कुठे ते अहिल्याराज! अन् आजचे!

राज्यकर्ते कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांनी देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठीच आपलं उभं आयुष्य व्यतीत केलं. त्यांनी आल्या कारकिर्दीत राजकारण, समाजकारण आणि धर्मपरायणता या सर्व गुणांचे परमोच्च शिखर गाठले. म्हणूनच त्यांना हिंदू संस्कृतीतील परमोच्च अशी पुण्यश्लोक ही उपाधी त्यांच्या कर्तृत्वाने लाभली. अहिल्यादेवींचे स्मरण झाले, की डोळयासमोर येतो ‘बहुजनसुखाय व बहुजनहिताय’ असा त्यांचा 29 वर्षाचा आर्दश असा राज्यकारभार. पानिपतच्या युद्धानंतर जखमी सैनिकांना व निराधारांना निवारा, तहानलेल्यांना पाणी आणि भुकेलेल्यांना अन्न हे त्यांनी त्या काळात ध्येय ठरविले होते.
भुकेलेल्यांना अन्न न मिळाल्याने त्यांचा झालेला मृत्यू त्यांच्या जिव्हारी लागला होता. म्हणून त्यांनी तीर्थक्षेत्री आश्रयासाठी धर्मशाळा व निराधारांसाठी  अन्नछत्रे सुरू केली. आपल्या 29 वर्षाच्या समाजोपयोगी कारभारात जनतेला कशाचीच उणीव भासू दिली नाही. त्यांची ही 29 वर्षाची कारकिर्द म्हणजे मराठय़ांच इतिहासातील सुवर्णक्षरांनी  लिहिलेलं सुवर्णपानच आहे.
त्यांनी या काळात नवी वास्तुशिल्पे उभारून कारागिरांच्या कलांची जपणूक करण्याबरोबरच गरिबांच्या हाताला कामही मिळवून दिले. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ या संकल्पनेतून शेतकऱयांना जाचक करातून मुक्त केले. याबरोबरच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भिल्ल, गोंड व रामोशी नागरिकांच्या हाताला काम मिळवून दिले. प्रजेच्या सुखातच आपले सुख मानून त्यांनी आदर्श असा राज्यकारभार चालविला. त्यांच्या काळात केवळ प्रजाच नव्हे तर पशु-पक्षी व जनचर यांनाही न्याय मिळत असे. अहिल्यादेवी यांनी केलेल्या 29 वर्षाच्या राज्यकारभाराची तुलना केवळ रामराज्याशीच होऊ शकते. प्रचंड संपत्तीची मालकीण असूनही त्यांनी अगदी साध्या पद्धतीने जीवन व्यतीत केले. सर्वांना समान न्याय देण्याच्या त्यांच्या बाण्यामुळे त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. आजच्या युगात परिवर्तन अवघड मानले जात असतानाही त्यांनी दरोडेखोर आणि चोरांना त्यांच्या विचारांपासून परावृत्त केले. त्यांचा हा कारभार पाहिल्यानंतर काही जणांना अजाणतेपणी वाटत असेल, की वास्तुशिल्पे, विहिरी, घाट, ग्रंथसंपदा यांच्या निर्मितीसाठी कदाचित पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी प्रजेचा पैसा वापरला असेल. परंतु त्यांनी स्वत:च्या वाटणीस आलेल्या 16 कोटी रुपयांमधून ही सर्व विकासकामे केली. त्यांनी केलेल्या चोख कारभाराची चर्चा त्या काळी पुणे दरबारात होत असे. त्यामुळेच पेशवे त्यांचा उल्लेख ‘गंगाजळ निर्मळ मातोश्री’ असा करीत असत. 
त्यातूनच त्यांनी केलेल्या कार्याची योग्यता निदर्शनास येते. अहिल्याबाई होळकर यांच्या अजोड असा राज्यकारभाराची बरोबर या काळात तर कोणीच करू शकत नाही. आताच्या राजकारण्यांनी आपल्या भ्रष्ट कारभाराने सर्व राज्यच पोखरून  काढले आहे. देशभरात सध्या सर्वत्र पाहू तेथे भ्रष्टाचारच पाहायला मिळतो. सर्वच पक्षांची राजकीय नेतेमंडळी ही घोटाळेबाजच आहेत. महाराष्ट्रातील आदर्श सोसायटीच्या घोटाळयामुळे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. तर पावणेदोन हजार कोटींच्या 2 जी स्पेक्ट्रम घोटाळयात तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा याला गजाआड जावे लागले आहे. त्या सोबत याच प्रकरणात तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांची मुलगी कनिमोळीला तुरुंगात जावे लागले आहे. दुसरीकडे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेबतील कोटय़वधी रुपयांच्या टेंडर वाटपात घोटाळा केल्याप्रकरणी  काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनाही तिहार तुरुंगात जावे लागले आहे. दिवसेंदिवस भ्रष्टाचाराचे आरोप होतच आहेत. तरही हे निर्ढावलेले राज्यकर्ते मात्र सरकारच्या पैशांवर मजा मारीत आहेत. एवढेच नव्हे तर या राजकीय मंडळंनी चालविलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अनेक बँकांना कर्ज देऊन ही बँक डबघाईला  आणली आहे. 
ही सर्व भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहता पुण्यश्लोक अहिल्याबाई यांनी 29 वर्षे चालविलेल्या पारदर्शक कारभाराची आठवण होते. त्यांच्या कारभाराची बरोबरी करणे कोणाला शक्य होणार नाही. त्यामुळे आगामी काळात प्रामाणिकपणे राज्यकारभार चालविण्यासाठी भ्रष्टाचाराने बरबटत चाललेल्या या पिढीला आवश्यकता आहे, ती प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या विचारांची व आचणाची, आगामी काळात आपल्यासमोर आव्हान आहे ते इमानी अशी पिढी तयार करण्याचे. भारताला  जर महासत्ता बनवायचे असेल, तर सर्वानीच भ्रष्टाचार मोडीत काढून पुण्यश्लोक अहिल्याबाईचे विचार आचरणात आणावेत. तरच नजीकच्या भविष्यात भारताला पुन्हा एकदा महासत्ता बनविता येईल, अशी आशा वाटते.
साभार संपादक, धनगर अस्मिता पाक्षिक, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.