उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरातांचा दणका : भाजपच्या मर्जीतील तब्बल १७६ तहसिलदार, प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई, दि. ०३ ऑक्टोबर, २०२०: देवेंद्र फडणवीस सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना दणका देण्याची प्रक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरूच ठेवली आहे. राज्यभरातील तब्बल १७६ तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. महसूल विभागाअंतर्गत येणाऱ्या या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तीन वर्षांच्या आतील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विशेषाधिकारात या बदल्यांना मान्यता दिली आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या खात्यामार्फत या बदल्यांची फाइल काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या फाईलला मंजुरी दिल्यानंतर या १७६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले आहेत.
'विनंती बदल्या’ असे या बदल्यांना नाव देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मर्जीतील हे अधिकारी होते. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात भाजपचे विविध आमदार व खासदारांनी आपल्या सोयीचे अधिकारी आपापल्या मतदारसंघात आणले होते. हे अधिकारी अजूनही भाजपच्याच स्थानिक आमदार, खासदारांच्या तालावर चालत होते. जनतेची व सरकारी कामे करण्याकडे यातील अनेक अधिकाऱ्यांची लक्ष नव्हते. काही प्रांताधिकारी व तहसिलदारांनी तर स्थानिक पातळीवर प्रचंड भ्रष्टाचार केला होता.
भाजपसाठी काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दणका दिल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी गेल्या सात-आठ महिन्यांत मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्या मर्जीतील IAS व IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या केल्या होत्या. आता तालुका स्तरावर अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रांत व तहसिलदार या पदावरील अधिकाऱ्यांच्याही उचलबांगड्या करून मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना आणखी एक धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत