विसंबून राहावं लागत असे. हीच बाब लक्षात घेत अहिल्याबाईंनी या बारवेची निर्मिती केली.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट" असं म्हटलं आहे, त्याची खरी प्रचिती ही बारव व असंख्य धर्मशाळा, देवळं व घाट बघताना येते.
....
सह्याद्रीत मुशाफिरी करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींवर लिहणारा तरूण लेखक श्री. बी.एस. फोदासे ऊर्फ बी.एस.एफ. त्यांनी शेअर केलेली ही माहिती व फोटो.
.....
आपणही "भवताल"च्या  जलव्यवस्थांचा शोध या उपक्रमात सहभागी व्हा.
आणि परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थांचे फोटो, व्हिडिओ, माहिती शेअर करा.
संपर्क :
व्हाट्सअप - 9822840436
ई-मेल - bhavatal@gmail.com
- संपादक, "भवताल"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.