कलासक्त उद्योगी समाज…. धनगर !

गिरीश प्रभुणे
“यळकोट यळकोट जय मल्हार’ म्हणून जेजुरीला गजर करणारा भंडारा उडवत ढोलाच्या तालावर नाचणारे धनगर! धनगर वाड्यांतून हे ढोल घुमू लागतात सुगीनंतर शिमग्यापासून… पावसाळ्यापर्यंत. या ढोल-लेझिम, झांजा ही महाराष्ट्राची आदिम कला, धनगर समाजातूनच सर्वत्र आली. एखादी भिंगरी गतीनं फिरावी तसे धनगरांचा एक समूह ढोलाच्या तालावर फिरतो… घुमतो. सारा आसमंत भंडाऱ्याच्या-हळदी रंगानं भरलेला.
“यमगरवाडी’ म्हटलं की आता “पारधी’ आठवतो. पण यमगरवाडी हे खरं तर “धनगरवाडी’ आहे. “बनगरवाडी’ व्यंकटेश माडगुळकरांची आपल्याला ठाऊक असते. आता अमोल पालेकरांचा चित्रपट कदाचित आठवू शकतो.
“धनगर’ या नावातच किती वजनदारपणा आहे! लमाण-बंजारा-वडारांसारखाच हा समाज मोठ्या सं”येनं महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात पूर्वी अक्षरशि घरोघर घोंगडी असायची. झोपायला, खाली अंथरायला, पाहुण्यांसाठी बसायला. बाहेर कुठं शेतकरी चालला तर या घोंगडीची खोळ तयार करून ती इरल्यासारखी डोक्यावर घ्यायची. ज्यामुळं ऊन वा पाऊस लागायचा नाही.इंग”ज अधिकाऱ्यांना, “तुमची खरी प्रजा कशी आहे? त्याच्या वेदना व्यथा काय आहेत?’ हे सांगण्यासाठी महात्मा फुले ज्या वेशात गेले तो पोषाख तत्कालीन शेतकऱ्याचा-सामान्यांचा होता. त्यात ठळक उठून दिसते ती घोंगडी आणि पागोटं. लालसर-कुसुंबी रंगाचं.
धनगर समाज हा एक समृद्ध सामाजिक परंपरा असणारा समाज. महाराष्ट्रात पंढरपूर, सांगोला, आटपाडी, सांगली, कऱ्हाड, इस्लामपूर, राळवा, धुळे, जळगाव-नंदुरबार, पुण-सातारा- कोकण-विदर्भ सर्वत्र हा समाज आहे. विशेषति खंडोबा हे दैवत, ज्योतिबा, तुळजाभवानी-अंबाबाई ही महाराष्ट्राची आराध्य दैवतं या समाजाचीच.
“यळकोट यळकोट जय मल्हार’ म्हणून जेजुरीला गजर करणारा भंडारा उडवत ढोलाच्या तालावर नाचणारे धनगर! धनगर वाड्यांतून हे ढोल घुमू लागतात सुगीनंतर शिमग्यापासून… पावसाळ्यापर्यंत. या ढोल-लेझिम, झांजा ही महाराष्ट्राची आदिम कला, धनगर समाजातूनच सर्वत्र आली. या ढोल-लेझिम खेळांचं वैशिष्ट्य म्हणजे ढोलाच्या तालावर नाचायला सुरूवात झाली की नाचणाऱ्यांबरोबर पाहणाऱ्यांचे पायही ताल धरू लागतात. लेझिमऐवजी रूमाल असतात. दोन पायांत अंतर, कमरेत किंचित झुकून एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे. पुढच्या पावलाच्यावेळी मागचं पूर्ण उचललेलं. मागच्या पावलाच्या वेळेला पुढचं उचलेलं आणि असं एक वेळ पुढं मागं तालात झाल्यावर एक स्वतभिोवती गिरकी. या स्वतभिोवतीच्या गिरकीबरोबरच समोरच्याच्या भोवती गिरकी आणि हे सर्वजण एकाच वेळेला करतात. ढोलाच्या तालावर अशी अनेक रिंगणं. त्यातही प्रकार. सुरुवातीला नुसतीच पावलं टाकत चालणारा हळूहळू गती घेतो. डोळ्याचं पातं लवतं न लवतं एवढ्या वेळात स्वति भोवती गिरकी घेत हवेतच ही गिरकी! एखादी भिंगरी गतीनं फिरावी तसे धनगरांचा एक समूह ढोलाच्या तालावर फिरतो… घुमतो. सारा आसमंत भंडाऱ्याच्या-हळदी रंगानं भरलेला. नुसत्या रूमालांचा नाचसुद्धा असाच देखणा. या साध्या रूमालात चैतन्य येतं. हात वरून खाली येताना गिरकी घेताना रूमालांचं… गतिमान मुरकणाऱ्या-थिरकणाऱ्या रूमालांचं देखणं रूप…! नुसते ढोल आठ-दहा असतात यांच्या या नृत्यात. हा ढोलीया जी गिरकी घेतो ती तर व्वा… कसरतीतील कम्माल! हे सर्व ढोलीये जो खेळ दाखवतात ती त्यांच्या शरीराची लवचिकता… आणि हेच कसब त्यांच्या युद्ध कौशल्यात दिसतं! दोन्ही हातात तलवार घेऊन लढणारे मल्हारराव होळकर… शत्रूची दाणादाण उडविणारे… या ढोल-लेझिमच्या नृत्यात… हातात घुंगरकाठी, तलवार-भाला आणि दांडपट्टा असे खेळ हे या समाजाचं वैशिष्ट्य. जगण्यासाठी वणवण भटकणं… यात येणारे युद्धाचे प्रसंग. पाचशे, हजार, पाच हजार अशा सं”येनं मेंढरांचे कळप. त्यात आठ-दहा घोडी, घोड्यांवर पालं, सामान लादून पायी… अक्षरशि पायीच प्रवास! मैलोगणती. सहा महिने गावाकडे तर सहा महिने रानोमाळ मेंढरं चरवत बसवत जाणं. या साऱ्या जीवन शैलीत कमीत कमी सामानात प्रवास. एक मोठं पाल म्हणजे पूर्वी गोधडी, मध्यंतरी ताडपत्री होती. आता पिवळी, निळी, प्लॅस्टीकची ताडपत्री. स्वयंपाकाची दोन पातेली. एक दोन घागरी, तवा, अंथरूण, पांघरूण. थोड्या कोंबड्या त्या डालायचं डालगं. दोन-चार कुत्री. जिथं मुक्काम पडणार तिथं प्रथम देव बसवून मग मुक्काम.
धनगरांचा पोशाख कमरेला लंगोट, धोतर, लुंगीवर पांढरा मळकट सदरा. हातात एखादं चांदीचं कडं. बोटात अंगठ्या, कानात भिकबाळी, पायात जाड वहाणा आणि डोक्याला मुंडासं, पागोटं अथवा किंचित सरकवलेली टोपी. खांद्यावर घोंगडी, हातात एक लांब काठी, त्या काठीला पुढे विळा, झाडपाला तोडून मेंढरांना खायला घालायला. पूर्वी कमरेला तलवारही असायची, गळ्यात कवड्यांच्या माळा, कमरेला एक सुरेख चंची, भंडाऱ्याची एक पिशवीपण असते. प्रवासात गायरान, कुरणं माळरानावर चरतचरत रात्रीची कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतात मेंढरं बसवायची. तो धनगर बाकळीपण ढाळतो. एकाचवेळी शेतकऱ्याच्या अनेक गोष्टी होतात. मेंढरांना चारा मिळतो. मेंढरं बसविण्याचे थोडेफार पैसेही अलीकडे मिळू लागलेत. पूर्वी धान्य घेत असत. एकदा मेंढरं बसवली की तीन वर्ष पीक जोमानं येतं. यात एकच काम जरा जिकीरीनं करावं लागतं. मेंढरं बसवण्यानं शेतात लेंड्यांंचं खत मिळतं, परंतु त्या लेंड्यांबरोबर बाभळीच्या बियाही पडतात आणि पहिल्याच पावसात चांगल्याच रुजतात! खुरपणी वेळीच नाही केली तर शेतात बाभळीचं रान माजतं.
तर या मेंढरांची लोकर हे मेंढपाळांचं मु”य उत्प. धनगरांमध्ये या लोकरीच्या घोंगड्या बनविण्यातच विविध प्रकि”यांना धरून व्यावसायिक जाती पडल्या. हाटकर, यमगर, सलगर अशा आठ-दहा जाती पडल्यात. त्यांची कुळगोत्रंही आहेत. शुद्ध मराठीबरोबरच यांची अशी भाषा आहे. ज्याचा उल्लेख खिवारी म्हणून केला जातो. यांच्यात एक “धनगरी ओव्या’ हा एक गायनाचा प्रकार आहे. तासन्‌तास, रात्रभर या ओवी गायनाचा प्रकार असतो. एकजण दूर उभा राहून हातांच्या खुणांनी मूकपणे काही सांगतो. हे सांगणं दुसरे दोघेजण ओवीतून ओळखतात.
धनगर समाज हा तसा पूर्णति कष्टाळू-व्यापारी समाज. मेंढरांची लोकर दर सहा महिन्यांनी कापायची. ही कापणारे वेगळे धनगर. त्यांची लोकर पिंजून बनवून त्याचं सूत तयार करणारे वेगळे, त्याची घोंगडी बनविणारे वेगळे, याला खळ लागते ती बनवून देणारे वेगळे, याला रंग द्यावा लागतो. ही सर्व कामे पूर्वी धनगरच करीत. यात मेंढरांच्या लोकरीची प्रथम कापणी म्हणजे जावळ कापणी. या जावळ लोकरीची घोंगडी मऊ असते. त्याला मागणीही खूप आणि किंमतही जास्त मिळते. एका मेंढराची 100 ते 125 ग”ॅमपर्यंत लोकर मिळते. पूर्वी ही लोकर औंसवर मोजली जायची. दहा मेंढरात एक ते सव्वा किलो. साधारणपणे 30 रु. किला दरानेे ही लोकर खरेदी केली जाते. करणावळ वगैरे धरून दीड किलो लोकरीच्या एका घोंगडीला 150 रु. मिळतात. याला चिंचोक्यांची खळ तयार करून लावतात. पिळदार लोकरीच्या सुताचे बिंडे दोऱ्यांवर ठेवतात. मग हातमागावर हे सर्व ठेवून घेऊन मग विणकाम सुरू होते.
माग हा अगदी साधा. समोर एक दोरीला आडवी काठी, आडव्या काठीला दोन्ही बाजूने ताणून बांधले जाते. हातानेच लोकरीचा बिंडा सरकवायचा. साधारणपणे उभे धागे 150 ते 250 जाडीवर अवलंबून ही लांबी-रुंदी. आधी उभे धागे त्याला बांधून घेतात. यातच काठाची नक्षी ठरवून टाकतात.
यमगरवाडीच्या परिसरात पूर्वी दोनेकशे माग होते. आता जेमतेम चार-पाच शिल्लक आहेत. सांगोला परिसरात बलवडी, जवळा, सोमलवाडी, बागलवाडी या गावात या धंद्याने कात टाकलीय. तीनशे कुटुंबातून जवळजवळ पंधराशे लोक या व्यवसायातून आपले पोट भरतात. पूर्वी फक्त घोंगडीच बनविली जायची. आता सांगोल्यात माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉ. संजीवनी केळकर यांच्या प्रयत्नातून या व्यवसायाला नवजीवन प्राप्त झालंय. घोंगड्यांबरोबरच गालिचे, कारपेट, बस्कर, योगा सिट मॅट, फ”ुट डिशेस, पर्स, मोबाईल कव्हर, डायरी कव्हर, फाईल्स असे अनेक प्रकार इथं बनविले जातात. त्याला आधुनिक “मॉल’चं मार्केटही उपलब्ध झालंय. आता वरून घालायचे जाकिट, कोट, लहान मुलांचे जाकिट हे बनविले जाऊ लागलेत. आता बॅंकाही अर्थसाहाय्यासाठी पुढे आल्या आहेत.
याचं कुटिरोद्योगाचं स्वरूप तसंच ठेऊन यात सुधारणा केल्याने रोजगार-हाताला काम सुरूच राहिले. परंतु हा अपवाद. आज धनगरांचं मेंढपाळपण संपुष्टात येऊ लागलंय.
लोकर लुधियाना-रेमंडसार”या ठिकाणचे व्यापारी येऊन खरेदी करतात. आगाऊ पैसे दिले जातात. त्यातून कर्जबाजारीपणा वाढलाय. लोकरीसाठी मेंढरे पाळण्यापेक्षा खाटीकाकडे देण्यासाठी आता मेंढरं सांभाळली जाऊ लागलीत. मेंढरांना घेऊन प्रवास करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. गावाबाहेरची-शहराबाहेरच्या मेंढपाळांसाठी उतरण्याच्या जागी इमारतींची जंगलं झालीत. उतरायच्या जागाच शिल्लक नाहीत. जुने मार्ग बदलत गेलेत. द्रुतगती मार्गानं तर मोठीच अडचण निर्माण झालीय. रस्ता ओलांडणे वेगवान वाहनांनी कठीण झालंय. अपघातांचं प्रमाण वाढलंय.
मुलांना शाळेत, आश्रमशाळेत वसतिगृहात ठेवण्याचे प्रमाण वाढलंय. डहाणू, कल्याण, भिवंडी, पनवेल परिसरात हजारो धनगर मुलं त्या भागातल्या मराठा-आगरी कुटुंबात राहून शिक्षण घेताहेत. एक वेगळीच पद्धती इकडे विकसित झालीय. मुलांच्या शिक्षणासाठी अल्पस्वल्प काहीतरी देऊन धनगर पालक आपल्या मुलांना या भागातल्या कुटुंबात ठेवतात. ही मुलेही राहतात. यामुळेही भटकणारा मेंढपाळ आता संपुष्टात येऊ लागलाय. बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीत धनगरांनी आपापले मार्ग निवडलेत.
धुळे जिल्ह्यातली सोनगीरची घोंगडी तशी जगप्रसिद्ध. गेली दोनशे वर्षं सोनगीरची ही व्यावसायिक पेठ तयार होत गेली. त्यापूर्वी ही घोंगडी गावागावातच बनत असे. तीनेकशे माग असणारे हे गाव तीस वर्षापूर्वी दिडशे घोंगडी बनवणारे होते. आता फक्त पाचच माग राहिले आहेत. अक्कलकुमा, नवापूर, तळोदा, मोलगी, धडगाव या भागातील बाजारपेठातून घोंगडीला मागणी असे. आजही मागणी आहे. मात्र मालच बाजारात उपलब्ध नाही. याचं मु”य कारण लोकरीच्या कारखान्यांसाठी होणारी खरेदी. हरियाना, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेशात या व्यवसायाचे आधुनिकीकरण झाले आहे. सर्व ठिकाणची लोकर तिकडे जाते. शिवाय आता कृत्रिम लोकरही बाजारात आली आहे. हुबेहूब तश्शीच, त्यात रंगांची विविधता, पण हा धागा शरीराला अपायकारक असतो. शिवाय रक्तदाब वाढवतो. दुसरं कारण यातल्या कष्टांचा योग्य मोबदला पदरात पडत नाही. अतोनात कष्ट, प्रचंड पायपीट, सारं आयुष्य खाली जमीन वर आकाश, ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत जगणं. बदल अपरिहार्यच होता, पण या बदलाला संघटित व्यवसायाचं रूप देता आलं असतं का? सहकाराचा काही भाग यात घेता आला असता. उत्पादकांची वसाहत करता आली असती का? लोकर उत्पादनाला मागणी खूपच मोठी आहे. मग हा बदल का नाही केला गेला…?
आम्ही सामाजिक लढे खूप दिले. खूप दिले. खूप भाषणं ठोकली. एका मेकॉलेच्या विद्येसाठी हजारो वर्षांची एक आर्थिक, सामाजिक, पर्यावरणाशी सांगड घालणारी उद्योग परंपरा नष्ट झाली. प्रवासामुळे जगाचं ज्ञान, अस्मानी सुलतानीतही टिकून राहण्याचं कसब, युद्धात निपुण, नृत्यकला, वादनकला, व्यापारकला, पशुपालन, पर्यावरण, वनौषधी शास्त्र, तिथीवार नक्षत्र, या सर्वांनी साक्षर, सज्ञान असणारा अत्यंत धनवान, धर्मनिष्ठ, लढवय्या, सर्वांशी मिळून मिसळून असणारा, स्वभावत:च मधुरभाषी, शांत, प्रसंगी ढाण्या वाघ बनू शकणारा धनगर समाज. हिंदू समाजाचा, भारतीय समाजरचनेचा महत्त्वाचा घटक. छत्रपतींच्या भगव्याला अटकेपार नेऊन आक”मकांची कोंडी करणारा काटक समाज. आपली वाट हरवून बसलाय… आपला लय-सूर-ताल… हरवून बसला आहे. समृद्ध भारताचा आत्माच हरवला आहे.
“यळकोट यळकोट जय मल्हार’ चा घोष दुमदुमत भंडारा हवेत उडवून धुंंदपणे ढोलाच्या तालावर नाचणारे हात-पाय…संपूर्ण शरीर…समृद्ध मन… उद्योगी संस्कृतीचे हे अवशेष… संतांच्या अभंगातली घोंगडी… जाडी… भरडी…तरीही अंतरात मऊ मुलायम… कुठं हरवून गेलीय?
– 9766325082
साभार : http://www.evivek.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.