महिलांसाठी दीपस्तंभ असलेलं व्यक्तिमत्व: साधनाताई संभाजीराव गावडे

अभ्यासू व्यक्तिमत्व, चौफेर विचारशक्ती व खंबीर भूमिका घेऊन काम करत असलेल्या अनेक महिला आज कार्यरत आहेत. मात्र शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वावर वेगळी छाप पाडण्यात यशस्वी ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजेच ईश्वर कृपा शिक्षण संस्थेच्या सचिव व गुणवरे ता. फलटणच्या मा. सरपंच साधना गावडे यांचा आज दि. २० ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्ताने घेतलेला त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा थोडक्यात आढावा...

असं म्हटलं जातं की कोणत्याही यशस्वी पुरूषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पण आरटीओ इन्स्पेक्टर संभाजी गावडेसाहेबांच्या बाबतीत मात्र प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या बरोबरीने एक स्त्री असते असं म्हणावं लागेल. कारण साहेबांच्या पत्नी साधनाताईंचे कर्तृत्व तसचं व्यापक तथा उत्तुंग असं आहे. अर्थात याला साहेबांचा भक्कम पाठिंबा आहे, हेही महत्त्वाचं. अनेकदा स्त्रियांना संधी मिळाली तरीही फार काहीही करता येत नाही पण याउलट साधनाताईंनी आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. माझ्या माहितीप्रमाणे साधनाताईंना माहेरुन राजकीय वारसा लाभलेला आहे. त्याची चुणूक त्यांनी पहिल्याच टर्ममध्ये गुणवरे सारख्या फलटण तालुक्यातील सर्वात मोठ्या गावच्या सरपंचपदापर्यंत मजल मारून तालुक्यातील एक उत्कृष्ट महिला सरपंच म्हणून कामगिरी करून दाखवून दिले आहे. ही जबाबदारी त्यांनी अत्यंत सहज व प्रामाणिकपणे बजावलेली आहे. सरपंच पदावर कार्यरत असताना प्रामुख्याने गावामध्ये दारूबंदी करून गोरगरीब महिलांना प्रापंचिक व कौटुंबिक पातळीवर  दिलासा देण्याचे काम त्यांनी केले आहे.  

दलितवस्ती सुधारणाअंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, बंदिस्त गटारांची कामेही त्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवली आहेत. अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन काम केले आहे. अगदी आपल्या सरपंच पदाचे मानधनही त्यांनी घेतले नाही, त्या माध्यमातून एक आदर्श सरपंच म्हणून फलटण तालुक्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अगदी गुणवरे जिल्हा परिषद गट खुला महिला झाल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत साधनाताईच जि. प. सदस्य होणार असे सर्वांना वाटत होते, पण नेतृत्त्वाचा आदर राखून निवडणुक न लढविण्याची भुमिका घेत साधनाताईंनी प्रचाराची आघाडी समर्थपणे सांभाळली व पक्षाचे उमेदवार विजयी करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली.

तसेच सासरे ईश्वर गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ईश्वर कृपा शिक्षण संस्थेची स्थापना करून सन २०१४ साली ब्लुम इंग्लिश मीडियम स्कुल व ज्युनिअर कॉलेजची स्थापना केली. फलटण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या शाळेचा दबदबा निर्माण करण्यात यश प्राप्त केले आहे. आज सदरची शाळा गुणवरे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण फलटण तालुक्यातच नावारूपाला आणली आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी साधनाताई विशेष परिश्रम या प्रशालेच्या माध्यमातून घेत आहेत. अन् त्यात त्या मोठ्या प्रमाणावर यशस्वी ही झाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील पालकांना जवळच दर्जेदार व खात्रीशीर शिक्षण मिळाल्याने पालकवर्गातून साधनाताईंचे विशेष कौतुक होत आहे. आज ब्लुम इंग्लिश स्कूलमध्ये शेकडो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम प्राचार्य शेखर गायकवाडसर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्याकामी शाळेतील संपुर्ण स्टाफ व शेखर गावडे यांची विशेष साथ त्यांना लाभलेली आहे. शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असुन सुसंस्कृत विद्यार्थी कसा घडेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जाते. सर्व बाबींवर साधनाताईंचे विशेष लक्ष असते. सुसज्ज इमारत, डिजिटल तंत्रज्ञानयुक्त शिक्षण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सर्व सुविधा गुणवरेत खुपच कमी खर्चात सामाजिक भावनेने त्यांच्या शाळेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. 

साधनाताईंनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ब्लूम इंग्लिश मीडिअम स्कूल व ज्यू. कॉलेज गुणवरेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सकाळ मधुरांगण व अरिहंत टी. व्ही. एस. यांचे विद्यमाने संस्थेच्या सचिव साधना संभाजी गावडे यांना शौर्यवर्धिनी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना नुकताच महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा द प्राईड ऑफ इंडिया, भास्कर अवार्ड २०१८ या पुरस्काराने त्यांना पणजी (गोवा) येथे समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे, हि सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे याव्यतिरिक्त सुजन फाऊंडेशनच्यावतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार व सामाजिक कार्याबद्दल दैनिक साहसवार्ता पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला.

साधनाताईंच्या आजवरच्या वाटचालीत त्यांचे आदरणीय आई-वडील, सासु-सासरे, बंधु व विशेषत: पती आरटीओ इन्स्पेक्टर संभाजीराव गावडेसाहेब यांचे खुप मोठे सहकार्य लाभले आहे. 

साधनाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी दिर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासासाठी खुप खुप सदिच्छा व शुभेच्छा...

विठ्ठल पडर
9422338490

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.