व्यवस्थेने लादलेले जीवघेणे स्थलांतर

 विकास सावंत 
vikassawant2018@gmail.com
भारताच्या इतिहासात अनेकदा स्थलांतरे झाली आहेत. कधी सक्तीने, कधी परिस्थितीने, कधी ऐछिक तर कधी हंगामी. कॉलरा, प्लेगच्या साथीत रोगराईच्या भीतीने तर भीषण दुष्काळात पोटापाण्यासाठी लोक स्थलांतरीत  झाल्याने गावेच्या गावे ओस पडली होती. फाळणीनंतर आणि पानिपतच्या पराभवानंतर जीवाच्या भीतीने हजारो माणसांनी मैलोनमैल पायपीट केली होती. सध्या लॉकडाऊनमुळे परमुलखात आजाराने किंवा भुकेने मरण्यापेक्षा आपल्या गावात आपल्या माणसात जावून मरुया. या विचाराने सुरू असलेले स्थलांतर काळजाचा ठाव घेणारे आहे.

उत्क्रांती चक्रात माकडाचा माणूस झाला. तो दोन पायावर चालूही लागला. विकसित मेंदूचा हा “होमोसेफियन” माणूस अधिक चांगल्या जगण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे चालायला लागला. ही मानवाच्या स्थलांतराची सुरवात. भारताचा इतिहासात अनेकदा  स्थलांतरे  झाली आहेत. सन 1877 ते 1885 या काळात मोठ्या प्रमाणात सामुदायिक स्थलांतराच्या नोंदी आहेत. त्या काळात भीषण दुष्काळात पडला होता. पोट भरण्यासाठी माणस गावे  सोडून परागंदा झाली. दुसऱ्या प्रांतात अन्न पाण्याच्या शोधात  निघून गेली. गावेच्या गावे ओस पडली. हे निसर्गाने लादलेले स्थलांतर होते. त्याकाळी वाहतुकीची साधने उपलब्ध न्हवती, त्यामुळे लोकांना पायपीट करण्यावाचून गत्यंतर न्हवते. त्यांची ही पायपीट बघून तत्कालीन ब्रिटीश सरकारने  स्थलांतराला आळा घालण्याची उपाययोजना केली होती. कामाच्या बदल्यात अन्न देणाऱ्या दुष्काळी कामाची सुरवात केली होती. बडोदा व इतर काही संस्थानीकानी लोकांना अन्न देण्याची तजवीज केली. आज रोजी वाहतुकीची सर्व साधने  उपलब्ध असताना  परप्रांतीय  मजुरांची शेकडो मैल सुरु असलेली जीवघेणी पायपीट अत्यंत क्लेश कारक व हृद्य ही  पिळवटून टाकणारी आहे.

प्लेग सारख्या आजाराच्या भीतीने १८९८ ते १९०५ या काळात पुन्हा मोठी स्थलांतरे झाली होती. ही स्थलांतरे  प्रामुख्याने राज्याअंतर्गत झाली. १७६१चे पानिपत युद्ध हे महाराष्ट्राच्या इतिहासातील  मोठे शल्य. पानिपतच्या पराभवानंतर सैरभैर झालेले मराठे सैनिक आपली ओळख लपवत जीवाच्या आकांताने महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. युद्धकैदी झालेले हजारो मराठे पायपीट करीत बलुचिस्तानमध्ये पोहचले. काहीजण रोडमराठे या नावाने हरियानातील विविध भागात स्थलांतरीत झाले. भारत-पाक फाळणीनंतर पाकिस्तानातील सिंध, लाहोर, कराची व इतर प्रांतातून लोंढेच्या लोंढे  मुलाबाळासह स्वतंत्र भारतात आले. देशाच्या इतिहासातील हे सर्वात भीतीदायक स्थलांतर म्हणता येईल. सुमारे एक कोटीहुन अधिक लोक यावेळी स्थलांतरीत झाले. पाकिस्तंमधून आलेल्या स्थलांतरीत निर्वासितांची तत्कालीन भारत सरकारने योग्य ती सोय लावली असली तरी ती  जखम स्थलांतरीतांच्या मनात अजून ताजी आहे. 

सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभर सुरु असलेले स्थलांतर हे राजकीय व्यवस्थेने लादलेले स्थलांतर आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असल्याच्या बातम्या येत होत्या. तेथील लॉकडाउनची स्थिति व लोकांची दैना जगभरातील  प्रसार माध्यमे दाखवत होती. त्यापासून कोणताही धडा न घेता केवळ चार तासाचा अवधी देवून सरकारने देशभर लॉकडाउन जाहीर केले. त्यामुळे देशभरातील पर्यटक, विद्यार्थी व परप्रांतीय लोक जागीच अडकून पडले. लॉकडाउनमुळे उद्योग धंदे बंद राहिल्याने लाखो मजूर बेरोजगार झाले.  रोजगार गमावलेल्या व अन्नान दशा झालेल्या  हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेला आपापल्या गावी  जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. परमुलखात आजाराने अथवा भुकेने मरण्यापेक्षा  आपल्या गावात आपल्या माणसात जावून मरणे पसंद  करून हजारो लोक गावाच्या ओढीने जीवघेण्या प्रवासाकरिता निघाले आहेत. मुंबईतून बिहार, राज्यस्थान, उत्तरप्रदेश, बंगाल प्रांतातील अनेकजण संसार अंगाखांद्यावर घेवून  मुलाबाळासह शेकडो मैलाचा टप्पा पार करण्यासाठी पायपीट करत आहेत. पायी चालत जाण्यास सुद्धा पोलिस परवानगी देत नसल्याने लोक रेल्वे रुळावरून, जंगलातून व ओढे नाल्यातून गावाच्या ओढीने जीवघेणा प्रवास करत आहे. मिळेल त्या वाहनाने  गाव जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी सरकार परदेशी श्रीमंताना विशेष विमानाने आपल्या देशात आणत आहेत. मजुरांच्या या स्थलांतराच्या काळात कोविड आजाराने मेले नसते इतके लोक  रेल्वे व रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. पायपीटीने विमनस्क होवून अर्ध्या रस्त्यावर लोकांनी गळफास घेवून प्राण सोडले आहेत. त्यामुळे हे व्यवस्थेने लादलेले  स्थलांतर भारताच्या इतिहासातील अभुतपूर्व स्थलांतर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.