गणेश चतुर्थीत चाकरमान्यांना क्वारंटाइनची अटच रद्द करा!

​मालवण, दि. ३१ जुलै, २०२०: अलीकडे जिल्ह्यात आढळलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांना १५ ते १९ दिवसानंतर करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी कालावधीत जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना किमान १४ दिवस क्वारंटाइन करणे अत्यावश्यक आहे. केवळ मतांच्या राजकारणाकडे डोळे ठेवून शासनाने ७ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी ठेवल्यास जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसाठी ते घातक ठरणार आहे. त्यामुळे शासनाने क्वारंटाइन कालावधी कमी करू नये, अशी आग्रही मागणी मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत सत्ताधारी गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी केली. शासनाला जर जिल्ह्याचं वाटोळंच करायचं असेल तर क्वारंटाइनची अटच रद्द करून चाकरमान्यांना थेट घरात प्रवेश द्या, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना किमान १४ दिवस क्वारंटाइन करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, असा ठराव यावेळी सर्वानुमते करण्यात आला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी घेण्यात आली. या सभेत सुनील घाडीगांवकर यांनी चाकरमान्यांच्या विषयांवर आक्रमकपणे भावना मांडली. मालवण तालुक्यात आम्हाला ७ दिवसांचे क्वारंटाइन मान्य नाही. जिल्ह्यात १९ व्या दिवशी देखील रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे ७ दिवस क्वारंटाइन केल्यास उद्या ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होईल. चाकरमान्यांनी गावात येऊ नये, अशी आमची भूमिका नाही, उलट शासनाने परप्रांतियांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ज्याप्रमाणे मोफत बसेस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे चाकरमान्यांना गावी येण्या मोफत एसटी आणि रेल्वे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र असे असले तरी १४ दिवस क्वारंटाइनच्या निर्णयात बदल होऊ नये, शासनाचा याबाबत कोणताही वेगळा निर्णय घेतला तरी तो आम्हाला मान्य नसेल, शासनाचा निर्णय आमच्या जीवावर येत असेल तर आम्ही गप्प राहणार नाही, आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ, असा इशारा सुनील घाडीगांवकर यांनी दिला. शासनाने क्वारंटाइन बाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे गावागावात स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांमध्ये वाद भडकण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी उपसभापती राजू परुळेकर आणि सुनील घाडीगांवकर यांनी केली. यावेळी भजन, आरतीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी रस्ते दुरुस्ती, आरोग्य व्यवस्था याबाबत घाडीगांवकर यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सोनाली कोदे यांनी रेवंडीतील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.

बोगस पास नंतर बोगस मेडिकल सर्टिफिकेटचा धंदा वाढण्याची भीती

कोकणात जाण्यासाठी ई पासची सक्ती केल्यानंतर मुंबईत बोगस पास बनवून देणारे रॅकेट कार्यरत झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उद्या मेडिकल सर्टिफिकेट घेऊन कोकणात जाण्याच्या निर्णयानंतर मुंबईत काही पैसे देऊन बनावट मेडिकल सर्टिफिकेट देणारे रॅकेट उदयाला येईल, अशी शक्यता सुनील घाडीगांवकर यांनी व्यक्त केली. खारेपाटण चेकपोस्टवर फक्त करोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र जिल्ह्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाची करोना तपासणी झाली तर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग रोखता येऊ शकेल, असेही ते म्हणाले.

वीज बीले ५०% माफ करा
लॉकडाऊनमध्येही वीज बीले भरमसाठ काढण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची दुकाने बंद असताना त्यांनाही सरासरी बीले देण्यात आली आहेत. धंदाच बंद असेल तर नागरिक, व्यापारी बीले भरणार कुठून? असा सवाल करून घरगुती वीज बिलांमध्ये ५०% सवलत देण्याची मागणी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सुनील घाडीगांवकर, अशोक बागवे, सोनाली कोदे आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.