ती प्रारुप नियमावली राज्यशासनाला सादर: राज्य सरकार घेणार अंतिम निर्णय- जिल्हाधिकारी

सिंधुनगरी, दि. ११ जुलै, २०२०: गणेशोत्सव काळात सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेश भक्तांना आणि नागरिकांना ७ ऑगस्ट २०२० रात्री १२ वा.पर्यंतच प्रवेश घेता येईल अशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे इतिवृत्त गुरुवारी सोशल मिडीयासह व्हॉट्सअँप ग्रुपवर फिरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र लॉकडाऊन बाबत वाढीव मुदतवाढ किवा गणेशचतुर्थी काळात जिल्ह्यात प्रवेशबंदी याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतरच जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन अंमलात येईल, हे नियोजनाच्या बैठकीचे इतीवृत्त असून आमच्या यंत्रणांना त्या सुचना व मार्गदर्शन आहे. हे आदेश नाहीत, असेही सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी सायंकाळी स्पष्ट केले.

३१ जुलै पर्यन्त शासनाचे लॉकडाऊन असून या कालावधीपर्यंत ई-पास शिवाय जिल्हात प्रवेश मिळू शकत नाही. मात्र त्यानंतर गणेश चतुर्थीचा मोठा सण असून प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या संख्येने मुंबईकर आणि परजिल्हातील नागरिक जिल्हातील आपल्या घरी गणेश दर्शनासाठी दाखल होणार आहेत. मात्र कोरोनाच्या रेड झोन मधून मोठ्या संख्येने नागरिक येणार असून या जिल्हात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यासह महसूल आणि जीपचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक येतील म्हणून त्यांचे त्यापूर्वी १४ दिवसांचे कॉरंटाईन पूर्ण व्हावे व नंतर त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येईल या दृष्टीने या बैठकीत चर्चा होत आहे. या नियोजनासाठी काही प्रारुप नियम तयार करण्यात आले आहेत. त्या इतिवृत्ताची प्रत जाहीर झाल्यामुळे सिंधुदुर्गासह मुंबईकर ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान कालच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत गणेशभक्तांसाठी एक नियमावली करण्यात येत असल्याचे सांगितले होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे सांगितले होते. गणेशभक्तांच्या प्रवेशाचे नियोजन करण्यासाठी व त्यांचा काँरंटाईन काळ पूर्ण करण्यासाठी प्रवेशाबाबत काही नियमावली तसेच गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट रोजी असून तत्पूर्वी म्हणजे ७ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात प्रवेश दिल्यास जिल्ह्यात येणाऱ्या लोकांचे कॉरंटाइन काळ पूर्ण करून त्यांना गणेशोत्सवात सहभागी होता येईल अशा नियोजनाचा निर्णय या बैठकीत झाला होता. मात्र या अटी शर्तींचा प्रारूप मसुदा व या बैठकीच्या इतिवृत्तास शासनाने मान्यता दिल्यानंतर आपण आदेश काढू असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.


सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात होत असतो. घरोघरी हा उत्सव होत असतो यामुळे जिल्ह्यात मोठ्या संख्येने गणेशभक्त दाखल होतील असा अंदाज असल्याने त्यांच्या निदर्शनास अजून पुरेसा वेळ आहे त्या दृष्टीने जिल्ह्यातील ग्रामपंचायती व ग्रामसमित्यांकडे कॉरंटाईन त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी राहणार असून त्यांनाही या बैठकीनंतर कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रवेशद्वारे तसेच आरोग्य पोलिस व महसूल यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या यांच्या या नियोजनात सहभाग असल्याने सर्व संबंधित विभागांनाही या बैठकीची व या बैठकीत दिलेल्या सूचनांची माहिती देण्यात आली आहे. सध्या तरी ही पूर्वतयारी असून मुख्यमंत्री किंवा राज्य शासनाने लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेतल्यास किंवा गणेश चतुर्थी काळात जिल्ह्यात प्रवेश बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यास जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन लागू होणार आहे. असेही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.