स्तुत्य निर्णय! ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’चा यंदा आमगन सोहळा रद्द

मुंबई, दि. १६ जून, २०२० : दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवाचं स्वरुप सिमित केलं आहे. त्यातच आता, १०० वर्षांची परंपरा असलेल्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदाचा गणेश आमगन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांवर बंदोबस्तीचा अतिरिक्त ताण पडू नये म्हणून श्रींची मूर्ती मंडपातच घडवण्यात येणार आहे.चिंचपोकळीच्या चिंतमणीच्या आगमनाला मुंबईभरातून भक्तगण येत असतात.त्यामुळे लालबाग-परळमध्ये तुफान गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि पोलिसांवर ताण येऊ नये म्हणून यंदाचा आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच, पाटपूजन सोहळाही रद्द करण्यात आला आहे. पाटपूजन सोहळा रद्द करून ठराविक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल.‌

गणेशोत्सव साध्या पद्धतीने होणार 
चिंचपोकळीच्या चिंतमणीचे आणखी एक आकर्षणाचा विषय म्हणजे भव्य मंडप. मात्र यंदा, भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे तसेच, गरजूंकरिता रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
 
दर्शन कसं होणार?
चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन सर्व चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाइन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी केलं आहे.

मूर्तीची उंची सरकारी निर्देशानुसार
मूर्तीच्या उंचीबाबत शासन जे निर्देश देईल, त्यानुसार मूर्ती बनविण्यात येईल. चिंतामणी’च्या मूर्तीकार रेश्मा विजय खातू यांनी मूर्ती जागेवर घडविण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहितीही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवून इतर मोठी मंडळेही अशाच प्रकारचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.